By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2026 19:56 IST
1 / 7जगभरात लोक संध्याकाळ झाली की, आपल्या घराचे दरवाजे आणि खिडक्यांचे पडदे ओढून घेतात. आपली प्रायव्हसी जपण्यासाठी ही धडपड असते. मात्र, युरोपमधील नेदरलँड्स हा देश याला अपवाद आहे. 2 / 7या देशात लोक आपल्या घरांच्या खिडक्यांना पडदे लावत नाहीत. इतकेच नाही, तर रात्री दिवे लागल्यावर घरातील लोक काय करत आहेत, त्यांचा सोफा कसा आहे, ते जेवणात काय खात आहेत, हे बाहेरून स्पष्ट दिसते. सोशल मीडियावर या 'नो कर्टन कल्चर'ची सध्या मोठी चर्चा रंगली आहे.3 / 7नेदरलँड्समधील लोक आपली खाजगी जिंदगी जगाला दाखवू इच्छितात असे नाही, तर यामागे काही खास ऐतिहासिक, धार्मिक आणि व्यावहारिक कारणे आहेत.4 / 7या परंपरेमागे 'कॅल्विनवाद' ही जुनी धार्मिक विचारधारा असल्याचे मानले जाते. या विचारधारेनुसार, जर तुम्ही प्रामाणिक आणि चांगले जीवन जगत असाल, तर तुमच्याकडे लपवण्यासारखे काहीही नसावे. उघड्या खिडक्या हे पारदर्शकतेचे आणि नैतिकतेचे प्रतीक मानले जातात. 'माझ्या घरात काहीही चुकीचे घडत नाहीये,' हे दाखवण्याचा हा एक मार्ग आहे.5 / 7नेदरलँड्समध्ये हवामान अनेकदा ढगाळ असते आणि हिवाळ्यात सूर्यप्रकाश खूप कमी मिळतो. येथील घरे अरुंद पण खिडक्या मोठ्या असतात. नैसर्गिक प्रकाश जास्तीत जास्त घरात यावा आणि घर मोकळे वाटावे, यासाठी लोक पडदे लावणे टाळतात. पडदे लावल्यास घरात अंधार आणि कोंदटपणा जाणवतो, असे तिथल्या लोकांचे मत आहे.6 / 7दुसऱ्या महायुद्धाच्या काळात जेव्हा नेदरलँड्सवर जर्मन सैन्याचा ताबा होता, तेव्हा रात्रीच्या वेळी 'ब्लॅकआउट'चे कडक नियम होते. खिडक्या पूर्णपणे झाकून ठेवाव्या लागत होत्या. युद्ध संपल्यानंतर आणि स्वातंत्र्य मिळाल्यानंतर, लोकांनी स्वातंत्र्याचा आनंद साजरा करण्यासाठी पडदे कायमचे बाजूला सारले. हा अंधाराकडून प्रकाशाकडे जाण्याचा एक सामाजिक बदल होता.7 / 7उघड्या खिडक्यांचा अर्थ असा नाही की तुम्ही तिथे उभे राहून कोणाच्या घरात डोकावून पाहावे. नेदरलँड्समध्ये कोणाच्या घरात टक लावून पाहणे अत्यंत असभ्य मानले जाते. रस्त्याने चालताना सहज नजर पडणे ठीक आहे, पण थांबून पाहणे चुकीचे मानले जाते. इथली प्रायव्हसी कापडी पडद्यांवर नाही, तर लोकांच्या आपसी समजुतीवर अवलंबून आहे.