Food: या हॉटेल्समध्ये अजूनही तीन रुपयांना मिळते भरपेट जेवण, असतात हे पदार्थ

By ऑनलाइन लोकमत | Published: October 6, 2021 04:42 PM2021-10-06T16:42:32+5:302021-10-06T16:55:16+5:30

Pice Hotels in Kolkata : वाचण्यास काहीसं अविश्वसनीय असलं, तरी हे खरं आहे. कोलकातामधील काही पाईस हॉटेलमध्ये आजही अगदी माफक दरात भोजन मिळतं. इथे तुम्ही झोल आणि भात आजही तुम्ही केवळ ३ रुपयांमध्ये खाऊ शकता.

वाचण्यास काहीसं अविश्वसनीय असलं, तरी हे खरं आहे. कोलकातामधील काही पाईस हॉटेलमध्ये आजही अगदी माफक दरात भोजन मिळतं. इथे तुम्ही झोल आणि भात आजही तुम्ही केवळ ३ रुपयांमध्ये खाऊ शकता. केवळ एक दोन हॉटेल्समध्येच नाही तर कोलकात्यामध्ये अशी अनेक हॉटेल्स आहेत जिथे माफक दरात हे भोजन मिळतं. स्वस्तात भोजन मिळत असल्याने या हॉटेलना पाईस हॉटेल असं म्हटलं जातं. हे हॉटेल्स आजचे नाही आहेत तर यापैकी काही हॉटेल हे १०० वर्षांपैक्षा अधिक जुने आहेत.

या हॉटेलना भातेर हॉटेल किंवा राईट हॉटेल म्हटले जाते. काही लोक यांना हिंदू हॉटेल म्हणूनही ओळखतात. जर तुम्ही कोलकात्यामध्ये जाणार असाल तर या हॉटेल्सना भेट द्यायला विसरू नका. इथे तुम्हाला कोलकातामधील पारंपरिक भोजनाचा आस्वाद मिळेल, तोही अगदी स्वस्तामध्ये. येथील काही हॉटेलमध्ये ३ रुपयात भोजन मिळते. तर काही ठिकाणी याची किंमत काही अधिक आहे. मात्र तरीही देशातील अन्य शहरांच्या तुलनेत येथे जेवण खूप स्वस्त आणि उत्तम दर्जाचे मिळते.

मात्र या हॉटेलमध्ये इतर वेगवेगळे आणि स्वादिष्ट पदार्थही मिळतात. त्यांचे दर वेगळे आहेत. मात्र अनेक पाईस हॉटेलमध्ये तुम्ही ३ रुपयांपासून २५ रुपयांपर्यंत भरपेट जेवण जेवू शकता. त्यामुळे येथे दुपारच्या आणि रात्रीच्या जेवणासाठी गर्दी असते. काही हॉटेलमध्ये अजूनही जुनी पद्धत अवलंबली जाते. येथे जमीनीवर केळ्याच्या पानामध्ये भोजन वाढले जाते. तर काही पाईस हॉटेलमध्ये आता खुर्ची व टेबल आले आहेत.

या हॉटेलमध्ये व्हेज थाळी स्वस्त असते. तर नॉनव्हेज थाळी काहीशी महाग असते. येथे सर्व पारंपरिक बंगाली पदार्थ असतात. जर तुमच्याकडे फारसे पैसे नसले तरी पाईस हॉटेलमध्ये तुम्हाला स्वस्त, दर्जेदार आणि पोटभर जेवण तुम्ही घेऊ शकता. मात्र बरीच पाईस हॉटेल गेल्या काही वर्षांत बंद पडली आहेत. तर काही हॉटेल आता सुरू आहेत.

आता या हॉटेलना पाईस हॉटेस असं नाव का पडलं असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. तर हे नाव पैशावरून पडले आहे. ही पाईस हॉटेल इंग्रजांच्या काळापासून सुरू आहेत. त्यावेळी कोलकाता ही भारताची राजधानी होती. ब्रिटिशकाळात पैशाला पाईस म्हटले जात असे. त्यावरून हे नाव पुढे आले.

भोजनाची ही ठिकाणे सामान्य वाटत असली तरी कमी पैशात स्वादिष्ट आणि स्वच्छ भोजन उपलब्ध करून देतात. कोलकात्यामधील हजारो लोकांची भूक भागवतात. येथील मेन्यूमध्ये फार बदल झालेला नाही. येथे मच्छा भाजा (फ्राईड फिश), माछर झोल (फिश करी), कुमरो फूल भाजा (फ्लॉवरची भाजी), आलू पोस्तो असे भोजन उपलब्ध असते.

पाईस हॉटेलमध्ये केळीच्या पानावर आणि कटोऱ्यामध्ये भोजन वाढले जाते. ग्राहकांना जमिनीवर अंथरलेल्या चटईवर बसावे लागते. येथे कुठलेही मेन्यूकार्ड नसते. तर मेन्यू दररोज बदलत असेल तर तो बाहेरील ब्लॅकबोर्डवर लिहिला जातो. येथे प्रत्येक पदार्थाची किंमत वेगळी असते. ग्राहकांना केळीचे पान आणि लिंबाचेही पैसे द्यावे लागतात. मात्र हे शुल्क फार अल्प असते.

या हॉटेलपैकी काही हॉटेल हे पिढ्यानपिढ्या सुरू आहेत. या पाईस हॉटेलमध्ये तरुण निकेतन, सिद्धेश्वरी आश्रम, स्वादिन भारत, जगन्नाथ आश्रम, प्रभाती हॉटेल, पार्वती हॉटेल ही येथील प्रसिद्ध हॉटेल आहेत. काही हॉटेल महिला चालवतात. एका दिवसात येथे किमान ३०० ते ४०० लोक भोजन करतात.