ती बैठक बेकायदेशीर, मी माझा देश विकू देणार नाही; युक्रेन प्रमुखाचा डोनाल्ड ट्रम्प यांना इशारा
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2025 19:57 IST2025-02-19T19:39:51+5:302025-02-19T19:57:10+5:30
Russia-Ukraine War : युद्ध थांबवण्याच्या दिशेने रशिया आणि अमेरिकन अधिकाऱ्यांची बैठक झाली. या बैठकीवरुन युक्रेनच्या प्रमुखांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.

Russia-Ukraine War : दोन वर्षांपासून सुरू असलेल्या रशिया-युक्रेन युद्धावर तोडगा काढण्यासाठी अमेरिकेने पुढाकार घेतला आहे. या पार्श्वभूमीवर सौदी अरेबियातील रियादमध्ये अमेरिका आणि रशियाच्या अधिकाऱ्यांमध्ये बैठक झाली. पण, या बैठकीत युक्रेनच्या प्रतिनिधींना बोलवण्यात आले नव्हते. यावरुन युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी प्रचंड नाराजी व्यक्त केली. तसेच, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर निशाणाही साधला.
आज झेलेन्स्की म्हणाले की, डोनाल्ड ट्रम्प हे रशियन 'डिसइन्फॉर्मेशन बबल'मध्ये अडकले आहेत. युद्धादरम्यान मला सत्तेवरून दूर करण्याचा कोणताही प्रयत्न अयशस्वी होईल, असा दावाही त्यांनी केला. दरम्यान, झेलेन्स्की यांनी ही प्रतिक्रिया ट्रम्प यांच्या त्या विधानानंतर दिली आहे, ज्यात त्यांनी झेलेन्स्कींची लोकप्रियता झपाट्याने घसरत असल्याचे म्हटले होते. यावरुन आता अमेरिका आणि युक्रेनमध्ये तणाव वाढण्याची चिन्हे आहेत.
मंगळवारी सौदी अरेबियाची राजधानी रियाधमध्ये रशिया आणि अमेरिका यांच्यात बैठक झाली, ज्यामध्ये युक्रेन युद्ध संपवण्याबाबत चर्चा करण्यात आली. या बैठकीनंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी दावा केला की, झेलेन्स्कींची लोकप्रियता फक्त चार टक्क्यांपर्यंत घसरली आहे, तर ताज्या सर्वेक्षणात त्यांची मान्यता रेटिंग 57 टक्के राहिली आहे. दरम्यान, ट्रम्प यांचे दावे फेटाळून लावत झेलेन्स्की यांनी बुधवारी सांगितले की, अमेरिकेचे अध्यक्ष रशियाने पसरवलेल्या प्रचाराच्या बुडबुड्यात अडकले आहेत. कोणी मला आता काढून टाकू इच्छित असेल, तर ते शक्य होणार नाही. चार टक्के मान्यता रेटिंगचा दावा रशियन अपप्रचार आहे. ट्रम्प या चुकीच्या माहितीच्या जाळ्यात अडकले आहेत.
झेलेन्स्की पुढे म्हणाले, मी माझा देश विकू शकत नाही. ट्रम्प यांच्या टीमने युक्रेनबद्दल अधिक अचूक माहिती मिळवावी. युक्रेनमध्ये रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिनवर कोणीही विश्वास ठेवत नाही. युक्रेनचे सैन्य खूप मजबूत आहे आणि बहुतांश युक्रेनियन नागरिक रशियाशी कोणत्याही प्रकारचे करार करण्याच्या बाजूने नाहीत. आमच्या सहभागाशिवाय घेतलेला कोणताही निर्णय स्वीकारणार नाही. ही बैठक 'बेकायदेशीर' असल्याचे सांगत त्यांनी सौदी अरेबियाचा प्रस्तावित दौराही पुढे ढकलला.
दरम्यान, सौदी अरेबियात मंगळवारी झालेल्या बैठकीत अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो आणि रशियाचे परराष्ट्र मंत्री सर्गेई लावरोव्ह यांनी द्विपक्षीय संबंध सुधारण्यावर सहमती दर्शवली. दोन्ही बाजूंनी युक्रेन-रशिया युद्ध संपवण्याच्या दिशेने काम करण्याचेही मान्य केले. बैठकीदरम्यान, रशियाने युक्रेनमध्ये कोणत्याही नाटो सैन्याच्या उपस्थितीला जोरदार विरोध केला आणि युक्रेनचे नाटो सदस्यत्व ठामपणे नाकारले. हे युक्रेनचे अध्यक्ष झेलेन्स्की यांच्या दीर्घकाळापासूनच्या मागण्यांच्या विरोधात आहे.