पत्रकार चांद नवाबच्या 'कराची से...' वाल्या Video चा होतोय लिलाव, किती बोली लागली पाहा...

By ऑनलाइन लोकमत | Published: August 30, 2021 04:30 PM2021-08-30T16:30:26+5:302021-08-30T16:35:30+5:30

पाकिस्तानी पत्रकार चांद नवाबचे व्हायरल व्हिडिओ तुम्ही नक्कीच पाहिले असतील. आता या व्हिडिओंचा लिलाव केला जाणार आहे.

बॉलिवूड सुपरस्टार सलमान खानच्या 'बजरंगी भाईजान' चित्रपटात अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकीनं एका पत्रकाराची भूमिका साकारली होती. ही भूमिका पाकिस्तानातील पत्रकार चांद नवाब वरुन प्रेरित होती. चांद नवाब यांच्या रिपोर्टिंगचे धमाल व्हिडिओ सोशल मीडियात तुफान व्हायरल झाले होते. आता पुन्हा एकदा चांद नवाब चर्चे विषय ठरत आहेत.

ईद साजरी करण्यासाठी मुस्लिम बांधव मोठ्या प्रमाणावर रेल्वेनं प्रवास करुन आपापल्या घरी पोहोचत आहेत. याचं रिपोर्टिंग करतानाचा चांद नवाब यांचा 'कराची से...' वाला व्हिडिओ सोशळ मीडियात तुफान हिट ठरला होता. याच व्हिडिओचा लिलाव करण्याचा निर्णय चांद नवाब यांनी घेतला आहे.

डिजिटल संपत्ती अंतर्गत या व्हिडिओचा लिलाव करण्याची तयारी चांद नवाब यांनी केली आहे. त्यांनी आपल्या व्हिडिओची लिलावासाठीची आधारभूत किंमत ४६ लाख रुपये इतकी ठेवली आहे.

पाकिस्तानच्या कराची रेल्वे स्थानकावर चांद नवाब २००८ साली रिपोर्टिंग करत होते. ईदच्या निमित्तानं चांद नवाब यांनी केलेला रिपोर्ट सोशल मीडियात व्हायरल झाला होता आणि रातोरात चांद नवाब स्टार झाले होते.

रिपोर्टिंग करत असताना येणारे व्यत्यय आणि त्यानं चांद नवाब यांची भंबेरी उडणं हे सारं कॅमेरात कैद झालं होतं. या व्हिडिओला नेटिझन्सनं उचलून धरलं होतं. रेल्वे स्थानकावरील जिन्यांवर उभं राहून चांद नवाब चित्रीकरण करत होते आणि प्रवासी त्यांच्या मागून येत कॅमेरासमोर येत असल्यानं त्यांना व्यत्यय येत होता. याचं संदर्भातील हा व्हिडिओ व्हायरल झाला होता.

चांद नवाब यांचा हा व्हिडिओ इतका व्हायरल झाला की बॉलिवूड कलाकार नवाजुद्दीन सिद्दीकी यांन 'बजरंगी भाईजान' चित्रपटात चांद नवाब यांची भूमिका साकारली आणि अगदी हुबेहुब सीन चित्रपटात दिला होता.

चांद नवाब यांच्या याच व्हिडिओच्या लिलावासाठी आधारभूत किंमत जवळपास ४६ लाख ७४ हजार ७०० रुपये इतकी ठेवण्यात आली आहे. एनएफटी प्लॅटफॉर्मवर याची विक्री केली जाणार आहे. या फ्लॅटफॉर्मवर डिजिटल संपत्तीची विक्री केली जाते.

"२००८ साली ईदच्या निमित्तानं रेल्वे स्टेशनवर मी जे रिपोर्टिंग केलं होतं. त्यात प्रवासी वारंवार कॅमेरासमोर येऊन रिपोर्टिंगमध्ये व्यत्यय आणत होते. मला एकच वाक्य वांरवार शूट करावं लागत होतं आणि याचाच व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाला होता. हा व्हिडिओ आता लिलावात काढण्याचा निर्णय घेतला आहे", असं चांद नवाब म्हणाले.