लोकसभेच्या निवडणुकीत राज्यातील राजकारणाचा दुसरा अंक सुरु झाला आहे. अजित पवार वि. शरद पवार अशी पहिल्या काही टप्प्यांत झालेली निवडणूक आता एकनाथ शिंदे वि. उद्धव ठाकरे अशी होऊ लागली आहे. भाजपा या दोन्ही टप्प्यांत आपले हात धुवून घेत आहे. अशातच आज एकनाथ शिंदे आणि ठाकरे गट यांचा नाशिकमध्ये थेट आमनासामना झाल्याचे पहायला मिळाले. यात ठाकरे गटाच्या घोषणाबाजीवर शिंदेंनी प्रचाररथातून धनुष्यबाण सोडत असल्याचे हावभाव करत प्रत्युत्तर दिले आहे. याचा व्हिडीओ जोरदार व्हायरल होऊ लागला आहे.
महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसे यांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाशिकला आले आहेत. यावेळी मोठ्या संख्येने प्रचार रॅली काढण्यात आली होती. ठाकरे गटाच्या शाखेसमोरून ही रॅली जाणार असल्याने पोलिसांनी वाद होऊ नये म्हणून मोठा बंदोबस्त लावला होता. परंतु या दोन्ही गटात वैरच एवढे आहे की हे दोघेही एकमेकांना डिवचल्याशिवाय राहत नव्हते.
अशातच शिंदेंची रॅली जात असताना ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी पन्नास खोके, एकदम ओकेची घोषणा देण्यास सुरुवात केली. तसेच ते मशालीचे चिन्ह दाखवू लागले. हे पाहून एकनाथ शिंदेंनी त्यांच्याकडे धनुष्यबाण रोखण्याचे हावभाव करत बाण सोडल्याची ॲक्शन केली. याचा व्हिडीओ कमालीच व्हायरल होऊ लागला आहे. ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांना शिंदेंनी ॲक्शनमधून प्रत्युत्तर दिल्याचे म्हटले जात आहे.
इथे पहा व्हिडीओ...