तब्बल १२ दिवस आयुष्य 'ठप्प' होतं तेव्हा... जगातील सर्वात मोठ्या 'ट्रॅफिक जॅम'ची कहाणी माहीत आहे का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2025 13:21 IST2025-01-01T13:03:08+5:302025-01-01T13:21:34+5:30

World's Longest Traffic Jam : जरा विचार करा की, जर तुम्हाला तब्बल १२ दिवस ट्रॅफिक जॅममध्ये राहण्याची वेळ आली तर? होय...हा होता जगातील सगळ्यात मोठा ट्रॅफिक जॅम. जो १२ दिवसांचा होता.

World's Longest Traffic Jam : ऑफिसला जाताना रोज ट्रॅफिक लागणं हे तर आता लोकांना सवयीचं झालं आहे. मोठमोठ्या शहरांमध्ये ट्रॅफिकमुळे ऑफिसला, एखाद्या इव्हेंटला किंवा गावाला जायला उशीर होतो. अशात लोक ट्रॅफिकचा ताप टाळण्यासाठी जास्तवेळ प्रवास करतात. अशात लोकांचे काही तास प्रवासात जातात. पण जरा विचार करा की, जर तुम्हाला तब्बल १२ दिवस ट्रॅफिक जॅममध्ये राहण्याची वेळ आली तर? होय...हा होता जगातील सगळ्यात मोठा ट्रॅफिक जॅम. जो १२ दिवसांचा होता. अशात विचार करा की, लोकांची काय हालत झाली असेल. चीनमध्ये हा जगातील सगळ्यात मोठा 'ट्रॅफिक जॅम' लागला होता. हे ट्रॅफिक १४ ऑगस्टला जॅम झालं होतं आणि २६ ऑगस्टला मोकळं झालं होतं.

तुम्हीही अनेकदा अनुभवलं असेल की, ट्रॅफिक जास्त असेल तर कुठे जायला १ तासाच्या जागी दोन तास किंवा ३ तास लागतात. पण १४ ऑगस्ट २०१० मध्ये चीनच्या बीजिंग-तिबेट एक्सप्रेस हायवेवर हे ट्रॅफिक जॅम झालं होतं. हैराण करणारी बाब म्हणजे शेकडो लोकांना १२ दिवस रोडवर आणि आपल्या कारमध्ये रहावं लागलं होतं. लोकांना १२ दिवस एका जागेवरून हलता आलं नाही. सगळी कामं त्यांना तिथेच करावी लागली. म्हणून या ट्रॅफिक जॅमला जगातील सगळ्यात मोठा ट्रॅफिक जॅम म्हटलं जातं.

तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल की, ट्रॅफिक जॅममध्ये गाड्यांच्या रांगा साधारण १०० किलोमीटर परिसरात लागल्या होत्या. मीडिया रिपोर्ट्सनुसार, त्यावेळी चीनच्या बीजिंग-तिबेट एक्सप्रेस हायवेवर हजारो गाड्या अडकून पडल्या होत्या. वरून पाहिलं तर खालच्या गाड्या मुंग्यांसारख्या दिसत होत्या.

ही घटना तिबेट ते बीजिंगपर्यंत कोळसा आणि रस्ते निर्माण साहित्य घेऊन जात असलेल्या ट्रकांमुळे झाली होती. बीजिंग आणि तिबेटला जोडणाऱ्या रस्त्याचे त्यावेळी काम सुरू होते. त्यामुळे गाड्या पुढे जाऊ शकत नव्हत्या. इथे काही गाड्या बिघडल्याही होत्या त्यामुळे रस्ता ब्लॉक झाला होता.

हा जॅम इतका लांब होता की, यात अडकलेल्या गाड्या दिवसभर केवळ १ किलोमीटर अंतरच पुढे सरकू शकत होत्या. जॅममुळे या रस्त्यावर गाड्या आणि लोकांची गर्दीच गर्दी होती. लोक आपल्या गाड्यांवर बसून गेम्स खेळत होते.