स्वत:चं नग्न छायाचित्र दाखवलं संसदेत, खासदार लॉरा मॅकक्लूर यांनी सगळ्यांना दिला धोक्याचा इशारा
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2025 20:15 IST2025-06-07T20:08:22+5:302025-06-07T20:15:33+5:30
Who is Laura Mcclure: फोटो दाखवणाऱ्या महिलेचे नाव आहे लॉरा मॅकक्लूर. त्या खासदार आहेत आणि त्यांनी संसदेत नव्या तंत्रज्ञानामुळे येऊ घातलेल्या नव्या गंभीर धोक्याकडे लक्ष वेधून घेतलं. त्यासाठी त्यांनी स्वतःचाच एआयने बनवलेला नग्न फोटो संसदेत दाखवला.

'मी दाखवते आहे ते माझं स्वतःचंच नग्न छायाचित्र आहे. पण ते छायाचित्र खरं नाही. एआय आणि डीपफेकचा वापर करून हे छायाचित्र तयार करण्यात आलं आहे. त्याचा कुठेही आणि कसाही वापर होऊ शकतो, याकडे मला सगळ्यांचं लक्ष वेधायचं आहे.

तंत्रज्ञान ही समस्या नसून तिचा अशा प्रकारे होणारा गैरवापर ही समस्या आहे,' असं म्हणत एका महिलेने देशाच्या संसदेत उभं राहून तंत्रज्ञानाच्या गैरवापराविरोधात आवाज उठवत खंबीर भूमिका घेतली आहे. लॉरा मॅकक्लूर त्यांचं नाव. त्या न्यूझीलंडच्या खासदार आहेत.

एआय आणि डीपफेकसारख्या तंत्रज्ञानाचा गैरवापर आज जागतिक चिंतेचा विषय ठरत आहे. त्याकडे लक्ष वेधण्यासाठी लॉरा मॅकक्लूर यांनी या तंत्राचा वापर करून स्वतःचं नग्न छायाचित्र तयार केलं. ते करणं किती सोपं आणि त्यामुळेच ते किती धोकादायकही आहे याबाबत त्यांनी संसदेत कळकळीनं भाष्य केलं.

तरुण मुली आणि महिलांच्या सुरक्षिततेवर हे तंत्रज्ञान घाला घालणारं आहे, म्हणून तंत्रज्ञानाच्या वेगाबरोबर आपल्या कायद्यांनीही स्पर्धा करायला हवी असं मत मॅकक्लूर यांनी व्यक्त केलंय.

तंत्रज्ञानाने घेतलेली ही प्रचंड झेप अत्यंत भीतिदायक असून, याकडे गांभीर्याने पाहिलं जाणं आवश्यक आहे, या परिस्थितीशी तोंड द्यायला आपले कायदेही अधिकाधिक कडक असायला हवेत, अशी मागणी त्यांनी केली आहे.

लॉरा या न्यूझीलंडमधील उजव्या विचारांचं प्रतिनिधित्व करणाऱ्या एसीटी न्यूझीलंड या पक्षाच्या प्रतिनिधी आहेत. २०२० पासून त्या या पक्षाशी कार्यकर्ता म्हणून जोडल्या गेल्या. २०२३ मध्ये झालेल्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये त्या खासदार म्हणून निवडल्या गेल्या.

एका मुलाखतीत 'आपलं राजकारणात येणं हे अचानक आणि उत्स्फूर्त असल्याचं' त्यांनी म्हटलं आहे. आजपासून दहा वर्षापूर्वी मी राजकारणात जाईन अशी भविष्यवाणी कुणी केली असती तर मी हसण्यावारी नेलं असतं, असंही त्या म्हणतात.

















