थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2026 22:27 IST2026-04-08T22:18:45+5:302026-04-08T22:27:25+5:30

Israel Lebanon strikes today Photos: इस्रायलने लेबनानमध्ये अक्षरशः रक्तपात घडवला. १०० पेक्षा अधिक मिसाईल्स हल्ले करत इस्रायलने वेगवेगवेगळ्या ठिकाणांना लक्ष्य केले. या हल्ल्यानंतरचे फोटो समोर आले आहेत.

पश्चिम आशियात दोन आठवड्यांसाठी झालेला युद्धविराम खरंच टिकणार का? असा प्रश्न उपस्थित होणारे काम इस्रायलने केले आहे. इस्रायलच्या याच हल्ल्यांमुळे इराणने आक्रमक पवित्रा घेतला आहे. कोणतीही पूर्वसूचना न देता इस्रायलने लेबनानमधील अनेक शहरांवर मिसाईल्सचा वर्षाव केला.

संयुक्त राष्ट्राच्या निर्वासितांसाठीच्या उच्चायुक्तालयाने लेबनानमधील हल्ल्यानंतरचे काही फोटो शेअर केले आहेत. यात इस्रायलच्या हल्ल्यात रहिवाशी इमारतींचे प्रचंड नुकसान झाल्याचे दिसत आहे. हे सगळे फोटो थरकाप उडवणारे आहेत.

इस्रायलने बैरूमध्येच ६० पेक्षा जास्त हवाई हल्ले केल्याचे संयुक्त राष्ट्राच्या उच्चायुक्तालयाने म्हटले आहे. अवघ्या दहा मिनिटांत हा विध्वंस इस्रायलने घडवला आहे. यात बैरुतमध्ये सर्वाधिक बेघर झालेले लोक मारले गेले आहेत.

लेबनानच्या आरोग्य मंत्रालयाच्या प्रवक्त्यांनी रॉयटर्स वृत्तसंस्थेला सांगितले की, इस्रायलने केलेल्या हल्ल्यांमध्ये ८९ लोक मारले गेले आहेत, तर ७०० लोक जखमी झाले आहेत. मृतांच्या आकडा वाढण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे.

अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे शेकडो लोक जखमी झाले. त्यांना रुग्णालयांमध्ये नेण्यात आले मात्र रुग्णालयांमध्येही दाखल करण्यासाठी जागा अपुरी पडली.

कोणतीही सूचना न देता इस्रायलने केलेल्या हल्ल्यांमुळे इराण खवळला आहे. इराणने अमेरिकेला शस्त्रसंधी करारातून बाहेर पडण्याचा इशारा देण्यात आला आहे. इस्रायलकडून हे हल्ले हिजबुल्लाहला निशाणा बनवत करण्यात आल्याचे म्हटले गेले आहे.

इस्रायलच्या लेबनानमधील हल्ल्यांमुळे युद्धाला पुन्हा तोंड फुटण्याची भीती व्यक्त केली जात आहे. अमेरिका इराणने दोन आठवड्यांचा युद्धविराम जाहीर केल्यानंतर इस्रायलने हा रक्तपात घडवला आहे.