‘आम्ही भारतासोबत ३ युद्ध लढली, पाकिस्तानला धडा मिळलाय,’ आर्थिक डबघाईला आलेल्या पाकच्या पंतप्रधानांना उपरती

By ऑनलाइन लोकमत | Published: January 17, 2023 09:08 AM2023-01-17T09:08:49+5:302023-01-17T09:21:48+5:30

भारताचा शेजारी देश पाकिस्तान सध्या आर्थिक डबघाईला आला आहे. अखेर पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी आता मोठं वक्तव्य केलंय.

भारताचा शेजारी देश पाकिस्तान सध्या आर्थिक डबघाईला आला आहे. पाकिस्तान आतापर्यंतच्या सर्वात वाईट आर्थिक परिस्थितीतून जात आहे. या आर्थिक संकटाच्या काळात पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांचं भारताबाबतचे वक्तव्य समोर आलंय. आम्ही (पाकिस्तान) भारतासोबत तीन युद्धं लढली असून त्यातून पाकिस्ताननं धडा घेतला असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

शाहबाज शरीफ यांनी अल अरेबिया टीव्हीला एक मुलाखत दिली. भारत आणि पाकिस्तान हे शेजारी आहेत आणि दोघांना एकमेकांसोबत राहायचं आहे, असं शाहबाज शरीफ म्हणाले. आपण शांततेने राहावे, प्रगती करावी की एकमेकांनी भांडून आपला वेळ आणि संसाधने वाया घालवावी असंही त्यांनी नमूद केलं.

भारतासोबत आमची तीन युद्धे झाली आणि त्यामुळे केवळ गरिबी आणि बेरोजगारी आली. आम्ही आमचा धडा शिकलो आहोत. आम्हाला आता शांततेनं जगायचं आहे आणि आमचे प्रश्न सोडवायचं आहेत, असं शरीफ यांनी स्पष्ट केलं.

आम्हाला गरीबी संपवायची आहे. देशात आनंदाचं वातावरण आणायचंय. आमच्या लोकांना चांगलं शिक्षण, उत्तम आरोग्य सुविधा आणि रोजगार द्यायचाय. आमची संसाधनं बॉम्ब आणि दारुगोळ्यावर खर्च करायचे नाहीत. हाच संदेश आहे, जो मी पंतप्रधान नरेंद्र मोदींना देऊ इच्छितो, असंही शफीर यांनी सांगितलं.

आमच्याकडे इंजिनिअर्स, डॉक्टर्स आणि कुशल कामगार आहेत. आम्ही यांचा वापर देशाच्या प्रगतीसाठी करू इच्छितो हे पंतप्रधान नरेंद्र मोदींना सांगू इच्छितो. यामुळे दोन्ही देशांत शांतता प्रस्थापित होईल आणि दोन्ही देश प्रगतीच्या मार्गावर चालावेत असे ते म्हणाले.

भारत आणि पाकिस्तानला एकत्र आणण्यासाठी संयुक्त अरब अमिराती महत्त्वाची भूमिका बजावू शकत असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. सौदी अरेबिया हे मित्र राष्ट आहे. पाकिस्तान आणि सौदीमध्ये मित्रत्वाचे संबंध आहेत आणि ते मक्का आणि मदिनाला भेट देत असल्याचंही वक्तव्य त्यांनी केलं.

युएई लाखो पाकिस्तानी लोकांच्या दुसऱ्या घराप्रमाणे आहे. शेख मोहम्मद बिन जायद एक भाऊ आणि पाकिस्तानी समर्थक असल्याचेही शरीफ म्हणाले. यावेळी शरीफ यांनी पुन्हा एकदा काश्मीरचाही उल्लेख केला. आम्हाला शांततेनं जगायचं आहे. परंतु काश्मीरमध्ये जा काही होतंय ते थांबवलं पाहिजे, मानवाधिकाराचं उल्लंघन बंद झालं पाहिजे असं त्यांनी नमूद केलं.

माझा पंतप्रधान मोदींना हाच संदेश आहे की एकत्र बसलं पाहिजे आणि काश्मीरसारख्या ज्वलंत मुद्द्यांवर गंभीर चर्चा झाली पाहिजे, असंही शरीफ म्हणाले.