एखाद्या कारपेक्षाही लहान आहे जगातील सगळ्यात छोटं घर, पण आहेत सगळ्या आधुनिक सुविधा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2025 15:35 IST2025-02-25T15:23:01+5:302025-02-25T15:35:47+5:30

World's Smallest House : महत्वाची बाब म्हणजे यात एक बेडरूम, किचन आणि टॉयलेटही आहे. यूट्यूबर लेवी केली यांनी या घराचा व्हिडीओ पोस्ट केला आहे.

World Smallest House: जगभरातील मोठमोठ्या महालांची चर्चा नेहमीच होत असते. त्यांची भव्यता आणि सुंदरता पाहून लोक अवाक् होत असतात. पण तुम्ही कधी जगातील सगळ्या छोटं घर पाहिलंय का? नसेल पाहिलं तर ते आज आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत. तुम्हाला विश्वास बसणार नाही, पण जगातील सगळ्यात छोटं घर २० फूटापेक्षा कमी जागेत आहे. महत्वाची बाब म्हणजे यात एक बेडरूम, किचन आणि टॉयलेटही आहे. यूट्यूबर लेवी केली यांनी या घराचा व्हिडीओ पोस्ट केला आहे.

यावर सहजपणे विश्वास बसत नाही, पण हे घर पाहिल्यावर तुम्हीही अवाक् व्हाल. हे घर १९.४६ फूट म्हणजे १.८ वर्ग मीटर इतकं आहे. जगातील सगळ्यात लहान घर असूनही यात अनेक आधुनिक सुविधा आहेत. लेवी केली याचं हे घर दुरून एखाद्या टेलिफोन बूथसारखं दिसतं. जे चाकांवर चालतं.

जगातील सगळ्यात लहान घर असल्याचा दावा करण्यात आलेल्या घरावरून लेवी याला हे घर बनवण्याची प्रेरणा मिळाली. एका महिन्यात हे घर तयार करण्यात आलं. हे घर एका ट्रेलरवर ठेवण्यात आलं. यात बसण्याची जागा, एक बेड, एक किचन आणि एक टॉयलेट आहे.

आता तुम्हाला असाही प्रश्न पडला असेल की, हे घर बांधण्यासाठी किती खर्च आला असेल? तर हे घर बनवण्यासाठी २१, ५०० रूपये खर्च आला. यात रिडींग एरिया आहे, एक कुलिंग यूनिट आहे. सोबतच पाण्याची टाकी, वॉटर हीटर, फिल्टर आणि पंप सिस्टीम आहे. त्याशिवाय यात एक मिनी फ्रीज आणि इलेक्ट्रिक कुकटॉप आहे. लेवीनं सांगितलं की, यात एक वयस्क व्यक्ती आरामात उभी राहू शकते आणि आरामही करू शकते.

लेवीनुसार, लोकांना फक्त या घरात एकच कमतरता वाटते. ती म्हणजे यात कॅंपिंग स्टाईल टॉयलेट आहे आणि शॉवरही घराच्या बाहेर लावण्यात आलं आहे. पण लेवी याला कमतरता मानत नाही. तो म्हणतो की, हे जागेच्या कमतरतेमुळे आहे. गरज असेल तर शॉवर आतही फिट करता येतं.

लेवीच्या या जगातील सगळ्यात छोट्या घराचा व्हिडीओ बघून लोक अवाक् झाले आहेत. अनेकांनी याला अद्भुत म्हटलं. तर काही लोकांनी याच्या आकारावर प्रश्न उपस्थित केलेत. लेवी म्हणाला की, ज्या लोकांना कमी जागेत रहायचं आहे, त्यांच्यासाठी हे घर चांगला पर्याय ठरू शकतं. कमी खर्चात लोक यात राहू शकतात. सध्या या घराची चर्चा जगभरात सुरू आहे.