City Under River: इराकच्या टायग्रिस नदीखाली सापडले 3400 वर्षे जुने शहर, चकीत करणारी माहिती आली समोर...

By ऑनलाइन लोकमत | Published: June 1, 2022 10:03 PM2022-06-01T22:03:41+5:302022-06-01T22:06:05+5:30

City Under River: पुरातत्वशास्त्रज्ञांच्या एका गटाला इराकच्या टायग्रिस नदीखाली बुडालेले एक प्राचीन शहर आढळले आहे.

City Under River: पुरातत्वशास्त्रज्ञांच्या एका आंतरराष्ट्रीय गटाने नदीखाली बुडालेले एक प्राचीन शहर शोधून काढले आहे. हे शहर 3400 वर्षे जुने असून, नदीच्या पाण्यात सामावून गेले होते. इराकमधील कुर्दिस्तान भागात हे पुरातन शहर आढळले आहे. हजारो वर्षे जुने हे शहर टायग्रिस नदीखाली सापडले आहे.

पुरातत्व शास्त्रज्ञांनी नुकतीच याबाबत माहिती दिली. पुरातत्वशास्त्रज्ञांनी सांगितल्यानुसार, त्यांना इराकमधील टायग्रिस नदीच्या खाली 3,400 वर्षे जुन्या शहराचे अनेक अवशेष सापडले आहेत. हे शहर 1475 ते 1275 बीसी दरम्यान मितान्नी साम्राज्याने वसवले होते. टायग्रिस नदीच्या काठावर असलेल्या मोसुल धरणातील पाणी कमी झाल्यामुळे या शहराचा शोध लावणे शक्य झाले.

सापडलेल्या अवशेषांमध्ये मातीच्या विटांच्या भिंती, अनेक घरे, इमारती आणि इतर मोठ्या वास्तूंचा समावेश आहे. हे मितान्नी साम्राज्याचा इतिहास सांगतात. शहराच्या बनावटीवरुन हे एक व्यापारी केंद्र असण्याच्या शक्यता नाकारता येत नाही. पुरातत्वशास्त्रज्ञ डॉ. इव्हाना पुलजीझ यांनी सांगितल्यानुसार, जाड मातीच्या भिंती असलेल्या इमारती काळजीपूर्वक डिझाइन केल्या होत्या.

येथे मातीच्या 10 क्यूनिफॉर्म टॅबलेटही सापडल्या आहेत. क्युनिफॉर्म ही प्राचीन लेखनशैली आहे. सध्या ते अनुवादासाठी पाठवण्यात आले आहे. विशेष म्हणजे इतके वर्षे पाण्याखाली असूनही या शहरातील मातीच्या भिंती चमत्कारिकरित्या तशाच राहिल्या आहेत. 1980 च्या दशकाच्या सुरुवातीला येथे मोसुल धरण बांधण्यात आले तेव्हा हे शहर गाडले गेले. मात्र दुष्काळामुळे हे शहर आता पुन्हा पृष्ठभागावर दिसू लागले आहे.

पाण्याखाली बुडण्यापूर्वी पुरातत्वशास्त्रज्ञांनी या जागेची पूर्ण तपासणी केली नव्हती. परंतु डिसेंबरपासून या प्रदेशात पडलेल्या भीषण दुष्काळात प्राचीन शहराचा काही भाग पुन्हा पृष्ठभागावर आला आहे. पुरातत्व शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे की, या शोधानंतर मितानी साम्राज्याबाबत अधिक माहिती समोर येईल. अलिकडच्या दशकातील एक महत्त्वाचा पुरातत्व शोध म्हणून त्यांनी त्याचे वर्णन केले.