धक्कादायक! मुंबईपासून अवघ्या ६० किमी अंतरावरील गाव बनलं होतं 'इस्लामिक स्टेट लिबरेट झोन'; पुन्हा चर्चेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 5, 2025 18:45 IST2025-06-05T18:07:47+5:302025-06-05T18:45:14+5:30

देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईपासून अवघ्या ६० किमी अंतरावरील ठाणे जिल्ह्यातील पडघा-बोरिवली गाव पुन्हा वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे. महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाने (ATS) ठाणे ग्रामीण पोलिसांसह ठाणे जिल्ह्यातील पडघा व बोरिवली गावांत छापेमारी केली. त्यावेळी १९ मोबाईल, तलवार, चॉपर, छऱ्याची एअरगन आणि विविध आक्षेपार्ह कागदपत्रे जप्त करण्यात आली आहे.

भिवंडी तालुक्यातील हे गाव सुरक्षा एजन्सीच्या रडारवर आहे. याठिकाणाहून दहशतवादी कारवाया सुरू असतात. २ जून रोजी एटीएसच्या टीमने २२ ठिकाणी धाड टाकली. त्यात साकिब नाचन याच्याही घराचा समावेश होता. साकिब हा महाराष्ट्र ISIS चा प्रमुख असल्याचा आरोप आहे. ISIS ही एक दहशतवादी संघटना आहे.

तपास यंत्रणेला मिळालेल्या गुप्त माहितीनंतर २० एटीएस टीममधील २५० हून जास्त पोलीस अधिकाऱ्यांनी ही कारवाई केली. ज्या लोकांच्या घरी छापेमारी केली त्यातील ६ जण हजसाठी सौदी अरबला गेले होते. या छापेमारीत बोरिवलीतील ६० वर्षीय फराक जुबेर मुल्ला याचाही समावेश आहे. फराक जुबेर मुल्ला हा जमीन व्यावसायिक आहे. त्याच्यावर बंदी असलेल्या इस्लामिक संघटना SIMI चा सदस्य असल्याचा आरोप आहे.

त्याचा मोठा भाऊ हसीब मुल्ला याला २००२-०३ च्या मुंबई ट्रेन स्फोटात अटक केली होती. त्याला दोषी ठरवण्यात आले आणि १० वर्षाची शिक्षा सुनावली. डिसेंबर २०२३ मध्ये दिल्ली ISIS मॉड्यूल प्रकरणीही त्याला अटक केली होती. या छापेमारीमुळे ९ डिसेंबर २०२३ च्या सकाळी झालेल्या कारवाईची आठवण ताजी झाली.

NIA ने एका दहशतवादी नेटवर्कचा पर्दाफाश केला होता. त्यात दहशतवादी संघटना इस्लामिक स्टेट संबंधातील १५ जणांना अटक केले होते. NIA च्या पत्रकानुसार, अटक केलेल्या लोकांनी ठाणे जिल्ह्यातील पडघा गावात स्वत:चं स्टेट घोषित केले होते. ते प्रभावशाली मुस्लीम युवकांना पडघात राहण्यासाठी प्रेरित करायचे, जेणेकरून ISIS आणखी मजबूत होईल.

देशविघातक कृत्यांच्या संशयावरून राष्ट्रीय तपास यंत्रणांच्या ताब्यातील बोरिवलीतील कथित साकिब नाचणला गुजरात आणि मुंबईतील स्फोटाप्रकरणी दोनदा शिक्षा झाली. कारागृहात असतानाही पडघ्यातील बोरिवलीतील राजकारण, गावकऱ्यांवर पकड असलेल्या साकिबमुळे बोरिवलीत पुन: पुन्हा पोलीस पायधूळ झाडतात.

पहलगाम हल्ल्यानंतर या भागात काही तरुण स्लीपर सेल म्हणून कार्यरत असल्याचा संशय असल्याने बोरिवली गावात दहशतवादविरोधी पथकाने कॉम्बिंग ऑपरेशन राबवले. साकिबचे वडील हमीद नाचण हे बोरिवली गावचे जि.प. सदस्य होते. त्यांची गावावर पकड असल्याने त्यांच्या निर्णयाविरोधात कुणीही जात नव्हते.

लाकडांचे व्यावसायिक असलेले नाचण कुटुंबाने थेट जमिनीच खरेदी केल्या होत्या. बोरिवली ग्रामपंचायतीचे १३ पैकी १० सदस्य नाचण समर्थक आहेत. २०२१ साली फराण सुसे उपसरपंच झाले. बोरिवलीच त्याचा विरोधकच नाही. स्थानिक संबंध चांगले असल्याने बोरिवलीवर वर्चस्व आहे. स्वत: खटले लढणे, कारागृहातही कायद्याचा अभ्यास करणाऱ्या नाचणविरुद्ध भक्कम पुरावे गोळा करणे हे एटीएस आणि पोलिसांसमोर आव्हान आहे.

बंदी असलेल्या स्टुडंट इस्लामिक मुव्हमेंट ऑफ इंडिया(सिमी) या संघटनेचा सरचिटणीस आणि प्रमुख म्हणून साकिबने काम केले. शैक्षणिक साहित्य वाटप करून तो तरूणांना आकर्षिक करायचा. दहशतवादी कारवाया करणाऱ्या इसिसच्या प्रमुख नेत्यांच्याही तो संपर्कात असल्याचे बोलले जाते.

आताही पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर या गावातून होणाऱ्या स्लीपर सेलच्या कारवायांच्या शक्यतेने २२ संशयितांची तपासणी झाली आहे. मागे बॉम्बस्फोट प्रकरणी मुंबई पोलीस साकिबला पकडायला गेले तेव्हा पोलिसांवरच शेण फेकून ग्रामस्थांनी हल्ला करून त्यांना परतावले. गावात असूनही पकडता न आल्याने तो फरार झाला. त्यामुळे एटीएसने आताच्या कारवाईत कॉम्बिंग ऑपरेशन केले आहे.