Pincode ची सुरुवात नेमकी कधीपासून झाली; देशात नक्की किती Post Office आहेत माहितीये?

By ऑनलाइन लोकमत | Published: March 6, 2021 04:00 PM2021-03-06T16:00:42+5:302021-03-06T16:08:23+5:30

Pincode ची सुरुवात कोणी केली? पिनकोड म्हणजे काय? त्याचे जनक कोण? देशभरात किती Post Office आहेत? याची आपण माहिती घेऊया... (know everything about pincode and how many post office are there in india)

India Post Office म्हटलं की, एकदम वेगळंच वातावरण मनात तयार होतं. आठवणींच्या हिंदोळ्यावरून व्यक्ती भूतकाळात रममाण होते. जुन्या काळी पत्र, तार याच माध्यमातून आप्तेष्टांची चौकशी, ख्याली-खुशाली समजत असे.

केवळ Post Office किंवा पोस्टमन असे नाव घेतले, तरी आठवणींचा एक पट अनेकांच्या डोळ्यासमोरून अगदी सहजगत्या जाईल, यात शंका नाही. देशाच्या कानाकोपऱ्यात सेवा देणाऱ्या याच पोस्ट ऑफिसचा एक मोठा आणि रंजक इतिहास आहे.

देशाच्या एका भागातून दुसऱ्या भागात पाठवलेले पत्र, वस्तू नेमक्या जागी पोहोचण्यामागे पिनकोड याची महत्त्वाची भूमिका असते. अत्याधुनिक जगतात तंत्रज्ञान कितीही पुढे गेले, ऑनलाइन खरेदी-विक्री होऊ लागली, जी-मेल, व्हॉट्सअॅप आले, तरी पत्ता लिहिताना पिनकोड अनिवार्य असतोच.

शाळेत जाणाऱ्या मुलांना आपल्या घरच्या पत्त्यासोबत पिनकोड पाठ असतो. मात्र, या Pincode ची सुरुवात कोणी केली? पिनकोड म्हणजे काय? त्याचे जनक कोण? देशभरात किती Post Office आहेत? याची आपण माहिती घेऊया...

भारतीय पोस्ट ऑफिसचा इतिहास सुमारे १५० वर्षे जुना आहे. संपूर्ण जगात संवादाचे मोठे नेटवर्क म्हणून पोस्ट ऑफिसकडे पाहिले जाते. वेगवेगळ्या भाषा, अपुरे पत्ते, दुर्बोध अक्षर, गावांच्या नावांतील साधर्म्य यांसारखे अडथळे पार करून योग्य ठिकाणी पत्र पोहोचवण्याचे अशक्यप्राय काम पोस्ट खाते कशा पद्धतीने करत असेल? हे काम सोपे केले आहे. ‘पोस्टल इंडेक्स नंबर’ किंवा ‘पिन’ या प्रणालीने.

PIN म्हणजे पोस्टल इंडेक्स नंबर. १५ ऑगस्ट १९७२ रोजी पिनकोड पद्धत अंमलात आणली गेली. पोस्ट आणि टेलीग्राफ खात्यात नोकरीत असताना श्रीराम भिकाजी वेलणकर यांना पिनकोडचे जनक मानले जाते. पिनकोडची विशेष रचना आहे.

पहिला अंक विभाग, दुसरा अंक उपविभाग आणि तिसरा अंक सॉर्टिंग जिल्हा दर्शवतो. शेवटचे तीन अंक पोस्ट ऑफिस सूचित करतात. संपूर्ण पूर्ण देश ९ झोन मध्ये विभागला गेला आहे. यापैकी ८ झोन हे भौगोलिक विभाग आहेत, तर एक मिलिट्रीसाठी वापरला जातो.

पोस्टाची सेवा सुरू झाल्यावर दळणवळणाची सुविधा खऱ्या अर्थाने सर्वसामान्यांसाठी खुली झाली. भारतात पोस्ट अ‍ॅण्ड टेलिग्राफ डिपार्टमेंटची म्हणजेच पोस्टाची सेवा १ ऑक्टोबर १८५४ रोजी सुरू झाली. अलीकडच्या काळात दळणवळण व माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाच्या अखत्यारीत ‘भारतीय डाक खाते’ कार्यरत आहे.

जगातील सर्वात मोठे पोस्टाचे जाळे भारतात आहे. १,५५,५३१ पोस्ट ऑफिसेस भारतभर पसरलेली असून, खेड्यात त्यांची संख्या १,३९,८८२ आहे. भारतीय डाक विभागात चार लाखांपेक्षा अधिक कर्मचारी कार्यरत आहेत.

एक पोस्ट ऑफिस सरासरी आठ हजार ७७० जणांना आणि सुमारे २१.१४ चौ. कि.मी. क्षेत्राला सेवा पुरवते. जगातील सर्वात उंचावर असणारे पोस्ट ऑफिस हिमाचल प्रदेशातील लाहूल व स्पिती जिल्ह्यांत हिक्कीम येथे आहे.

या पोस्ट ऑफिसची समुद्रसपाटीपासून त्याची उंची सुमारे १५ हजार फूट आहे. भारतातील सर्वात मोठे पोस्ट ऑफिस मुंबई येथील जीपीओ (जनरल पोस्ट ऑफिस) असून, तेथे १०० पेक्षा जास्त काउंटर्स आहेत. भारतात एकूण १९,१०१ ‘पिन’ आहेत.

जम्मू-काश्मीरमधील श्रीनगर जिल्ह्यातील दाल सरोवरामध्ये भारतातील एकमेव तरंगते पोस्ट ऑफिस आहे. त्याचे उद्घाटन २०११ मध्ये करण्यात आले होते. सर्व स्त्री कर्मचारी असणारे पोस्ट ऑफिस शास्त्री भवन, नवी दिल्ली येथे २०१३ साली सुरू झाले.

पोस्ट खात्यातर्फे दरवर्षी १५ ते २१ जानेवारी दरम्यान ‘पिन कोड सप्ताह’ साजरा केला जातो. या काळात लोकांमध्ये ‘पिन’ जाणीव जागृती निर्माण करण्यासाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते.

आजच्या काळात ‘पिन’ हा फक्त पोस्ट ऑफिसपुरता मर्यादित राहिलेला नसून, तर त्याचा उपयोग बँका व ऑनलाइन शॉपिंग वेबसाइट्स यांनाही तितक्याच समर्थपणे केला जातो. दरम्यान, ०९ ऑक्टोबर १९६९ हा दिवस जागतिक डाक दिवस म्हणून साजरा करण्याची घोषणा जपानमधील टोकियोमध्ये करण्यात आली होती.

जागतिक पातळीवरील १४२ देशांमध्ये पोस्टल कोड उपलब्ध आहेत. हे कोड युनिव्हर्सल पोस्ट सर्व्हिसेस अंतर्गत येतात. ९ ऑक्टोबर १८७४ मध्ये २२ देशांनी ही प्रणाली कार्यरत करण्यावर सहमती दिली होती.