लिक्विड गोल्ड : सोन्यापेक्षाही महाग असतं 'या' लाकडाचं तेल, किंमत वाचून व्हाल अवाक्....

By ऑनलाइन लोकमत | Published: April 3, 2020 03:59 PM2020-04-03T15:59:02+5:302020-04-03T16:30:52+5:30

या झाडापासून निघणाऱ्या तेलाला लिक्विड गोल्ड म्हटलं जातं. ज्याची किंमत सोन्यापेक्षाही जास्त असते. आज आम्ही तुम्हाला याचा अगरवुडबाबत काही आश्चर्यकारक गोष्टी सांगणार आहोत.

काही वर्षांपूर्वी इंदिरा गांधी इंटरनॅशनल एअरपोर्टवर दोन लोकांना अगर झाडाचं लाकूड तस्करी करण्यावरून अटक केली होती. त्यांच्याकडून जवळपास 51 लाख रूपयांचे अगरवुड जप्त करण्यात आले होते. अगर झाडाचं लाकूड हे फार महागडं असतं. या झाडापासून निघणाऱ्या तेलाला लिक्विड गोल्ड म्हटलं जातं. ज्याची किंमत सोन्यापेक्षाही जास्त असते. आज आम्ही तुम्हाला याचा अगरवुडबाबत काही आश्चर्यकारक गोष्टी सांगणार आहोत.

अगर वृक्षाच्या बुरशी आलेल्या खोडापासून सुगंधी द्रव्ये बनतात. झाडाच्या ढलप्यांमधून अंशत: तेल काढून घेतल्यानंतर उरलेल्या ढलप्याच्या अगरबत्त्या (उदबत्त्या) बनतात.

तसेच या लाकडाचा वापर चीन, जपान, कोरिया आणि इजिप्तमध्ये धार्मिक कर्मकांडासाठी केला जातो. त्यासोबतच कोरियामध्ये औषधी मद्य तयार करण्यासाठी आणि अरबमध्ये अत्तर तयार करण्यासाठी केला जातो.

असे मानले जाते की, अगरवुडच्या सुगंधाकडे देव आकर्षित होतात. काही मान्यतांनुसार, जिथेही अगरवुडचा सुगंध जातो, तिथे देव प्रकट होतात आणि देव प्रकटल्यावर वाईट आत्मा पळून जातात. त्यामुळे इंग्रजीत याला wood of the gods असं म्हटलं जातं.

दक्षिण पूर्व आशियातील 15 देशांच्या घनदाट जंगलांमध्ये आणि डोंगरांममध्ये या झाडाच्या 26 प्रजाती आढळून येतात. इंडोनेशिया, फिलिपिन्स, पापुआ न्यू गिनिया, मलेशिया, ब्रुनई, भारत, कंबोडिया, सिंगापूर, थायलंड, चीन, बांगलादेश, भूतान, म्यानमार आणि लाओसमध्ये ही झाडे आढळून येतात.

भारतात आसाममध्ये याचं उत्पादन अधिक घेतलं जातं. आसामला अगरवुडचं कॅपिटल ऑफ इंडिया म्हटलं जातं. तिथे साधारण एक लाख लोक अगरवुड ऑइल इंडस्ट्रीवर पोट भरतात. या तेलाचा वापर अत्तर तयार करण्यासाठी केला जातो.

हॉन्गकॉन्गचा चीनी भाषेत अर्थ होतो सुंगधित बंदर. हॉन्ग-कॉन्गच्या या नावामागे अत्तराचा व्यवसाय आहे. पूर्वी हे शहर अत्तराच्या व्यवसायासाठी प्रसिद्ध होतं. आशियात आणि इतरही देशात इथूनच अत्तर निर्यात केलं जायचं. या अत्तरात अगरवुडचं अत्तर सर्वात प्रसिद्ध होतं.

अगरवुडचं लाकडाच्या गोंदातून ऑड तेल काढलं जातं. याच तेलाचा वापर करून नंतर अत्तरासाठी केला जातो.

हे तेल इतकं महाग असतं की, त्याला लिक्विड गोल्ड म्हटलं जातं. ऑड ऑइलची किंमत 50 हजार डॉलर प्रति किलोग्रॅम म्हणजे साधारण 36 लाख रूपये प्रति किलो इतकी असते.

एकतर हे फार दुर्मीळ आहे आणि महागडं आहे. तसेच याचा व्यापारही जोरात आहे. त्यामुळे अनेक लोक डुप्लिकेट अगरवुड तयार करतात. पण ते केवळ एक्सपर्ट लोक किंवा फार जुने व्यापारीच पटवू शकतात.