आता चीन-अमेरिकेत टेन्शन वाढणार? ट्रम्प यांचा दौरा अचानक रद्द; होर्मुझवरून रणकंदन पेटणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2026 16:11 IST2026-03-18T16:06:35+5:302026-03-18T16:11:54+5:30

अमेरिका-इस्रायलविरुद्ध इराण युद्धात ट्रम्प रोज नवनवीन डाव टाकत आहेत. इराण इस्रायल युद्धामुळे जगातील अनेक छोट्या मोठ्या देशांना फटका बसत आहे. चीनसाठीही हे मोठं संकट आहे. परंतु या युद्धात अमेरिकेच्या भूमिकेबाबत चीननं मौन बागळणे पसंत केले. परंतु आता चीन पलटवार करणार का असा प्रश्न विचारला जात आहे.

अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांचा नियोजित चीन दौरा रद्द केला आहे. ३१ मार्च ते २ एप्रिल २०२६ या काळात ट्रम्प चीन दौऱ्यावर होते. हा दौरा यशस्वी करण्यासाठी दोन्ही देशांमध्ये राजनैतिक चर्चा सुरू होती. डोनाल्ड ट्रम्प बीजिंगमध्ये शी जिनपिंग यांना भेटणार होते.

मात्र आता अमेरिकन प्रशासनाकडून ट्रम्प यांचा चीन दौरा सहा आठवड्यांसाठी स्थगित केल्याचे सांगण्यात आले आहे. ट्रम्प शी जिनपिंग यांच्याशी चर्चा करून हा दौरा पुढे ढकलतील. परंतु अचानक दौरा रद्द करण्यामागे ट्रम्प यांनी कुटनिती असल्याचं बोलले जाते. युद्धात चीनवर दबाव बनवण्यासाठी अमेरिकेकडून हा दौरा रद्द करण्याचा निर्णय घेतला गेला असं सांगितले जाते.

ट्रम्प यांनी अलीकडेच स्ट्रेट होर्मुझ या सागरी मार्गाला इराणी हल्ल्यापासून सुरक्षित ठेवण्यासाठी चीनसह अनेक देशांची मदत मागितली आहे. चीन, जपान, दक्षिण कोरियासारख्या देशांनी अमेरिकेचे आभार मानले पाहिजेत कारण अमेरिका इराणी हल्ल्यातून त्यांच्या तेल पुरवठ्याचे रक्षण करत आहे असं ट्रम्प यांनी म्हटलं. चीन युद्धनौका पाठवण्यास इच्छुक नाही यावर ट्रम्प यांनी आश्चर्य व्यक्त केले.

आता डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांचा चीन दौरा रद्द केल्यामुळे चीनदेखील आपला डाव टाकू शकतो. इराणवरील सततचे हल्ले आणि कच्च्या तेलाच्या किमतीत झालेली मोठी वाढ यातही चीन आतापर्यंत शांत राहिला होता. ट्रम्प यांच्या दौऱ्यात शुल्क, चिप तंत्रज्ञान, गुंतवणुकीवरील निर्बंध आणि पुरवठा साखळी या विषयांवर चर्चा होणार होती. चीनने रशिया आणि इराणकडून कमी तेल खरेदी करावे असं अमेरिकेची इच्छा आहे परंतु निर्बंध असूनही चीन या दोन देशांकडून स्वस्त तेल खरेदी करत आहे.

खरं तर ब्रेंट क्रूड तेलाची किंमत सध्या प्रति बॅरल सुमारे १०२ डॉलर आहे. चीन हा कच्च्या तेलाचा सर्वात मोठा आयातदार देश असून त्यानंतर भारताचा क्रमांक लागतो. चीनने जागतिक मुद्द्यांवर थेट भाष्य करणे नेहमीच टाळले आहे आणि चीनकडे अनेक महिन्यांचा कच्च्या तेलाचा साठा आहे.

चीनला चिंता का वाटत नाही? - चीनकडे कच्च्या तेलाचा मोठा साठा आहे. गेल्या काही वर्षांपासून तो आपला साठा सातत्याने वाढवत आहे. चीनकडे अंदाजे चार महिन्यांच्या गरजेइतके कच्चे तेल उपलब्ध आहे असा अंदाज वर्तवला जातो. त्यामुळे किमती अचानक वाढल्या तरी तो घाबरत नाही. चीनकडे अंदाजे ९० कोटी बॅरल सामरिक तेल साठा असल्याचे मानले जाते. हा साठा त्याच्या अंदाजे १२० दिवसांच्या आयातीची गरज भागवू शकतो.

इतर ऊर्जा पर्यायांवर लक्ष केंद्रित करणे - चीनने सौदी अरेबिया आणि यूएई सारख्या अनेक तेल-उत्पादक देशांशी दीर्घकालीन करार केले आहेत. या करारांनुसार किमती अनेकदा स्पॉट मार्केटपेक्षा कमी अस्थिर असतात. तेलाच्या किमती जास्त वाढल्यास चीन आयात कमी करून आपल्या साठ्याचा वापर करू शकतो.

शिवाय तेलावरील आपले अवलंबित्व कमी करण्यासाठी चीनने कोळसा, वायू, अणुऊर्जा आणि हरित ऊर्जेमध्ये मोठी गुंतवणूक केली आहे. त्यामुळे तेलाच्या किमती वाढण्याचा चीनच्या एकूण अर्थव्यवस्थेवर होणारा परिणाम मर्यादित आहे.

चीन दररोज किती तेल आयात करतो? - २०२५ मध्ये चीनने अंदाजे ५५७.७ मिलियन टन कच्च्या तेलाची आयात केली, जे सरासरी दररोज सुमारे ११.५ मिलियन बॅरल इतके होते. २०२४ मध्ये हा आकडा दररोज अंदाजे ११.१ मिलियन बॅरल होता. गेल्या काही महिन्यांत आयातीने दररोज १२-१३ मिलियन बॅरलचा टप्पा गाठला आहे, जो स्वतःच एक विक्रम आहे. याचा अर्थ असा की, सागरी मार्गाने होणाऱ्या जगातील तेलाच्या व्यापाराचा एक महत्त्वपूर्ण हिस्सा एकटा चीन खरेदी करतो. तरीही वाढत्या किमतींवर तो मौन बाळगतो.

















