कोण होता George Floyd? ज्याच्या मृत्यूमुळे अमेरिकेत सुरू झालं हिंसक आंदोलन!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 2, 2020 11:07 AM2020-06-02T11:07:58+5:302020-06-02T11:23:29+5:30

मिनेसोटा येथे 46 वर्षीय जॉर्ज फ्लॉयड याचा मृत्यू झाल्यानंतर संपूर्ण अमेरिकेत आंदोलनाची लाट उसळली आहे. पोलीस आणि प्रशासनाविरोधात तेथील नागरिक प्रचंड आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहेत.

25मे पासून अमेरिकेच्या मिनियापोलिस शहरातील पोलिसांविरोधात सुरू झालेल्या या आंदोलनाला जगभरातून पाठींबा मिळताना दिसत आहे. क्रीडा विश्वातही जॉर्ज फ्लॉयडच्या मृत्यूचा निषेध नोंदवला जात आहे.

25 मे 2020 या दिवशी मिनियापोलीस पोलिसांनी जॉर्ज फ्लॉयड याला बनावट नोटा बनवण्या प्रकरणी अटक केली. पण, एका पोलीस अधिकाऱ्यानं त्याची मान जवळपास आठ मिनिटे गुडघ्यानं दाबून ठेवली आणि त्यामुळे त्याला श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. त्यात त्याचा मृत्यू झाला.

जॉर्जच्या मृत्यूनंतर लोकं रस्त्यावर उतरली. जॉर्जनं एवढा गंभीर गुन्हा केला होता का, की पोलिसांनी त्याच्याशी अशी वागणुक केली. कोण होता हा जॉर्ज फ्लॉयड, त्याच्या मृत्यूनंतर अमेरिकेत इतके हिंसक आंदोलन का सुरू झाले? चला शोधूया या प्रश्नांची उत्तरं...

46 वर्षीय जॉर्ज फ्लॉयडचा जन्म उत्तर कॅरोलीना येथे झाला होता आणि तो ह्यूस्टन येथे राहत होता. कामानिमित्त तो मिनियापोलिस येथे जात होता. तेथील एका रेस्टॉरंटमध्ये सिक्युरिटी गार्ड म्हणून तो काम करायचा.

जॉर्ज पाच वर्षांपासून तेथे काम करत आहे आणि मालकाच्याच घरी भाड्यानं राहत होता. त्याला 'बिग फ्लॉयड' या नावानंही ओळखलं जाचयं. त्याला सहा वर्षांची मुलगी होती आणि ती आईसोबत ह्यूस्टन येथे राहत होती. तो एक चांगला बाप होता, असं त्याच्या पत्नीनं सांगितलं.

त्याला मिनियापोलीस शहर फार आवडायचे. त्याला ह्यूस्टन सोडून मिनियापोलीस येथे राहायला जायचे होते. त्यानं शिक्षण अर्धवट सोडून हिप-हॉप म्युझिक बँड जॉईन केला होता.

पण, 25 मे 2020मध्ये मिनियापोलीस शहरातील पोलिसांनी जॉर्ज फ्लॉयडला अटक केली. जॉर्जने 20 डॉलर म्हणजे जवळपास 1500 रुपयांच्या बनावट नोटांनी व्यवहार केल्याचे एका किराणा दुकादारानं पोलिसांना सांगितले.

2007मध्ये जॉर्ज फ्लॉयडला एका घरावर हल्ला केल्याप्रकरणी पाच वर्षांची शिक्षा झाली होती. पण, 2009 त्याला जामीनावर सोडण्यात आले.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या फोटोत पोलीस अधिकारी डॅरेक चौव्हिन यांनी आपल्या गुडघ्यानं जॉर्ज फ्लॉयडची मान दाबल्याचे दिसत आहे. त्याच्यावर बनावट नोट दिल्याचा आरोप होता.

त्याला श्वास घेण्याचा त्रात झाला आणि त्यात त्याचा मृत्यू झाला. शवविच्छेदानाच्या अहवालानुसार श्वास गुदमरल्यानं त्याचा मृत्यू झाला.

डॅरेक चौव्हिनवर थर्ड डिग्री हत्या आणि सेकंड डिग्री मानवहत्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेनंतर कृष्णवर्णीय समुदायाची निदर्शने अधिक तीव्र होताना दिसत आहेत.

क्रीडा विश्वातूनही या घटनेचा निषेध केला जात आहे.

Read in English