शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

भगवद्गीतेची पुतिन यांनाही भुरळ, भारतातून परतताना विमानात केले वाचन; PM मोदींचा मान राखला!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2025 15:34 IST

1 / 12
PM Modi Give Putin Very Special Gift Bhagwat Gita: रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादीमीर पुतिन अलीकडेच भारत दौऱ्यावर आले होते. पुतिन यांचा भारत दौरा अनेकार्थाने महत्त्वाचा मानला गेला. सगळे प्रोटोकॉल बाजूला ठेवून पंतप्रधान मोदी यांनी स्वतः पुतिन यांचे सहर्ष स्वागत केले. पुतिन यांचा दौरा अनेकार्थाने विशेष ठरला. या दौऱ्यावेळी भारत आणि रशिया यांच्यात अनेक महत्त्वाचे करार झाले. पंतप्रधान निवासस्थान आणि राष्ट्रपती भवनात विशेष स्नेहभोजनही आयोजित करण्यात आले होते.
2 / 12
व्लादीमीर पुतिन यांच्या भारत दौऱ्यात एका गोष्टीने सगळ्यांचे लक्ष वेधले. ती म्हणजे पंतप्रधान मोदी यांनी पुतिन यांना दिलेली अत्यंत खास आणि विशेष भेट, भगवद्गीता. भगवद्गीतेची रशियन भाषेत भाषांतरीत केलेली प्रत पंतप्रधान मोदी यांनी पुतिन यांना भेट दिली. विशेष म्हणजे भारतातून परत निघताच विमानात पुतिन यांनी पंतप्रधान मोदी यांनी दिलेली भगवद्गीता वाचल्याचे म्हटले जात आहे.
3 / 12
अलीकडेच ०१ डिसेंबर २०२५ रोजी गीता जयंती साजरी करण्यात आली. भारतीय संस्कृती आणि परंपरा यांमध्ये भगवद्गीतेला अनन्य साधारण असे महत्त्व आहे. सुमारे ५ हजार वर्षांपूर्वी महाभारताच्या रणभूमीवर श्रीकृष्णाने अजुर्नाला जीवनविषयक संदेश दिला. तीच ही गीता होय. हजारो वर्षे लोटूनही आजही गीतेची महात्म्य यत्किंचितही कमी झालेले नाही, यावरूनच गीतेची थोरवी आणि महती लक्षात येते.
4 / 12
गीता हा वैश्विक ग्रंथ आहे. केवळ भारतीय भाषांमध्येच नाही, तर जगभरातील अनेक भाषांमध्ये गीतेचे भाषांतर झाले आहे. हाच कालातीत ग्रंथ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुतिन यांना भेट दिला आहे. गीतेमध्ये दहाव्या अध्यायात विभूतीयोग सांगताना भगवंतांनी ‘मासानां मार्गशीर्षोऽहम’ म्हणजे मार्गशीर्ष महिन्यात मी असतो, असे म्हटले आहे. मार्गशीर्ष महिना भगवान श्रीकृष्णाला अतिशय प्रिय आहे.
5 / 12
मार्गशीर्ष मास हा केशव मास म्हणूनही ओळखला जातो. कारण या महिन्याचे पालकत्व भगवान महाविष्णू यांच्याकडे असते. अशा शुभ मार्गशीर्ष महिन्यात गीतेची प्रत भेट देणे विशेष मानले जात आहे. राष्ट्राध्यक्ष पुतिन यांना रशियन भाषेतील गीतेची प्रत भेट दिली. गीतेतील शिकवण जगभरातील लाखो लोकांना प्रेरणा देते, असे पंतप्रधान मोदी यांनी या पोस्टमध्ये म्हटले आहे. पंतप्रधान मोदी यांनी पुतिन यांना गीता भेट दिल्याचे अनेकांनी स्वागत केले असून, अगदी अचूक निर्णय असल्याचे म्हटले आहे.
6 / 12
पुतिन यांचे भारतात आगमन झाल्यावर पहिल्याच भेटीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रशियन भाषेत अनुवादित भगवद्गीतेची प्रत भेट देणे सूचकही मानले जात आहे. पंतप्रधान मोदींनी पुतिन यांना सादर केलेल्या भगवद्गीतेच्या आवृत्तीवर रशियामध्ये मोठा खटला सुरू होता. २०११ मध्ये रशियामध्ये गीतेवर बंदी घालण्याची मागणी करण्यात आली होती. तेव्हा भारत सरकारने तत्कालीन रशियन सरकारकडे त्याबद्दल तीव्र निषेध नोंदवला होता.
7 / 12
याची पार्श्वभूमी रंजक आहे. १४ वर्षांपूर्वी रशियामध्ये या हिंदू धर्मग्रंथाला (गीता) 'अतिरेकी' घोषित करण्याची व गीतेवर बंदी घालण्याची मागणी रशियन न्यायालयाने फेटाळून लावली होती. हा खटला २०११ चा आहे. सायबेरियन शहरातील टॉम्स्कमधील सरकारी वकिलांनी गीतेच्या एका आवृत्तीलावर बंदी घालण्याचा प्रयत्न केला होता.
8 / 12
हरे कृष्ण चळवळीने 'भगवद्गीता जशी आहे तशी...' याच शीर्षकाच्या गीतेच्या या आवृत्तीचे वितरण रशियात केले होते. वकील अलेक्झांडर शाखोव्ह यांनी हरे कृष्ण चळवळीचे प्रतिनिधित्व केले. हा खटला जून २०११ मध्ये सुरू झाला आणि १९ डिसेंबर रोजी निकालासाठी ठेवला गेला. मानवाधिकार लोकपालाच्या विनंतीवरून २८ डिसेंबर २०११ पर्यंत तो पुढे ढकलण्यात आला.
9 / 12
भारताचे तत्कालीन परराष्ट्रमंत्री एस.एम. कृष्णा यांनी दिल्लीतील रशियन राजदूत अलेक्झांडर कडाकिन यांना बोलावून घेऊन या प्रकरणावर तीव्र आक्षेप घेतला होता. कृष्णा यांनी स्पष्ट केले होते की हिंदू हक्कांच्या संभाव्य उल्लंघनाबद्दल रशियातील भारतीयांमध्ये व्यापक नाराजी आहे. या कारणामुळेही पुतिन यांना दिलेली भगवद्गीता प्रत भेट विशेष मानली जात आहे.
10 / 12
भारताने दिलेली सुंदर भेट म्हणजे श्रीमद्भगवद्गीता. अध्यक्ष पुतिन वाचत आहेत श्रीमद् भगवद्गीता, असे कॅप्शन देऊन रशियन आर्मीने एक फोटो एक्सवर शेअर केला आहे. यावरून पंतप्रधान मोदी यांचा मान राखून दिलेली भेट पुतिन यांनी केवळ स्वीकारली नाही, तर गीता वाचण्यास सुरुवात केल्याचे म्हटले जात आहे. हिंदूंमध्ये सर्वात लोकप्रिय आणि आदरणीय ग्रंथांपैकी एक असलेल्या भगवद्गीतेमध्ये भगवान कृष्ण आणि अर्जुन यांच्यातील संवादाचे तपशीलवार वर्णन केले आहे.
11 / 12
प्राचीन काळापासून गीतेला उपनिषदांचे मान मिळाला आहे. गीतारूपी अमृत भगवंतांनी अर्जुनाच्या निमित्ताने जगाला दिले असून, जीवनाच्या विकासाला आवश्यक असलेला प्रत्येक विचार गीतेत आहे. भगवंतांनी अजुर्नाला निमित्तमात्र बनवून विश्वातील समग्र मानव जातीला गीता ज्ञानाद्वारे जीवनाभिमुख करण्याचा चिरंतन प्रयास केला आहे. गीता ही सर्व शास्त्रमयी आहे. गीतेत सर्व शास्त्रांचा समन्वय पहायला मिळतो.
12 / 12
भगवद्‌गीतेत १८ अध्याय, ७०० श्लोक असून, भगवद्गीतेने मनुष्यमात्राला यशस्वी, सुखी, शांत आणि तृप्त जीवनाचा शाश्वत मार्ग दाखविला. गीता म्हणजे भारताच्या गौरवाची शान आहे. गीता जगाकडे व जीवन मार्गाकडे पाहण्याची मूलभूत अध्यात्मपर दृष्टी देणारा ग्रंथ आहे. संत ज्ञानेश्वर माऊलींपासून ते अगदी लोकमान्य टिळक यांच्यापर्यंत अनेकांनी गीतेवर भाष्य केले आहे. आजच्या काळातही गीतेवर अभ्यास करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. गीतेतून सातत्याने नवीन काहीतरी मिळत असल्यामुळे याची कालातीतता स्पष्ट होते.
टॅग्स :IndiaभारतrussiaरशियाNarendra Modiनरेंद्र मोदीVladimir Putinव्लादिमीर पुतिनspiritualअध्यात्मिकLord Krishnaभगवान श्रीकृष्णMahabharatमहाभारतAdhyatmikआध्यात्मिक