भारतीय रेल्वेची 'मिस्ट्री ट्रेन'! अचानक झाली गायब; 43 वर्षांनंतर लागला शोध, जगभरात खळबळ...
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2025 16:13 IST
1 / 6India Railway mystery Train: जगभरात 'बरमूडा ट्रायंगल'च्या अनेक रहस्यमयी कथा सांगितल्या जातात, परंतु भारतात घडलेल्या एका वास्तव घटनेने सर्वांनाच आश्चर्यचकित केले होते. तब्बल 43 वर्षे गायब राहिलेली एक मालगाडी नासामुळे अचानक जगासमोर आली. पण, जेव्हा तिचा शोध लागला, तेव्हा अमेरिकेपासून रशिया-चीनपर्यंतच्या सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या. 2 / 6काय घडले होते? रेल्वे नोंदीनुसार, 16 जून 1976 रोजी सकाळी 11:08 वाजता अहमदनगरहून एक मालगाडी तिनसुकियाच्या दिशेने निघाली. तिनसुकिया स्थानकावर गर्दी असल्याने लोकोपायलटने काही किलोमीटर आधीच ट्रॅक रिकामा होईपर्यंत थांबण्याचा निर्णय घेतला. त्या दिवशी मुसळधार पाऊस आणि पूरस्थितीमुळे परिस्थिती बिकट बनली होती. परिस्थइती पाहता, लोकोपायलटने इंजिन वेगळे करुन स्टेशनवर जाण्याचा निर्णय घेतला. 3 / 6त्याचा विचार होता की, पाऊस कमी झाल्यावर तो परत जाऊन सर्व डब्बे परत आणेल. परंतु पाऊस थांबला नाही आणि रेल्वे कर्मचारी पूरस्थिती, दुरुस्ती आणि वाहतूक सुरळीत करण्यामध्ये इतके व्यस्त झाले की, जंगलात सोडलेली मालगाडी कोणी लक्षातच ठेवली नाही. नंतरच्या पुरामुळे परिसरातील ट्रॅक आणि स्टेशन वाहून गेले. स्टेशन मास्टर आणि संबंधित कर्मचाऱ्यांची बदल झाली अन् ती मालगाडी जंगलात तशीच पडून राहिली.4 / 643 वर्षांनंतर NASA चा शोध- डिसेंबर 2019 मध्ये नासा एशिया-आफ्रिका क्षेत्रातील फॉरेस्ट कव्हर मॅप तयार करत होते. त्यावेळी तिनसुकियापासून 40 किमी अंतरावर जंगलात नासाच्या सॅटेलाइटने एक विचित्र गोष्ट टिपली. अमेरिकेने भारतीय जंगलातील हा फोटो शेअर करत दावा केला की, भारताने इंटरकॉन्टिनेंटल बॅलिस्टिक क्षेपणास्त्र (ICBM) जंगलात लपवले आहे. या दाव्याने जगभरात खळबळ उडाली.5 / 6हा दावा समोर येताच रशिया आणि चीन देखील सक्रिय झाले. त्यांच्या गुप्तचर संस्थांनी त्या जंगलात शोधमोहीम सुरू केली. भारतीय सुरक्षा यंत्रणाही अचानक सावध झाली आणि संरक्षण मंत्रालयाची तातडीची बैठक बोलावण्यात आली. भारतीय एजन्सीजने तपास केला आणि सांगितले की, जंगलात दिसणारी वस्तू क्षेपणास्त्र नसून, 1976 साली हरवलेल्या मालगाडीचे डब्बे आहेत. 6 / 6 पूरामुळे त्या भागाकडे जाणारा ट्रॅक नष्ट झाला होता, त्यानंतर जंगलातील झाडे आणि काटेरी झुडपांनी डब्बे पूर्णपणे झाकून गेले. हा परिसर जंगलाने वेढलेला असल्यामुळे मनुष्याची वर्दळही नव्हती. यामुळे तब्बल चार दशके त्या रेल्वेडब्ब्यांकडे दुर्लक्ष झाले. 2020 मध्ये भारतीय रेल्वेने अधिकृतपणे जाहीर केले की, त्यांच्या नोंदींनुसार अशाप्रकारची कोणतीही ट्रेन हरवली नाही. मात्र, काही मीडिया रिपोर्ट्समध्ये ही घटना घडल्याचे सांगितले जात आहे.