हौसेला मोल नाही...बर्गर खाण्याची इच्छा झाली अन् गर्लफ्रेंडसह दोन लाखांची केली हेलिकॉप्टरवारी

By ravalnath.patil | Published: December 5, 2020 03:10 PM2020-12-05T15:10:35+5:302020-12-05T15:21:54+5:30

आपल्याला वडापाव किंवा सामोसा खाण्याची इच्छा झाली तर एखादी जवळची टपरी किंवा हॉटेल पाहून जिभेचे चोचले पुरवतो. पण, एका श्रीमंताला बर्गर खाण्याची इच्छा झाली आणि त्याला जवळचे रेस्टॉरंट आवडले नाही, म्हणून चक्क हेलिकॉप्टरने रेस्टॉरंट गाठले आणि आपल्या जिभेचे चोचले पुरवले.

रशियातील एका श्रीमंत व्यक्तीला बर्गर खाण्याची इच्छा झाली. पण, त्याला जवळील बर्गरचे दुकान पसंत नव्हते. त्यानंतर त्याने दोन तासांसाठी हेलिकॉप्टर बुक केले आणि तो मॅकडोनाल्डच्या रेस्टॉरंटमध्ये पोहोचला.

mirror.co.uk च्या रिपोर्टनुसार, फक्त बर्गर खाण्यासाठी दोन तास हेलिकॉप्टरमध्ये उड्डाण करणार्‍या व्यक्तीचे नाव विक्टर मार्टिनोव्ह असे आहे. व्हिक्टर हे खासगी याट व्यवसायात आहे.

मॅकडोनाल्डच्या रेस्टॉरंटमध्ये पोहोचण्यासाठी या करोडपती व्हिक्टर यांनी एका हेलिकॉप्टरच्या राइडवर सुमारे 2 लाख रुपये खर्च केले. गर्लफ्रेंडसमवेत ते बर्गर खाण्यासाठी हेलिकॉप्टरमधून रेस्टॉरंटमध्ये पोहोचले.

खरंतर, 33 वर्षांचे व्हिक्टर क्राइमियामध्ये सुट्टीचा आनंद घेत होते. यादरम्यान, त्यांना मॅकडोनाल्डमधील बर्गर खाण्याची इच्छा झाली. यानंतर त्यांनी क्राइमिया ते क्रास्नोडार असा प्रवास हेलिकॉप्टरने केला. हेलिकॉप्टरने ते सुमारे 360 किमी अंतरावर असलेल्या मॅकडोनाल्ड रेस्टॉरंटमध्ये पोहोचले.

रेस्टॉरंटमध्ये व्हिक्टर यांनी बिग मॅक, फ्रेंच फ्राईज, मिल्कशेक्स वगैरे मागवले. रेस्टॉरंटचे बिल सुमारे 4,859 रुपये झाले. एकंदरीत पाहले तर हौसेला मोल नसते, हेच या घटनेवरून दिसून येते.

दरम्यान, हेलिकॉप्टर भाड्याने देणाऱ्या कंपनीने असे म्हटले आहे की, फक्त बर्गर खाण्यासाठी हेलिकॉप्टर मागविले, असे याआधी कधीच बुकिंग झाली नाही.