Turkey-Syria Earthquake: तुर्कस्थानात भारताचा दीपेंद्र बनला ‘देवदूत’, पुरवतोय मोफत अन्न आणि २४ तास सेवा

By ऑनलाइन लोकमत | Published: February 10, 2023 03:45 PM2023-02-10T15:45:52+5:302023-02-10T15:54:15+5:30

दीपेंद्र तुर्कस्तानच्या कॅपाडोशिया शहरात नमस्ते इंडिया नावाचे हॉटेल चालवतात आणि त्यांचे दोन रेस्टॉरंटही आहेत. ते सध्या २४ तास भूकंपग्रस्तांना सेवा पुरवत आहेत.

तुर्कस्तान आणि सीरियामध्ये भूकंपामुळे आतापर्यंत २१ हजारांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. या संकटाच्या काळात संपूर्ण जगाने तुर्कस्तान आणि सीरियाकडे मदतीचा हात पुढे केला आहे.

भारतानेही मदत पाठवलीये. NDRF च्या टीम 'ऑपरेशन दोस्त' अंतर्गत सुमारे ६ विमानांमधून मदत साहित्य, मोबाईल हॉस्पिटल आणि इतर आवश्यक वस्तू घेऊन बचाव कार्य करत आहेत. याशिवाय तेथे राहणारे भारतीयही मदतीसाठी पुढे आले आहेत.

मध्य प्रदेशातील बुरहानपूर येथे राहणारे दीपेंद्र तुर्कस्तानच्या कॅपाडोशिया शहरात नमस्ते इंडिया नावाचे हॉटेल चालवतात आणि त्याचे दोन रेस्टॉरंटही आहेत. जे सध्या २४ तास भूकंपग्रस्तांना मदत करत आहेत. दीपेंद्र यांनी भूकंपग्रस्तांसाठी आपल्या हॉटेलचे दरवाजे उघडले असून ते सर्वांना शक्य ती मदत करत आहेत.

ज्या ठिकाणी भूकंप झाला त्या ठिकाणापासून आपण सुमारे २२० किलोमीटर अंतरावर आहोत, असे दीपेंद्र यांनी सांगितले. त्यांच्या 'नमस्ते इंडिया' हॉटेलमध्ये ३० भूकंपग्रस्त मोफत राहत आहेत. ते ६० लोकांना मोफत जेवण देत आहेत. जर एखाद्याला वैद्यकीय मदतीची गरज असेल तर ते ते देखील पुरवत आहेत. इथे खूप थंडी आहे आणि बर्फ पडत आहे. केवळ बिस्किटे खाऊन कोणत्या ना कोणत्या मार्गाने आपले जीवन चालवणारे अनेकजण आहेत, असेही त्यांनी सांगितले.

दीपेंद्र यांनी सांगितले की लोक मोठ्या संख्येने कॅपाडोसियाकडे येत आहेत. कारण भूकंपाच्या ठिकाणी लोकांसाठी खाण्यापिण्याची व्यवस्था नाही. दीपेंद्र गेल्या १० वर्षांपासून येथे राहत आहेत. दीपेंद्र सांगतात की २००९ मध्ये ते पहिल्यांदा तुर्कीच्या इस्तंबूल शहरात पोहोचले. येथेही त्यांनी 'स्वाद' नावाचे भारतीय रेस्टॉरंट सुरू केले.

तुर्कस्तान आणि सिरियात आलेल्या प्रलयंकारी भूकंपाने तेथील नागरिकांचे जीवन उद्ध्वस्त केले. त्यातही काही नागरिक ढिगाऱ्याखाली जिवंत सापडत असल्याने हा एक चमत्कारच समजला जात आहे. सिरियात भूकंपानंतर तब्बल ४० तासांनी एका पडलेल्या इमारतीच्या ढिगाऱ्याखालून पाचजणांच्या कुटुंबाला बाहेर काढण्यात यश मिळाले आहे. 

भूकंपग्रस्त भागात मदत वेळेवर पोहोचत नसल्याचे लोकांचे म्हणणे आहे. तुर्कीचे राष्ट्राध्यक्ष रेसेप तय्यप एर्दोगन यांनी ही बाब मान्य केली आहे. सरकारविरोधातील लोकांचा रोष पाहून एर्दोगन म्हणाले भूकंपानंतर सरकारच्या सुरुवातीच्या मदत मोहितमेत उणिवा होत्या.

भारताने ‘ऑपरेशन दोस्त’ अंतर्गत सहावे विमान तुर्कस्तानला पाठवले आहे. बचावकार्यात एनडीआरएफने नुरदगी येथे एका इमारतीच्या ढिगाऱ्याखाली अडकलेल्या सहा वर्षे वयाच्या बालिकेची सुटका केली. त्याबद्दल गृहमंत्री अमित शहा यांनी त्यांचे कौतुक केले आहे.

इंडोनेशियाच्या पूर्वेकडील पापुआ प्रांताला गुरुवारी भूकंपाचा धक्का बसला. यामुळे एक तरंगते उपाहारगृह समुद्रात बुडून चार जण ठार झाले. या भूकंपाचा केंद्रबिंदू अवघ्या २२ कि. मी. खोलीवर होता. भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर ५.१ एवढी नोंदली गेली. भूकंपामुळे घरे, इमारती व वैद्यकीय सुविधांचेही नुकसान झाले.