SIM कार्डचा एक कोना कायम कापलेला का असतो? जाणून घ्या यामागचं रंजक कारण!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2026 14:36 IST2026-03-20T14:31:05+5:302026-03-20T14:36:13+5:30

तुम्ही कधी बारकाईने पाहिलं आहे का? या सिम कार्डचा एक कोना नेहमी एका बाजूने कापलेला असतो.

आजच्या युगात मोबाईल फोनशिवाय आयुष्य जगणे अशक्य झाले आहे. प्रत्येक स्मार्टफोनमध्ये प्राण फुंकण्याचं काम करतो तो म्हणजे छोटासा 'सिम कार्ड'. तुम्ही कधी बारकाईने पाहिलं आहे का? या सिम कार्डचा एक कोना नेहमी एका बाजूने कापलेला असतो. अनेकांना वाटतं की, हे केवळ एक डिझाइन आहे, पण त्यामागे एक महत्त्वाचे तांत्रिक कारण दडलेले आहे.

सिम कार्डचा एक कोना कापण्यामागचा सर्वात मोठा उद्देश म्हणजे ते फोनमध्ये योग्य दिशेने लावता यावे. जर सिम कार्ड चारी बाजूंनी सारखे असते, तर युजर्सना ते नक्की कोणत्या दिशेने लावायचे, हे समजले नसते.

यामुळे सिम कार्ड अनेकदा उलटे किंवा चुकीच्या पद्धतीने लावले जाण्याची शक्यता होती. असे झाल्यास फोनमध्ये नेटवर्क येत नाही आणि वारंवार सिम काढण्या-घालण्यामुळे फोनच्या नाजूक सिम स्लॉटचेही नुकसान होऊ शकते.

इलेक्ट्रॉनिक्सच्या भाषेत या प्रकारच्या डिझाइनला 'कीइंग' असे म्हणतात. याचा अर्थ असा की, एखाद्या उपकरणाचा भाग अशा पद्धतीने तयार करणे, जेणेकरून तो केवळ एकाच विशिष्ट पद्धतीने फिट होईल. सिम कार्डचा हा छोटासा कट युजरला लगेच संकेत देतो की, सिम कोणत्या बाजूने आत सरकवायचे आहे. यामुळे मानवी चूक होण्याची शक्यता शून्यावर येते.

तंत्रज्ञानाच्या प्रगतीनुसार सिम कार्डचा आकार लहान होत गेला. सुरुवातीला मोठे 'मिनी सिम' असायचे, त्यानंतर 'मायक्रो सिम' आले आणि आता आपण 'नॅनो सिम' वापरतो. सिम कार्ड कितीही लहान झाले तरी त्याचा कोना कापण्याची पद्धत मात्र बदललेली नाही. सिम ट्रेमध्येही तसाच खाच दिलेला असतो, ज्यामुळे सिम कार्ड परफेक्ट फिट बसते.

सिम कार्डचा तो कापलेला कोना दिसायला जरी छोटी गोष्ट वाटली, तरी ती मोबाईल वापरण्याचा अनुभव सोपा आणि सुरक्षित बनवण्यासाठी केलेली एक महत्त्वाची तांत्रिक सोय आहे. यामुळे सिम कार्ड योग्य प्रकारे कनेक्ट होते आणि फोनमधील कॉन्टॅक्ट्स व नेटवर्क सुरक्षित राहते.