अमेरिकेत कोरोनाचा विस्फोट! गेल्या 24 तासांत 3000 मृत्यू; Pfizer लसीच्या आपत्कालीन वापरास मंजुरी

By ऑनलाइन लोकमत | Published: December 12, 2020 12:36 PM2020-12-12T12:36:01+5:302020-12-12T12:45:56+5:30

US FDA Pfizer Covid vaccine for Emergency Use : अमेरिकन सरकारच्या सल्लागार समितीने फायझरच्या कोरोना लसीच्या आपत्कालीन वापरास परवानगी दिली.

जगभरात कोरोनाचा विस्फोट पाहायला मिळत असून रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. कोरोनाग्रस्तांच्या संख्येने तब्बल सात कोटींचा टप्पा पार केला आहे.

कोरोनामुळे लाखो लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. जगभरातील विविध रुग्णालयात रुग्णावर उपचार सुरू आहेत. याच दरम्यान कोरोना लसी संदर्भात महत्त्वाची माहिती समोर येत आहे.

ब्रिटननंतर आता अमेरिकेनेही अमेरिकन कंपनी फायझर आणि जर्मन फार्मा कंपनी बायोएनटेकद्वारे विकसित करण्यात येत असलेल्या कोरोना लसीच्या आपत्कालीन वापरास परवानगी दिली आहे.

कोरोनाचा सर्वाधिक फटका हा अमेरिकेला बसला आहे. महासत्ता असलेली अमेरिका कोरोनापुढे हतबल झाली आहे. तेथील रुग्णांची संख्या ही सर्वाधिक असून मृतांचा आकडाही दिवसागणिक वाढत आहे.

जॉन हापकिन्स विद्यापीठाच्या आकडेवारीनुसार, अमेरिकेत 15.5 मिलियन लोकांना आतापर्यंत कोरोनाची लागण झाली आहे. तर त्यांच्यापैकी आतापर्यंत दोन लाख 92 हजार जणांचा मृत्यू झाला आहे.

अमेरिकेने कोरोनावरील लस तयार करणारी कंपनी मॉडर्नाकडूनही 100 दशलक्ष डोस विकत घेण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, शुक्रवारी अमेरिकन सरकारच्या सल्लागार समितीने फायझरच्या कोरोना लसीच्या आपत्कालीन वापरास परवानगी दिली.

अमेरिकेत या मुद्दावर झालेली बैठक तब्बल आठ तास सुरू होती. बैठकीदरम्यान एफडीएच्या सल्लागार समितीच्या सदस्यांनी 17 विरूद्ध 4 मतांनी लसीच्या आपत्कालीन वापरास मंजुरी दिली आहे.

सध्या फायझरच्या लसीला मिळालेली परवानगी ही अंतरिम परवानगी आहे. कंपनीला अमेरिकेत लसीची विक्री करण्यासाठी आणखी एकदा अर्ज करावा लागणार आहे. या लसीमुळे सध्या जो फायदा होणार आहे तो या लसीच्या संभावित दुष्परिणामांपेक्षा अधिक आहे.

लसीच्या आपत्कालीन वापरास परवानगी देण्यात आली आहे, असं एका तज्ज्ञानं सांगितलं. याआधी फायझरच्या लसीच्या आपत्कालीन परिस्थितीतील वापरास ब्रिटन, कॅनडा, बहरिन आणि सौदी अरेबियाने मंजुरी दिली होती. भारतातही यासाठी कंपनीने परवानगी मागितली आहे.

गेल्या 24 तासांमध्ये अमेरिकेत कोरोनामुळे तीन हजार जणांचा मृत्यू झाला आहे. त्यानंतर कोरोना लसीच्या आपत्कालीन वापरास परवानगी देण्यात आली आहे.

आम्ही वैज्ञानिक आणि संशोधकांचे आभारी आहोत. अमेरिकेसमोर लसीची निर्मिती आणि त्याच्या वितरणाचं आव्हान आहे अशी प्रतिक्रिया नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडन यांनी दिली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.

जगभरात कोरोनावर युद्धपातळीवर संशोधन सुरू असून चाचण्यांना अनेक ठिकाणी यश येत आहे. तसेच लाखो लोकांनी देखील कोरोनावर यशस्वीरित्या मात केली आहे.