डोनाल्ड ट्रम्प यांनी 'शब्द' फिरवला; चीनशी जवळीक, भारताशी दुरावा, अमेरिकेचा नवा डाव?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2025 16:50 IST2025-01-24T16:41:37+5:302025-01-24T16:50:12+5:30

नुकतेच डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची शपथ घेतली आहे. ते अमेरिकेचे ४७ वे राष्ट्राध्यक्ष आहेत. मात्र या सर्वोच्च पदाची सूत्रे हाती घेताच ट्रम्प यांच्या एका पाठोपाठ एक घोषणेनं भारताची चिंता वाढवली आहे. दुसरीकडे चीनबाबत त्यांची भूमिका मवाळ दिसून येत आहे.

गुरुवारी एका मुलाखतीत डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनवर टॅरिफ लावण्यास इच्छुक नसल्याचं सांगितले. यामागचं कारण म्हणजे जगातील २ सर्वात मोठ्या अर्थव्यवस्थेत यामुळे ट्रेड वॉर होण्यापासून टाळलं जाऊ शकते असं ट्रम्प म्हणाले. परंतु दिर्घकाळापासून ते चीनवर टॅरिफ लावण्याचं मत मांडत होते.

फॉक्स न्यूजच्या मुलाखतीत डोनाल्ड ट्रम्प म्हणाले की, चीनसाठी आमच्याकडे सर्वात मोठी पॉवर टॅरिफ आहे परंतु ते चीनला नको आणि मलाही त्याचा वापर करायचा नाही परंतु चीनसाठी आमच्याकडे ही जबरदस्त पॉवर आहे असं त्यांनी सांगितले

त्याशिवाय या मुलाखतीत डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांचं कौतुक केले. ते माझे खूप चांगले मित्र आहेत. अलीकडेच माझं त्यांच्याशी बोलणं झालं असंही ट्रम्प यांनी म्हटलं.

अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणूक प्रचारात ट्रम्प यांनी अनेकदा चीनवर ६० टक्क्यापर्यंत टॅरिफ लावण्याचं विधान केले होते. त्यानंतर राष्ट्राध्यक्ष बनल्यानंतर दुसऱ्याच दिवशी त्यांनी चीनवर १० टक्के टॅरिफ लावू असं सांगितले. मात्र आता डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांचा शब्द फिरवला आहे.

चीनवर शुल्क लावण्याचा निर्णय त्याच आधारे घेतला जाईल की ते मॅक्सिको, कॅनडा यांना फेंटानिल पाठवतात की नाही, फेंटानिल हा असा मादक पदार्थ आहे जो हिरोईनपेक्षा ५० पट अधिक शक्तीशाली आणि नशा देणारा पदार्थ आहे.

भारतासाठी टेन्शन का? - डोनाल्ड ट्रम्प यांनी राष्ट्राध्यक्षपदाची शपथ घेतल्यानंतर इशारा दिला की, भारतासह सर्व ब्रिक्स देशांतून येणाऱ्या सामनांवर ते १०० टक्के टॅरिफ लावणार, मात्र चीनवर त्यांनी टॅरिफ न लावण्याचे संकेत दिले. ब्रिक्स देशांनीही अद्याप यावर प्रतिक्रिया दिली नाही.

डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेत बेकायदेशीरपणे राहणाऱ्या परदेशी लोकांवर कारवाई करत आहेत. त्यात भारतीयांचाही समावेश आहे. मागील महिन्यात १५ लाख लोकांची यादी बनवली जे अवैधपणे अमेरिकेत राहतायेत. त्यात १८ हजार भारतीय आहेत. ट्रम्प याच्या कठोर रणनीतीमुळे या सर्वांना भारतात आणण्याची तयारी सरकार करत आहे.

प्यू रिसर्चनुसार, अमेरिकेत ७,२५,००० अनडॉक्यूमेंटेड भारतीय वर्षोनुवर्ष या आशेने राहतात की त्यांना एक ना एक दिवस अमेरिकेचं नागरिकत्व मिळेल किंवा त्यांच्या मुलांना अमेरिकेचं नागरिकता मिळेल. परंतु बर्थराइट सिजिजनशिप संपवण्याची ट्रम्प यांची घोषणा भारतीयांची धाकधूक वाढवणारी आहे.

ट्रम्प यांनी जन्माच्या आधारे नागरिकता देण्याचा अधिकार संपवला आहे. परंतु एका फेडरल जजने हा निर्णय असंवैधानिक असल्याचं म्हटलं. सोबतच स्थलांतरितांना परत पाठवण्याबाबत चर्चा सुरू होती, त्यामुळे तिथे राहणारे भारतीय तणावात आहेत. आम्ही कायमचं स्थलांतरावर बंदी घालणार असं ट्रम्प यांनी सांगितले.