अनिवासी भारतीय उद्योगपतीच्या लेकीने सांगितला युगांडाच्या तुरुंगातील भयानक अनुभव, म्हणाली...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2025 17:32 IST2025-02-23T17:27:31+5:302025-02-23T17:32:27+5:30

Vasundhara Oswal News: भारतीय वंशाचे अब्जाधीश उद्योगपती पंकज ओसवाल यांची कन्या वसुंधरा ओसवाल हिला काही महिन्यांपूर्वी युगांडामध्ये हत्येच्या आरोपाखाली अटक करण्यात आली होती. दरम्यान, तुरुंगातून सुटका झाल्यानंतर आता वसुंधरा ओसवाल हिने तिथला भयानक अनुभव कथन करत गंभीर आरोप केले आहेत. तुरुंगातील तीन आठवड्यांच्या वास्तव्यादरम्यान, आपल्या मानवाधिकारांचं उल्लंघन झाल्याचा आरोप तिने केला आहे.

भारतीय वंशाचे अब्जाधीश उद्योगपती पंकज ओसवाल यांची कन्या वसुंधरा ओसवाल हिला काही महिन्यांपूर्वी युगांडामध्ये हत्येच्या आरोपाखाली अटक करण्यात आली होती. दरम्यान, तुरुंगातून सुटका झाल्यानंतर आता वसुंधरा ओसवाल हिने तिथला भयानक अनुभव कथन करत गंभीर आरोप केले आहेत. तुरुंगातील तीन आठवड्यांच्या वास्तव्यादरम्यान, आपल्या मानवाधिकारांचं उल्लंघन झाल्याचा आरोप तिने केला आहे.

वसुंधरा ओसवाल हिचे वडील पंकज ओसवाल हे भारतीय वंशाचे उद्योगपती आहेत. त्यांची एकूण संपत्ती २४ हजार कोटी रुपये एवढी आहे. तसेच आलिशान जीवन जगणाऱ्या ओसवाल यांच्याकडे प्रायव्हेट जेट आणि लक्झरी कारचा मोठा ताफा आहे. दरम्यान, त्यांची कन्या वसुंधरा ओसवाल हिला त्यांचे माजी कर्मचारी मुकेश मोनारिया यांचं अपहरण आणि हत्येच्या आरोपाखाली अटक करण्यात आली होती. पुढे मुकेश मेनारिया हे टंझानियामध्ये जिवंत सापडले होते.

दरम्यान, वसुंधरा हिने युगांडामधील तुरुंगातून सुटका झाल्यानंतर तिथे झालेल्या छळाचा भयावह अनुभव कथन केला आहे. तिने सांगितले की, तिथे मला पाच दिवस कोठडीत ठेवण्यात आले होते. त्यानंतर मला दोन आठवडे तुरुंगात पाठवण्यात आले. या काळात मला आंघोळ करण्याची परवानगी नव्हती. तसेच मला अन्न आणि पाण्यापासूनही वंचित ठेवण्यात आले. मला जेवण, पाणी आणि इतर सुविधा मिळाव्यात यासाठी माझ्या आई-वडिलांना वकिलांच्या माध्यमातून पोलिस अधिकाऱ्यांना लाच द्यावी लागली.

वसुंधरा हिने पुढे दावा केला की, एकवेळ अशी आली की एक प्रकारची शिक्षा म्हणून मला शौचालयात जाण्याचीही परवानगी नाकारण्यात आली. दरम्यान, वसुंधरा ओसवाल हिला गतवर्षी १ ऑक्टोबर २०२४ रोजी अटक करण्यात आली होती. त्यानंतर २१ ऑक्टोबर रोजी तिला जामीन मंजूर करण्यात आला होता.

अटकेची कारवाई करताना पोलिसांनी वॉरंट न दाखवताच आपल्या घराची झडती घेतली, असा आरोपही वसुंदरा ओसवाल हिने केला. मी वॉरंट मागितले तेव्हा त्यांनी सांगितले की, आपण युगांडामध्ये आहोत. तुम्हा आता युरोपमध्ये नाही आहात. आम्ही इथे काहीही करू शकतो. त्यानंतर त्यांनी आपल्या संचालकाच्या भेटीसाठी मला जबरदस्तीने व्हॅनमध्ये बसवले आणि नेले.

एवढंच नाही तर त्यांनी मला वकिलाविनाच जबाब देण्यास भाग पाडलं. तसेच जबाब दिल्यानंतर मला एका कोठडीत ठेवण्यात आले. तसेच ३० हजार अमेरिकन डॉलर देण्यास आणि पासपोर्ट जमा करण्यास सांगण्यात आले. कोर्टातून बिनशर्त सुटका झाल्यानंतरही मला ७२ तासांपर्यंत कोठडीत ठेवण्यात आले, असा आरोपही वसुंधरा हिने केला.

दरम्यान, मुकेश मेनारिया हा जिवंत सापडल्यानंतर वसुंधरा ओसवाल हिची या खटल्यातून निर्दोष सुटका झाली. तसेच तिचा पासपोर्टही तिला परद देण्यात आला. आता युगांडा सरकारने आपल्या चुका सुधाराव्यात, असा सल्लाही वसुंधरा हिने दिला आहे.