'काळ्या सोन्या'ची धरती! एका तेलाच्या विहिरीने कसं पालटलं कुवेतचं नशीब? वाचा रंजक इतिहास
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2026 23:28 IST2026-02-02T23:25:06+5:302026-02-02T23:28:05+5:30
कुवेतला 'ब्लॅक गोल्ड' म्हणजेच कच्च्या तेलाची धरती म्हटले जाते. पण तुम्हाला माहीत आहे का? १९३८ पूर्वी या देशाची अवस्था अत्यंत सामान्य होती.

जगाच्या नकाशावर एक छोटासा देश, पण श्रीमंतीत भलेभल्यांना मागे टाकणारा... हा देश म्हणजे कुवेत! कुवेतला 'ब्लॅक गोल्ड' म्हणजेच कच्च्या तेलाची धरती म्हटले जाते. पण तुम्हाला माहीत आहे का? १९३८ पूर्वी या देशाची अवस्था अत्यंत सामान्य होती. मात्र, जमिनीतून उफाळून आलेल्या काळ्या सोन्याने अवघ्या काही दशकांत या देशाचे नशीब पूर्णपणे बदलून टाकले.

तेलाचा शोध लागण्यापूर्वी कुवेत हा एक साधा व्यापारी देश होता. इथला मुख्य व्यवसाय समुद्रामधून मोती वेचणे आणि मासेमारी हा होता. मात्र, १९३८ मध्ये 'बर्गन ऑईल फील्ड'मध्ये तेलाचा शोध लागला आणि कुवेतच्या प्रगतीला वेग आला.

बर्गन हे जगातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात मोठे तेल क्षेत्र मानले जाते. येथूनच कुवेतच्या आधुनिक पर्वाची सुरुवात झाली. तेलातून मिळणाऱ्या अफाट उत्पन्नामुळे कुवेतमध्ये जीवनमान कमालीचे उंचावले. आजही कुवेतमध्ये नागरिकांना मोफत शिक्षण, अत्याधुनिक आरोग्य सेवा आणि जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधा मिळतात.

तेलाच्या उद्योगामुळे १९४० च्या दशकात 'अहमदी' नावाचे शहर वसवण्यात आले, जे आजही कुवेतच्या तेल इतिहासाची साक्ष देते. कुवेतने आपल्या या प्रवासाचे जतन अतिशय सुंदररीतीने केले आहे. कुवेतच्या नॅशनल म्युझियममध्ये एक विशेष 'ऑईल गॅलरी' आहे.

यामध्ये मोती व्यापारापासून ते तेल आधारित अर्थव्यवस्थेपर्यंतचा प्रवास मांडला आहे. तसेच, येथील 'सायंटिफिक सेंटर'मध्ये तेल उत्खननापासून ते शुद्धीकरणापर्यंतची सर्व प्रक्रिया पर्यटकांना पाहता येते.

कुवेतची ओळख असलेले 'कुवेत टॉवर्स' थेट तेलाशी संबंधित नसले, तरी ते या ब्लॅक गोल्डमुळे आलेल्या सुबत्तेचे प्रतीक मानले जातात. मोत्यांच्या व्यापारात गुंतलेला हा देश आज जगातील सर्वात महागडे चलन (कुवेती दिनार) असलेला देश म्हणून ओळखला जातो, यामागे केवळ आणि केवळ 'ब्लॅक गोल्ड'ची जादू आहे.

















