जगातील अशी काही ठिकाणं ज्यांवरून उडू शकत नाही विमान!
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 24, 2024 16:00 IST2024-09-24T15:48:27+5:302024-09-24T16:00:56+5:30
No Fly Zones : जगात अशीही काही ठिकाणं आहेत, ज्यांवरून विमान उड्डाण घेऊ शकत नाहीत. त्यांना नो फ्लाय झोन म्हटलं जातं.

एका देशातून दुसऱ्या देशात प्रवास विमानामुळे फारच सोपं झालं आहे. काही तासांमध्ये हजारो किलोमीटरचा प्रवास पूर्ण होतो. विमान सेवेचा आवाकाही दिवसेंदिवस वाढत आहे. पण जगात अशीही काही ठिकाणं आहेत, ज्यांवरून विमान उड्डाण घेऊ शकत नाहीत. त्यांना नो फ्लाय झोन म्हटलं जातं.

नो फ्लाय झोन वेगवेगळ्या कारणांनी बनवले जातात. ज्यात धार्मिक, पर्यावरण, ऐतिहासिक किंवा राजकीय यांचा समावेश असतो. जगातील अशाच काही ठिकाणांबाबत आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

डिज्नी पार्क
फ्लोरिडामध्ये डिज्नी वर्ल्ड आणि कॅलिफोर्नियामध्ये डिज्नीलॅंडच्या ३ हजार फूट परीसरावरून एअरक्राफ्ट उड्डाण घेऊ शकत नाही. सुरूवातीला हा नियम अस्थायी होता, नंतर २००३ मध्ये हा स्थायी करण्यात आला.

10 डाउनिंग स्ट्रीट
हे ब्रिटनच्या पंतप्रधानाचं घर आहे. हा इंग्लंडमधील सगळ्यात शक्तीशाली रस्ता मानला जातो. या रस्त्यावर फिरण्यासाठीही खास परवानगीची गरज पडते. याच्या वरूनही विमानाला उड्डाण घेण्यास मनाई आहे. त्याशिवाय ब्रिटनमधील बकिंघम पॅलेस, विंडसर कॅसल आणि संसद भवनावरूनही विमानांना उड्डाण घेता येत नाही.

वॉशिंग्टन डीसी
वॉशिंग्टन डीसी अमेरिकेची राजधानी आहे. या शहरावरूनही विमान उड्डाण घेऊ शकत नाही. 9/11 च्या हल्ल्यानंतर एफबीआय आणि होमलॅंड सिक्युरीटीने याला नो फ्लाय झोन बनवलं आहे.

माचू पिच्चू
हे ठिकाण दक्षिण अमेरिकेच्या पेरू देशात आहे. हे ठिकाण जुलै २००७ मध्ये जगातील सात आश्चर्यांमध्ये सामिल करण्यात आलं होतं. या ठिकाणावरूनही विमानाला उड्डाण घेण्यास मनाई आहे. १९८१ मध्ये हे ठिकाण पेरूचं ऐतिहासिक देवालय घोषित करण्यात आलं होतं.

मक्का
मक्की जगाभरातील मुस्लिम लोकांसाठी सगळ्यात पवित्र स्थळ आहे. दरवर्षी लाखो भाविक हज यात्रेसाठी या शहरात येतात. या शहरावरूनही विमान उड्डाण घेऊ शकतं. जर कुणी असं केलं त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केली जाते.

















