१५० देशांसाठी वाईट बातमी येण्याची शक्यता! जिनपिंग पहिल्यांदाच चीनच्या सेंट्रल बँकेत

By ऑनलाइन लोकमत | Published: October 25, 2023 01:49 PM2023-10-25T13:49:17+5:302023-10-25T13:59:59+5:30

एवढी वर्षे शी जिनपिंग हे चीनचे राष्ट्राध्यक्ष आहेत, परंतू ते कधीच सेंट्रल बँकेत गेले नव्हते. एव्हाना त्यांच्यावर कधी तशी वेळच आली नव्हती.

एवढी वर्षे शी जिनपिंग हे चीनचे राष्ट्राध्यक्ष आहेत, परंतू ते कधीच सेंट्रल बँकेत गेले नव्हते. एव्हाना त्यांच्यावर कधी तशी वेळच आली नव्हती. परंतू, सध्याचे चीनवरील आर्थिक संकट पाहता जिनपिंग त्यांच्या कारकीर्दीत पहिल्यांदाच रिझर्व्ह बँकेत गेले आहेत.

चीनने पाकिस्तान, नेपाळ, श्रीलंकेसारख्या अनेक देशांना भिकेला लावले आहे. दुसऱ्या देशांना स्वत:च्या विस्तारवादासाठी कर्जे देणे, प्रकल्प उभारणे आणि त्या देशांना व्याजाच्या विळख्यात अडकविण्याचे कामच चीनने केले होते. आता स्वत:च अब्जावधी डॉलर्सच्या कर्जाच्या विळख्यात ड्रॅगन अडकला आहे, एवढा की स्वत:ची मान सोडविणे देखील चीनला कठीण झाले आहे.

जगातील दुसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था असलेल्या चीनमध्ये सर्व काही ठीक नाही. देशाचा रिअल इस्टेट निर्देशांक सतत घसरत आहे आणि 2009 च्या पातळीवर गेला आहे. आतापर्यंतच्या उच्चांकावरून 80 टक्के घसरण झाली आहे. चीनची सर्वात मोठी कंपनी एव्हरग्रँडे बुडाली आहे.

मंगळवारी राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग अचानक पहिल्यांदाच चिनी सेंट्रल बँकेत पोहोचले होते. यानंतर चीनने वित्तीय तुटीचे प्रमाण 3.0% वरून 3.8% पर्यंत वाढविले. तसेच एक ट्रिलियन युआन किमतीचे सॉवरेट बॉन्ड इश्यू करण्यासही मान्यता दिली आहे. हे सगळे एका रात्रीत घडलेले नाहीय. तर चीनला ते करायला भाग पडले आहे.

रिअल इस्टेट क्षेत्राला संकटातून सोडवण्यासाठी चीन सरकारने अनेक पावले उचलली आहेत. परंतु चीनमध्ये मंदीचा धोका सतत वाढत असल्याचे संकेत येत आहेत. सर्वात मोठ्या रिअल इस्टेट कंपन्यांपैकी एक असलेल्या एव्हरग्रेंडने पेमेंट थकविले आणि चीनचा डोलारा कोसळण्यास सुरुवात झाली.

Evergrande ही जगातील सर्वात कर्जबाजारी रिअल इस्टेट कंपनी आहे. त्यावर 300 अब्ज डॉलरहून अधिकचे कर्ज आहे. एव्हरग्रँड बुडाल्याचा परिणाम तेवढ्यापुरताच राहिला नाही तर अन्य कंपन्यांवरही लगेचच जाणवला. गेल्या दोन दशकांत चीनची अर्थव्यवस्था झपाट्याने वाढली आहे. त्याचा चांगला परिणाम अन्य क्षेत्रांवरही झाला होता. चीनच्या अर्थव्यवस्थेत या क्षेत्राचा वाटा एक तृतीयांश आहे.

गेल्या दोन दशकांपासून चीन हा जगाच्या विकासाचे इंजिन बनला आहे. चिनीच नाही तर अमेरिका, युरोपमधील मोठमोठ्या कंपन्या चीनमध्ये उत्पादने तयार करतात आणि जगाला विकतात. परंतू, गेल्या काही काळापासून चीनची निर्यात मोठ्या प्रमाणावर घसरू लागली आहे. बेरोजगारी वाढू लागली आहे. यामुळे विकास दरही मंदावला आहे.

अॅपल, फॉक्सवॅगन, बरबरी सारख्या बड्या कंपन्या चीन सोडून जात आहेत. संकटाची चाहूल लागलेल्या चिनी लोकांनीही त्यांच्या खर्चात मोठी कपात केली आहे. या शेकडो कंपन्यांसाठी भारताप्रमाणेच चीनही एक मोठी बाजारपेठ होती. यामुळे या कंपन्यांना नुकसान होत आहे. अलीकडेच नेस्लेने आपला एक कारखाना बंद करण्याची घोषणा केली होती. ही कंपनी चीनला बेबी फूड पुरवत होती. याचा परिणाम पुरवठादार आणि कामगारांची नोकरी जाण्यावर होत आहे.

चीनने गेल्या 10 वर्षांत आपल्या बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्हवर एक ट्रिलियन डॉलर्सपेक्षा जास्त खर्च केले आहेत. 150 हून अधिक देशांना पैसा आणि तंत्रज्ञान दिले आहे. चीनमध्ये आर्थिक समस्या वाढल्यास चीन या गुंतवणुकीतून माघार घेऊ शकतो. यामुळे हे देश देखील संकटात सापडण्याची शक्यता वर्तविली जात आहे.