जगाच्या 'या' ८ समुद्री मार्गांतून होतो ९०% तेलाचा व्यापार; पाहा भारतासाठी कोणता मार्ग महत्त्वाचा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2026 20:16 IST2026-03-15T20:07:02+5:302026-03-15T20:16:26+5:30

जागतिक अर्थव्यवस्थेचे चाक ज्या इंधनावर चालते, त्या कच्च्या तेलाचा प्रवास किती खडतर आणि संवेदनशील मार्गांतून होतो, हे एका ताज्या अहवालातून समोर आले आहे.

जगातील एकूण सागरी तेल व्यापारापैकी ९० टक्क्यांहून अधिक व्यापार हा केवळ ८ समुद्री मार्गांतून होतो. यापैकी एकाही मार्गावर तांत्रिक किंवा युद्धजन्य परिस्थितीमुळे अडथळा निर्माण झाला, तर संपूर्ण जगाचा इंधन पुरवठा ठप्प होऊन महागाईचा भडका उडू शकतो.

समुद्रातील असे अरुंद मार्ग जिथून मोठ्या प्रमाणात मालवाहू जहाजे आणि तेलाचे टँकर्स जातात, त्यांना 'चोकपॉईंट्स' म्हणतात. या मार्गांची सुरक्षा जागतिक ऊर्जा सुरक्षेसाठी अत्यंत महत्त्वाची आहे.

मलाक्का सामुद्रधुनी: हा जगातील सर्वात महत्त्वाचा मार्ग असून, एकूण जागतिक तेल व्यापारापैकी २९.१% (सुमारे २३.२ दशलक्ष बॅरल दररोज) वाहतूक येथून होते. भारताच्या पूर्व बाजूला असलेला हा मार्ग अंदमान समुद्राला दक्षिण चीन समुद्राशी जोडतो. अंदमान आणि निकोबार बेटांच्या सानिध्यात हा मार्ग असल्याने भारताचे या क्षेत्रावर नियंत्रण आहे.

हॉर्मुझ सामुद्रधुनी: आखाती देशांमधील तेलासाठी हा मुख्य मार्ग आहे. जागतिक व्यापारात याचा वाटा २६.२% असून दररोज २०.९ दशलक्ष बॅरल तेलाची ने-आण येथून केली जाते.

केप ऑफ गुड होप: आफ्रिकेच्या दक्षिण टोकाकडून होणारी ही वाहतूक ११.४% वाटा उचलते, ज्यातून दररोज ९.१ दशलक्ष बॅरल तेल जाते.

डॅनिश सामुद्रधुनी: युरोपमधील या मार्गाचा वाटा ६.१% असून येथून दररोज ४.९ दशलक्ष बॅरल तेल वाहतूक होते.

सुएझ कालवा: इजिप्तमधील या ऐतिहासिक मार्गावरूनही दररोज ४.९ दशलक्ष बॅरल तेल जाते, ज्याचा जागतिक वाटा ६.१% आहे.

बाब अल-मंदेब: लाल समुद्राला जोडणाऱ्या या मार्गाचा वाटा ५.३% असून येथून ४.२ दशलक्ष बॅरल तेलाची रोज वाहतूक होते.

टर्किश सामुद्रधुनी : या मार्गावरून जागतिक व्यापाराच्या ४.६% म्हणजेच ३.७ दशलक्ष बॅरल तेलाची ने-आण केली जाते.

पनामा कालवा : अमेरिकन खंडांना जोडणाऱ्या या मार्गाचा वाटा २.९% असून येथून २.३ दशलक्ष बॅरल तेल दररोज वाहून नेले जाते.