Afghanistan Taliban Crisis: अफगाणिस्तानवर ताबा मिळवणारे तालिबानी कोण आहेत? कुठून येतो पैसा आणि रसद?

By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2021 09:59 AM2021-08-16T09:59:41+5:302021-08-16T10:10:55+5:30

Afghanistan Taliban Crisis: अफगाणिस्तानवर ताबा मिळवणारे आणि अमेरिकेसारख्या बलाढ्य महासत्तेला जोरदार टक्कर देणारे तालिबानी नेमके आहेत तरी कोण? तालिबानकडे एवढा पैसा कुठून येतो? जाणून घेऊया...

भारत एकीकडे १५ ऑगस्ट रोजी ७५ वा स्वातंत्र्यदिन साजरा करत असताना, दुसरीकडे मात्र तालिबानने अफगाणिस्तानच्या काबुलमध्ये प्रवेश केला. यानंतर अफगाणिस्तानचे राष्ट्राध्यक्ष अशरफ घनी यांनी देश सोडला. अशरफ घनी सध्या ओमान येथील अमेरिकन एअरबेसवर असून, लवकरच ते अमेरिकेत जातील, असे सांगितले जात आहे.

अफगाणिस्तानवर ताबा मिळवणारे आणि अमेरिकेसारख्या बलाढ्य महासत्तेला जोरदार टक्कर देणारे तालिबानी नेमके आहेत तरी कोण? तालिबानकडे एवढा पैसा कुठून येतो? त्यांना रसद कोण पुरवत? जाणून घेऊया...

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन (Joe Biden) यांनी आपल्या सैन्याच्या, तसंच आपल्या नेतृत्वाखालच्या आंतरराष्ट्रीय सैन्याच्या फौजा अफगाणिस्तानमधून (Afghanistan Taliban Crisis) मागे घेण्याची घोषणा केली आणि मे महिन्याच्या अखेरीपासून अफगाणिस्तानमध्ये तालिबान पुरस्कृत हिंसाचार वाढू लागला. गेल्या काही दिवसांत तर या हिंसाचाराचे प्रमाण वाढले असून, दोन-तृतीयांश अफगाणिस्तानवर तालिबानने पुन्हा कब्जा केला आहे.

सन १९८० च्या दशकात जेव्हा सोव्हियत संघाने अफगाणिस्तानमध्ये फौज उतरवली होती, तेव्हा अमेरिकेनेच त्या ठिकाणी असलेल्या मुजाहिद्दीनांना हत्यारे आणि प्रशिक्षण देत युद्धासाठी प्रवृत्त केले होते. अमेरिकेच्या प्रभावामुळे तालिबानचा उदय १९९० च्या दशकात उत्तर पाकिस्तानमध्ये झाला. सोव्हिएत संघाच्या फौजा अफगाणिस्तानमधून माघारी गेल्यानंतर तालिबानने अफगाणिस्तानच्या कंदहार शहराला आपले पहिले केंद्र बनवले. तालिबानने २० वर्षानंतर पुन्हा एकदा कंदहार शहराचा ताबा घेतला आहे. अफगाणिस्तानमध्ये कधीकाळी सोव्हिएत संघाच्या फौजा होत्या. यांविरोधात लढणाऱ्या कट्टरतावाद्यांचा कंमाडर मुल्ला मोहम्मद उमर यांने पुढे तालिबानची स्थापना केली.

तालिबानच्या सदस्यांनी पाकिस्तानमधील मदरशांमध्ये शिक्षण घेतले होते. सध्या सुरू असलेल्या लढाईत तालिबानला पाकिस्तान मदत करत असल्याचे म्हटले जात आहे. पश्तून भाषेत तालिबानचा अर्थ विद्यार्थी असा होतो. सन १९९४ मध्ये ओमरने कंदहारमध्ये तालिबानची स्थापना केली. त्यावेळी त्याच्याकडे ५० समर्थक सदस्य होते.

सोव्हिएतच्या फौजा अफगाणिस्तानमधून गेल्यानंतर अफगाणिस्तानमध्ये गृहयुद्ध सुरू होते. तर, दुसरीकडे अस्थिरता, गुन्हेगारी आणि भ्रष्टाचारामुळे सामान्य अफगाण नागरीक त्रस्त होते. त्यावेळी तालिबानने या सर्व त्रासातून मुक्त करून चांगले दिवस आणण्याचे आश्वासन लोकांना दिले. अफगाण नागरिक बदलाच्या अपेक्षेत होते.

सप्टेंबर १९९५ मध्ये इराण सीमेला लागून असलेल्या हेरात प्रांतावर तालिबानने ताबा मिळवला. त्यानंतर पुढील वर्षी कंदहारला आपल्या ताब्यात घेतले. त्यानंतर राजधानी काबूलवर नियंत्रण मिळवले. तालिबानने राष्ट्रपती बुरहानुद्दीन रब्बानी यांना सत्तेवरून हटवले. सन १९९८ पर्यंत तालिबानने ९० टक्के अफगाणिस्तानवर ताबा मिळवला.

अमेरिकेतील वर्ल्ड ट्रेड सेंटर इमारतींवर सप्टेंबर २००१ मध्ये अल कायदाने दहशतवादी हल्ला केला. या हल्ल्याचा सूत्रधार ओसामा बिन लादेनला तालिबानने आश्रय दिला होता. अमेरिकेने लादेनला सोपवण्याची मागणी तालिबानकडे केली होती. मात्र, त्यांनी नकार दिला. त्यानंतर अमेरिकेने अफगाणिस्तानमध्ये घुसून मुल्ला उमरचे तालिबानी सरकार पाडले. अनेक तालिबानी नेते पाकिस्तानमध्ये पळून गेले. पाकिस्तानमधून त्यांनी अफगाणिस्तानमध्ये परतण्यासाठीचे नियोजन आखण्यास सुरुवात केली.

बीबीसीने दिलेल्या वृत्तानुसार, NATO च्या अहवालानुसार, तालिबान आधीच्या तुलनेत अधिक सशक्त झाला आहे. तालिबानमध्ये जवळपास ८५ हजार दहशतवादी आहेत. दोन दशकानंतर अफगाणिस्तानमधून अमेरिकेने माघार घेण्याचे जाहीर केले. अमेरिकेची ही घोषणा आपला विजय असल्याचे तालिबानने म्हटले होते.

तालिबानने अफगाणिस्तानवर पुन्हा सत्ता प्रस्थापित करण्यासाठी एक रणनीती आखून ते वाटचाल करत आहेत. तालिबानी संघटनेमध्ये आणि त्या संघटनेच्या बंडखोरांमध्ये मात्र बराच बदल झाल्याचे निरीक्षण नोंदवले जात आहे. हा बदल तालिबानकडे मोठ्या प्रमाणावर आलेल्या संपत्तीमुळे असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. एका माहितीनुसार, अमेरिकेने सोव्हिएत संघाला शीतयुद्धात मात देण्यासाठीच तालिबानच्या स्थापनेला छुपा पाठिंबा दिला. एवढेच नव्हे, तर अत्याधुनिक शस्त्रास्त्रे आणि पैसा पाकिस्तानच्या माध्यमातून पोहोचवण्याचे काम अमेरिकेने केल्याचे सांगितले जाते.

सन २०१६ मध्ये फोर्ब्जने जगभरातील सर्वांत श्रीमंत अशा दहा दहशतवादी संघटनांची यादी जाहीर केली होती. त्यात आयसिस (ISIS) ही संघटना पहिल्या स्थानावर होती. त्या संघटनेची वार्षिक उलाढाल तब्बल दोन अब्ज अमेरिकी डॉलर एवढी होती. त्या यादीत तालिबान ही संघटना पाचव्या स्थानावर होती. तिची तेव्हाची वार्षिक उलाढाल ४०० दशलक्ष डॉलर्स एवढी होती. अंमली पदार्थांची तस्करी, सुरक्षेच्या नावाखाली खंडणीची वसुली हे तालिबानच्या उत्पन्नाचे प्रमुख स्रोत असल्याचे फोर्ब्जने म्हटले होते.

'नाटो'च्या एका गोपनीय अहवालात दिलेल्या माहितीनुसार, २०१९-२० मध्ये तालिबानचे वार्षिक बजेट १.६ अब्ज डॉलर्स एवढे होते. म्हणजेच २०१६ च्या तुलनेत तालिबानची कमाई तब्बल ४०० टक्क्यांनी वाढली असल्याचे यावरून दिसून येते. तसेच, तालिबान स्वतंत्र सैन्य उभारण्याच्या दृष्टीने स्वयंसिद्ध बनण्याची धडपड करत असल्याचेही 'नाटो'च्या त्या गुप्त अहवालात म्हटले होते.

या अहवालातल्या माहितीनुसार, २०१९-२० या आर्थिक वर्षात तालिबानला खाणकामातून ४६४ दशलक्ष डॉलर्स, अंमली पदार्थांच्या उलाढालीतून ४१६ दशलक्ष डॉलर्स, विदेशी देणग्यांतून २४० दशलक्ष डॉलर्स, खंडणीतून १६० दशलक्ष डॉलर्स आणि रिअल इस्टेटमधून ८० दशलक्ष डॉलर्स एवढी कमाई मिळाली. परदेशी देणग्यांवरचे आपले अवलंबित्व कमी करण्याचे तालिबानचे प्रयत्न सुरू होते.

तालिबानचे सन २०२० पर्यंत विदेशी देणग्यांचे प्रमाण एकूण कमाईच्या १५ टक्क्यांपर्यंत खाली उतरले होते. अफगाणिस्तानच्या सरकारचा पाडाव करून तिथे पुन्हा कडक इस्लामिक कायदा लागू करण्याचा तालिबानचा मानस आहे. सत्ता असताना महिला आणि मुलींच्या शिक्षणावर, त्यांनी नोकरी करण्यावर बंदी आणली होती. अफगाणिस्तानातील ज्या प्रांतांवर तालिबानने कब्जा मिळवला आहे, तिथे महिलांवर पुन्हा बंधने आणली जाऊ लागली आहेत.

Read in English