'ते गप्पा चांगल्या मारतात, पण रात्रीच्या अंधारात लोकांवर बॉम्ब टाकतात', ट्रम्प पुतीन यांच्यावर भडकले

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2025 11:01 IST2025-07-14T10:50:15+5:302025-07-14T11:01:26+5:30

Vladimir Putin Donald Trump: अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्या टीकेची तोफ डागली. युक्रेन-रशिया युद्ध थांबवण्याचे प्रयत्न सुरू असतानाच ट्रम्प यांनी हे विधान केले.

डोनाल्ड ट्रम्प आणि व्लादिमीर पुतीन यांच्या सर्व काही व्यवस्थित चाललं आहे, असे वाटत असतानाच ट्रम्प पुतीन यांच्यावर भडकले. पुतीन यांच्याबद्दल नाराजी व्यक्त करताना ट्रम्प त्यांना अप्रत्यक्षपणे दुटप्पी म्हणाले आहेत.

डोनाल्ड ट्रम्प माध्यमांशी बोलत होते. त्यावेळी त्यांनी पुतीन यांच्या भूमिकेमुळे मी नाराज असल्याचे सांगितले. त्याचबरोबर नाराजीचे कारणही त्यांनी सांगून टाकले.

ट्रम्प म्हणाणे, 'राष्ट्रपती पुतीन यांच्यावर मी नाराज आहे. ते गप्पा खूप चांगल्या मारतात. बोलण्यात पटाईत आहेत, पण रात्रीच्या अंधारात लोकांवर बॉम्ब टाकतात. मला हे अजिबात आवडत नाही.'

ट्रम्प यांच्या या विधानाचा संबंध अलिकडेच त्यांची पुतीन यांच्याशी झालेल्या चर्चेशी जोडला जात आहे. रशिया-युक्रेन यांच्यातील युद्ध थांबाव अशी ट्रम्प यांची सुरुवातीपासून भूमिका आहे. पण, रशियाकडून सातत्याने युक्रेनवर हवाई हल्ले केले जात आहेत.

युद्ध थांबवण्याच्या चर्चा सुरू असतानाच मागील काही दिवसात रशियाने युक्रेनवर ड्रोन आणि मिसाईल हल्ले वाढवले आहेत. त्यामुळे ट्रम्प चांगलेच नाराज झाले आहेत. ट्रम्प सातत्याने पुतीन यांच्याशी युद्ध थांबवण्याबद्दल चर्चा करत आहेत. तर दुसरीकडे रशियाचे युक्रेनवरील हल्ले सुरूच आहेत.

मार्चनंतर रशियाचे युक्रेनवरील हल्ले वाढले आहेत. एकीकडे पुतीन चर्चा करत आहेत आणि दुसरीकडे हल्ले. यावरूनच ट्रम्प यांनी पुतीन यांना दुतोंडी असल्याचे म्हटले आहे. दिवसा चर्चा आणि रात्री हल्ले करणे, हेच ते करतात असे ट्रम्प म्हणाले.