वर्षातून एकदा रक्तासारखी लाल होते 'ही' नदी, जाणून घ्या काय आहे निसर्गाचं हे अनोखं रहस्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 25, 2025 15:09 IST2025-10-25T14:40:45+5:302025-10-25T15:09:23+5:30

Blood Red River : आज आम्ही आपल्याला अशाच एका रहस्यमय नदीबद्दल सांगणार आहोत जिचा रंग वर्षातून एकदाच बदलतो.

Blood Red River: नदी म्हटलं की, डोळ्यांसमोर स्वच्छ, गोड आणि झूळझूळ वाहणारं पाणी येतं, पण जर एखादी नदी अचानक रक्तासारखी लाल वाहायला लागली, तर कोणीही थक्क राहील. आज आम्ही आपल्याला अशाच एका रहस्यमय नदीबद्दल सांगणार आहोत जिचा रंग वर्षातून एकदाच बदलतो.

जगात अशा अनेक नद्या आहेत ज्या त्यांच्या रहस्यांमुळे प्रसिद्ध आहेत. आज आपण अशा नदीबद्दल जाणून घेणार आहोत जिच्याकडे दूरून पाहिल्यावर असं वाटतं की या नदीत रक्त वाहतंय. हे दृश्यं पाहून अनेकांना त्यांच्या डोळ्यांवर विश्वास बसत नाही. ही नदी पेरू या सुंदर देशात आहे आणि स्थानिक लोक तिला ब्लड रेड रिव्हर किंवा पुकामायू नदी असे नाव देतात.

पेरूतील ही नदी पाहून लोक अनेकदा आश्चर्यचकित होतात. पहिल्यांदाच पाहिल्यावर असं वाटतं की पृथ्वीवर एखादं भयपट दृश्य उभं राहिलं आहे. काही लोक बघून घाबरतात तर काहींना याचं रहस्य जाणून घेण्याची उत्सुकता असते.

या नदीची खास गोष्ट म्हणजे तिचा लाल रंग नेहमीच राहत नाही. हा अद्भुत नजारा फक्त मानसून, म्हणजे पावसाळ्याच्या काळात दिसतो. लोक हा अनुभव घेण्यासाठी दूरदूरून येतात आणि इथे पर्यटकांची मोठी गर्दी दिसते.

ही नदी पेरूच्या रेनबो माउंटन विनीकुंका भागात आहे. हा परिसर त्याच्या नयनरम्यतेसाठी आणि रंगीबेरंगी डोंगरांसाठी खूप प्रसिद्ध आहे. फोटोग्राफर्स आणि निसर्गप्रेमींसाठी ही जागा जणू स्वर्गापेक्षा कमी नाही. या नदीबद्दल स्थानिक लोकांमध्ये अनेक प्रकारच्या मान्यता आहेत.

ही नदी खरोखरच लाल नाही, तर तिचा रंग माती आणि खनिजांमुळे लाल दिसतो. या भागातील मातीमध्ये लोहाचे प्रमाण खूप जास्त आहे. वर्षातून जेव्हा मानसून येतो, तेव्हा लोहयुक्त माती नदीत मिसळून जाते, ज्यामुळे नदीचा रंग रक्तासारखा लाल दिसतो.