अद्भूत, दुर्मिळ! तापलेल्या सहारा वाळवंटावर बर्फवृष्टी; सौदी अरेबियाचे तापमानही घसरले

By ऑनलाइन लोकमत | Published: January 18, 2021 12:53 PM2021-01-18T12:53:13+5:302021-01-18T12:59:55+5:30

Snowfall in Sahara desert : सहारा वाळवंटाच्या रेतीवर बर्फ पडल्याचे काही फोटो समोर आले आहेत. जियो टीव्हीनुसार सौदी अरेबियाच्या असीर क्षेत्रात ही बर्फवृष्टी पहायला मिळाली आहे. यामुळे याठिकाणी मोठ्या प्रमाणावर स्थानिक आणि विदेशी पर्यटक येऊ लागले आहेत.

जगभरात अनेक असे भाग आहेत जिथे जानेवारी महिन्यात कडाक्याची थंडी पडते. याचबरोबर बर्फवृष्टीही होते. मात्र, कधी सहारा वाळवंटात बर्फ पडल्याचे ऐकले आहे का? यंदा असा दुर्मिळ प्रकार घडला आहे.

आफ्रिकेच्या सहारा वाळवंटात जोरदार बर्फवृष्टी झाली आहे. तसेच सौदी अरेबियाचे तापमान हे उणे दोन अंश सेल्सिअसवर गेले आहे. या दोन्ही ठिकाणची नेहमी तापलेली असणारी रेती पांढऱ्या चादरने झाकली गेली आहे.

सहारा वाळवंटाच्या रेतीवर बर्फ पडल्याचे काही फोटो समोर आले आहेत. जियो टीव्हीनुसार सौदी अरेबियाच्या असीर क्षेत्रात ही बर्फवृष्टी पहायला मिळाली आहे. यामुळे याठिकाणी मोठ्या प्रमाणावर स्थानिक आणि विदेशी पर्यटक येऊ लागले आहेत.

सोशल मीडियावर याचा एक व्हिडीओदेखील व्हायरल झाला आहे. यामध्ये या भागात बर्फवृष्टी होताना दिसत आहे. हिवाळ्यात या ठिकाणी बर्फवृष्टी होत नाही.

सहाराच्या अईन सेफराला वाळवंटाचे द्वार समजले जाते. समुद्रसपाटीपासून जवळपास १००० मीटर उंचीवर हा भाग आहे. या भागाला अॅटलस पर्वतांनी घेरलेले आहे. गेल्य़ा हजारो वर्षांत येथील तापमानात मोठा बदल दिसून आला आहे.

अइन सेफरा भाग सध्या पाण्याच्या थेंबासाठी झगडत आहे. मात्र, १५००० वर्षांनी या वाळवंटात पुन्हा हिरवळ येण्याची शक्यता वर्तविली जात आहे. तर दुसरीकडे सौदी अरबच्या असीर प्रांतात झालेल्या दुर्मिळ बर्फवृष्टीमुळे येथील लोकांमध्ये उत्सुकता आणि आनंद आहे.

या भागात ५० वर्षांनी एवढे कमी तापमान नोंदविले गेले आहे. तेथील बर्फातून उंट सवारीचे फोटोदेखील व्हायरल होत आहेत.

वाळवंटी भागात बर्फवृष्टी तशी विरळच पहायला मिळते. येथे रात्रीचे तापमान अचानक खाली जाते आणि दुसऱ्या दिवशी पडलेला बर्फ वितळतो.

सहाराच्या वाळवंटात गेल्या ४० वर्षांत तीनदा बर्फवृष्टी झालेली आहे. ही येथील पहिलीच वेळ नसली तरीही अतिदुर्मिळ असल्याने स्थानिकांमध्ये उत्साह आहे.

सहाराच्या वाळवंटात वेगवेगळ्या ठिकाणी २०१८, २०१७ आणि १९८० मध्ये बर्फवृष्टी झाली होती. जानेवारीमध्ये येथील तापमान १२ डिग्री सेल्सिअसवर राहते. जुलैमध्ये हे तापमान ४० अंशांवर जाते.