२० दिवस अन् १,३९,१०,४०० किलोमीटरचा प्रवास; शुभांशू शुक्लांची पृथ्वीवर उतरल्यानंतर पहिली प्रतिक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2025 18:41 IST2025-07-15T18:36:56+5:302025-07-15T18:41:40+5:30

भारतीय अंतराळवीर शुभांशू शुक्ला पृथ्वीवर सुरक्षित परतले आहेत. हे अंतराळयान दुपारी ३:०१ वाजता समुद्राच्या पृष्ठभागावर उतरले.

अंतराळवीर शुभांशू शुक्ला आणि त्यांचे 'अ‍ॅक्सिओम-४ मिशन' या मोहिमेतील इतर तीन क्रू मेंबर्स १५ जुलै २०२५ रोजी पृथ्वीवर परतले आहेत. इंटरनॅशनल स्पेस सेंटरवर १८ दिवस राहिल्यानंतर अ‍ॅक्सिओम ४ मोहिमेतील अंतराळवीर परतले.

२२.५ तासांच्या प्रवासानंतर हे अंतराळयान कॅलिफोर्नियातील सॅन दिएगो येथे उतरले. त्याआधी शुभांशू शुक्ला, कमांडर पेगी व्हिटसन, पोलंडचे मिशन तज्ज्ञ स्लावोज उजनांस्की-विस्निव्स्की आणि हंगेरीचे टिबोर कापू यांना घेऊन जाणारे ड्रॅगन 'ग्रेस' अंतराळयान सोमवारी भारतीय वेळेनुसार सायंकाळी ४:४५ वाजता अंतराळ स्थानकापासून वेगळे झाले होते.

३९ वर्षीय शुक्ला आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात अ‍ॅक्सिओम मिशन ४ (X-४) साठी मिशन पायलट म्हणून काम करत होते. ही मोहीम नासा, स्पेसएक्स आणि इस्रोची संयुक्त मोहीम आहे. अ‍ॅक्सिओम-४ मोहीम २५ जून रोजी फ्लोरिडा येथील केनेडी स्पेस सेंटर येथून सुरु झाली होती.

ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्ला पृथ्वीवर परतल्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावर एक सुंदर हास्य होतं. ज्यामध्ये त्यांनी ही मोहिम यशस्वीरित्या पूर्ण केल्याचे समाधान दिसत होते. दुसरीकडे अ‍ॅक्सिओम-४ कमांडर पेगी व्हिटसन म्हणाल्या की, परत आल्याने मला खूप आनंद झाला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुभांशू शुक्ला यांच्या अंतराळात परतण्याचे स्वागत केले आहे. संपूर्ण देशवासीयांसह, मी शुभांशू शुक्ला यांचे ऐतिहासिक मोहिमेतून परतल्याबद्दल अभिनंदन करतो. आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर पोहोचणारे ते पहिला भारतीय आहेत. त्यांनी आपल्या समर्पणाने आणि धाडसाने असंख्य स्वप्ने पूर्ण केली आहेत. यासह, आपण गगनयानच्या दिशेने आणखी एक मोठे पाऊल टाकले आहे, असं पंतप्रधान मोदी म्हणाले.

पृथ्वीवर परतल्यानंतर, शुभांशू शुक्ला आणि अ‍ॅक्स-४ टीमला अंतराळ प्रवासाच्या परिणामांमधून बरे होण्यासाठी ७ दिवस पुनर्वसन करावे लागेल. हा कालावधी वैद्यकीय देखरेखीखाली असेल जेणेकरून ते पुन्हा पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणाशी जुळवून घेऊ शकतील.

शुभांशू शुक्लाच्या आयएसएस भेटीसाठी इस्रोने सुमारे ५५० कोटी रुपये खर्च केले आहेत. शुभांशू यांचा अनुभव भारताच्या मानवी अंतराळ उड्डाण कार्यक्रम आणि गगनयान मोहिमेला मदत करेल.