ना मंदिर, ना मूर्तिपूजा; संपूर्ण शरीरावर फक्त 'रामनाम', या आदिवासी समाजाची अनोखी परंपरा
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2025 13:57 IST2025-12-23T13:33:50+5:302025-12-23T13:57:38+5:30
Ramnami Tribe: हा अनोखा आदिवासी समाज छत्तीसगडच्या मध्य मैदानी भागात वास्तव्यास आहे.

Ramnami Tribe: भारतामध्ये श्रद्धा आणि भक्तीचे अनेकविध रूप पाहायला मिळतात. मात्र छत्तीसगडमधील रामनामी समाजाची भक्ती ही अत्यंत अनोखी आणि विचार करायला भाग पाडणारी आहे. येथे ना श्रीरामाचे भव्य मंदिरे आहे, ना मूर्तीची पूजा केली जाते. या समाजातील लोक आपले शरीर रामाचे मंदिर मानतात.

रामनामी समाजाची सुरुवात 19व्या शतकाच्या अखेरीस, सुमारे 100 वर्षांपूर्वी झाली. त्या काळात जातीय भेदभावामुळे या समाजातील लोकांना मंदिरात प्रवेश आणि मूर्तिपूजेची परवानगी नव्हती. सातत्याने होणाऱ्या अपमान आणि सामाजिक बहिष्कारातून या समाजाने एक क्रांतिकारी मार्ग स्वीकारला.

जर आम्हाला मंदिरात जाण्यापासून रोखले जात असेल, तर आम्ही देवाला स्वतःमध्येच सामावून घेऊ, असा निर्धार त्यांनी केला. याच विचारातून शरीराच्या प्रत्येक भागावर ‘राम’ हे नाव गोंदवण्याची परंपरा सुरू झाली. हा शांत, अहिंसक प्रतिकार होता, ज्यात मूर्तीपेक्षा नामस्मरणाला सर्वोच्च स्थान देण्यात आले.

रामनामी समाजात गोंदन (टॅटू) ही केवळ सजावट नसून धार्मिक दीक्षेचा भाग आहे. शरीरावर गोंदवलेल्या रामनामाच्या प्रमाणावरून त्यांचे वेगवेगळे प्रकार आहेत. सर्वांग रामनामी : संपूर्ण शरीरावर प्रत्येक भागात ‘राम’ नाम गोंदवलेले असते. नखशिख रामनामी : डोक्यावरील केसांपासून पायांच्या नखांपर्यंत रामनाम गोंदलेले असते. शिखा रामनामी : केवळ कपाळ किंवा डोक्यावर रामनाम गोंदवलेले असते.

वेषभूषा आणि ओळख- रामनामी समाजाची ओळख त्यांच्या साध्या पण प्रभावी वेषभूषेतून होते. संपूर्ण शरीरावर ‘राम-राम’चे कायमस्वरूपी गोंदन, डोक्यावर मोरपिसांची खास पगडी आणि अंगावर पांढरी चादर, ज्यावर रामनाम लिहिलेले असते. ही वेषभूषा त्यांच्या श्रद्धेइतकीच त्यांच्या सामाजिक ओळखीचे प्रतीक आहे.

कुठे आढळतो हा समाज? रामनामी समाज प्रामुख्याने छत्तीसगडच्या मध्य मैदानी भागात, महानदीच्या काठावरील गावांमध्ये वास्तव्यास आहे. या समाजाची उत्पत्ती जांजगीर-चांपा जिल्ह्यातील चारपारा गावातून झाल्याचे मानले जाते.

आधुनिक जीवनशैलीमुळे नव्या पिढीतील तरुणांमध्ये संपूर्ण शरीरावर गोदना गोंदवण्याची परंपरा काही प्रमाणात कमी झाली आहे. मात्र रामनामावरील श्रद्धा, सांस्कृतिक ओळख आणि सामाजिक समतेचा संदेश आजही या समाजात तितक्याच ताकदीने जिवंत आहे. रामनामी समाज आजही जगासमोर अहिंसक प्रतिकार, आत्मसन्मान आणि अटूट भक्तीचे एक जिवंत उदाहरण म्हणून उभा आहे.

















