Russia Ukraine War NATO : रशिया-युक्रेन संघर्षामुळं 'NATO' पुन्हा चर्चेत! जाणून घ्या त्याविषयी सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: February 26, 2022 01:51 PM2022-02-26T13:51:41+5:302022-02-26T14:06:21+5:30

Russia Ukraine War NATO : रशियाने युक्रेनवर हल्ला केल्यापासून ‘नाटो’ ही लष्करी संघटना पुन्हा एकदा जागतिक राजकारणात चर्चेत आहे.

Russia Ukraine War NATO : रशियाने युक्रेनवर हल्ला केल्यापासून ‘नाटो’ ही लष्करी संघटना पुन्हा एकदा जागतिक राजकारणात चर्चेत आहे. १९४९ मध्ये अमेरिका, कॅनडा, ब्रिटनसह बारा देशांनी नॉर्थ अटलांटिक ट्रिटी ऑर्गनायझेशन (याचे संक्षिप्त रूप नाटो) या नावाची संघटन स्थापन केली होती. उत्तर अटलांटिक करार संघटना असे या मराठीत नामकरण आहे. दुसऱ्या महायुद्धानंतर ही संघटना अस्तित्वात आहे.

‘नाटो’मध्ये युक्रेनचा समावेश करणार नाही, अशी ग्वाही रशियाला हवी आहे. कोणताही स्वतंत्र देश या संरक्षण आघाडीत सामील होण्यास स्वतंत्र आहे, हे पाश्चिमात्य देशांचे म्हणणे आहे.

सोव्हिएत संघाने जर्मनीवर हल्ला केल्यानंतर मार्च १९४७ मध्ये फ्रान्स आणि ब्रिटनने डनकर्क करार केला होता; हाच करार पुढे ‘नाटो’च्या स्थापनेची नांदी ठरली.

नाटो संघटनेतील कोणत्याही एका सदस्य देशांवर हल्ला झाल्यास संघटनेतील इतर देश धावून येतील, या मुद्यांवर सदस्य देशांत एकमत झाले होते.

कोणत्याही एका सदस्य देशावर सशस्त्र हल्ला झाल्यास इतर जण मदतीला धावून येत येतील, या मुद्यावर सदस्य देशांमध्ये सहमती झाली होती. सदस्य देशांचे सामूहिक संरक्षण करणे, हा या संघटनेचा उद्देश होय.

सध्या नाटो संघटनेचे ३० देश सदस्य आहेत. तर अमेरिका, ब्रिटन, बेल्जियम, कॅनडा, डेन्मार्क, फ्रान्स, आईसलँड, इटली, लझ्मबर्ग, नेदरलँड,नॉर्वे, पोर्तुगाल हे देश याचे संस्थापक सदस्य आहेत.

ग्रीस आणि तुर्की १९५२ मध्ये आणि स्पेन १९८२ मध्ये या संघटनेत सामील झाले. पश्चिम जर्मनी १९५५ मध्ये सामील झाली. जर्मनीचे १९९० मध्ये एकीकरण झाल्यानंतर पूर्व जर्मनीचाही यात समावेश करण्यात आला.

१९९७ पासून नाटोचा विस्तार करण्यात आला. हंगेरी, झेक रिपब्लिक, पोलँड, बल्गेरिया, इस्टोनिया, लॅटिव्हा, लिथुआनिया, रोमानिया, स्लोव्हानिया,, अल्बेनिया, क्रोएशियाचाही नाटोत समावेश आहे. मॉन्टेंनेग्रो आणि नॉर्थ मॅसेडोनियाचा समावेश झाला.

नॉर्वेचे माजी पंतप्रधान जेन्स स्टॉल्टनेबर्ग हे नाटो संघटनेचे प्रमुख आहेत. २०१४ मध्ये त्यांनी नाटो संघटनेच्या सरचिटणीसपदाची सूत्रे स्वीकारली होती. रॉयल नेदरलँड नेव्हीचे ॲडमिरल रॉब बावर हे नाटो मिलिटरी कमिटीचे चेअरमन आहेत.