कोण आहेत जुबैदा रहमान? वाईट काळातही दिली तारिक रहमान यांना साथ; इंटरेस्टिंग आहे बांगलादेशच्या होणाऱ्या पंतप्रधानांची 'Love Story'
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2026 18:09 IST2026-02-13T17:54:03+5:302026-02-13T18:09:08+5:30
Tariq Rahman Love Story : बीएनपीचे (BNP) कार्यवाह अध्यक्ष तारिक रहमान, जेव्हा पत्नी डॉ. जुबैदा आणि कन्या झायमा रहमान यांच्यासह तब्बल १७ वर्षांनंतर ढाक्यात पोहोचले, तेव्हा त्यांच्या समर्थकांमध्ये जबरदस्त उत्साह दिसून आला होता...

बांगलादेशचे राजकारण आता एका निर्णयक वळणावर येऊन उभे ठाकले आहे. शेख हसीना यांची सत्ता गेल्यानंतर आणि नुकत्याच झालेल्या निवडणुकांनंतर, बांगलादेशात नव्या नेतृत्वासंदर्भात चर्चा होऊ लागली आहे.

तब्बल १७ वर्षांनंतर, मायदेशी परतलेले तारीक रहमान हे या चर्चेच्या केंद्रस्थानी आहेत. याशिवाय, त्यांच्या या प्रवासात त्यांना खंबीर साथ देणाऱ्या त्यांच्या पत्नी डॉ. जुबैदा रहमान यादेखील सध्या चर्चेत आहेत.

बीएनपीचे (BNP) कार्यवाह अध्यक्ष तारिक रहमान, जेव्हा पत्नी डॉ. जुबैदा आणि कन्या झायमा रहमान यांच्यासह तब्बल १७ वर्षांनंतर ढाक्यात पोहोचले, तेव्हा त्यांच्या समर्थकांमध्ये जबरदस्त उत्साह दिसून आला होता.

माध्यमांतील वृत्तांनुसार, येते पोहोचल्यानंतर, डॉ. जुबैदा त्यांच्या वडिलांच्या धनमंडी येथील निवासस्थानी थांबल्या. खरे तर २००८ मध्ये कायदेशीर आणि राजकीय वादांमुळे हे तारिक कुटुंब लंडनला निघून गेले होते.

जुबैदा रहमान यांचा जन्म १८ मे १९७२ रोजी सिलहट येथे झाला. त्यांनी ढाका मेडिकल कॉलेजमधून एमबीबीएस पूर्ण केले. ३ फेब्रुवारी १९९४ रोजी त्यांनी तारिक रहमान यांच्याशी लग्न केले. यानंतर १९९५ मध्ये बीसीएस कॅडर परीक्षेत प्रथम क्रमांक पटकावून सरकारी सेवेत रुजू झाल्या.

२००८ मध्ये स्टडी लिव्हवर लंडनमध्ये असताना प्रतिकूल राजकीय परिस्थितीमुळे त्यांना सरकारी सेवेतून बडतर्फ करण्यात आले. मात्र, यानंतरही त्यांनी आपले शिक्षण पुढे सुरू ठेवत 'इम्पीरियल कॉलेज'मधून मेडिसिनमध्ये पदव्युत्तर पदवी मिळवली.

राजकीय पार्श्वभूमी असलेल्या कुटुंबातून त्या येतात; त्यांचे वडील रिअर ॲडमिरल महबूब अली खान हे नौदल प्रमुख आणि मंत्रीही राहिले आहेत.

१९७१ च्या मुक्ती युद्धाचे कमांडर-इन-चीफ जनरल एमएजी उस्मानी, हे त्यांचे काका होते. यामुळे त्यांना लहानपणापासूनच राष्ट्रीय राजकारण आणि प्रशासकीय व्यवस्था जवळून पाहण्याची संधी मिळाली.

भ्रष्टाचार विरोधी आयोगाने २००८ मध्ये, झुबैदा, त्यांचे पती आणि सासू यांच्याविरुद्ध, ज्ञात उत्पन्नाच्या स्रोतांपेक्षा अधिक संपत्ती असल्याचा खटला दाखल केला होता. यात त्यांना ढाक्यातील एका न्यायालयाने तीन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा आणि 35 लाख टका दंड ठोठावला होता. मात्र, अवामी लीग सरकारच्या पतनानंतर त्यांची शिक्षा स्थगित करण्यात आली.

तारिक रहमान यांच्यावर मनी लाँड्रिंग आणि माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्या हत्येचा कट रचणे,आदी गंभीर गुन्ह्यांचा आरोप देखील ठेवण्यात आला होता, यामुळे त्यांना बराच काळ परदेशात राहावे लागले.

महत्वाचे म्हणजे, ६३०० दिवसांहून अधिक काळ देशाबाहेर राहिल्यानंतर, रहमान कुटुंबाचे पुन्हा बांगलादेशात परतणे, याकडे मोठ्या बदलाचे संकेत म्हणून बघितले जात आहे. यामुळे आता तारिक रहमान यांचे नेतृत्व आणि डॉ. जुबैदा यांची सक्रिय उपस्थिती बांगलादेशचे राजकारण कोणत्या वळणार घेऊन जातात, हे बघण्यासारखे असेल.

तारिक रहमान

















