मी पाकिस्तानी हिंदू असल्याचा गर्व, निवडणुकीत जिंकली तर...; कोण आहे सवीरा प्रकाश?

By ऑनलाइन लोकमत | Published: January 3, 2024 01:01 PM2024-01-03T13:01:38+5:302024-01-03T13:06:25+5:30

पाकिस्तानच्या खैबर पख्तूनख्वाच्या बुनेर जागेवरून पीपीपीच्या तिकीटावर निवडणूक लढणारी पहिली हिंदू उमेदवार डॉक्टर सवीरा प्रकाश सध्या चर्चेत आली आहे. भारतासोबत चांगले संबंध ठेवण्यावर सवीरा प्रकाशने जोर दिला आहे.

जर मी निवडणूक जिंकले तर पाकिस्तान आणि भारत यांच्यातील संबंध चांगले ठेवण्यासाठी मी प्रामुख्याने काम करेन. त्याचसोबत पख्तूनख्वामधील महिलांच्या अधिकारासाठी लढणार असल्याचे माझ्या निवडणुकीतील मुख्य अजेंडा आहे असंही सवीरा प्रकाश यांनी सांगितले.

सवीरा प्रकाश ही उच्चशिक्षित असून व्यवसायाने ती डॉक्टर आहे. पाकिस्तानमधील अल्पसंख्याक समाजही निवडणुकीत सवीरा प्रकाश यांच्याकडून खूप अपेक्षा ठेवून आहे.

२५ वर्षीय सवीरा म्हणाल्या की, बुनेरची मुलगी अशी उपाधी मला मिळालीय. मुस्लीम मतदारांना केवळ मत देण्याचं म्हटलं नाही तर संपूर्ण समर्थन देण्याचं वचन दिलंय. जगात सर्वात मोठा धर्म माणुसकी आहे आणि मी याच धर्मसाठी काम करत राहीन.

तसेच पीपीपी पक्षासोबत आमच्या कुटुंबाचे ३७ वर्षांचे जुने संबंध आहेत. त्यामुळे या पक्षाकडून निवडणूक लढवण्याचं मी ठरवलं असं डॉक्टर सवीरा यांनी सांगितले. मला पश्तून संस्कृतीचा भाग असल्याचा गर्व होता परंतु जेव्हा मला सामान्य निवडणुकीत तिकीट मिळाले तेव्हा मुस्लीम समुदायाचे समर्थन पाहून माझं आत्मविश्वास आणखी वाढला असंही सवीरा यांनी सांगितले.

मी एक देशभक्त हिंदू आणि बुनेरची मुलगी आहे. मी इस्लामाबाद आणि नवी दिल्ली यांच्यातील संबंध सकारात्मक करण्याच्या दृष्टीने भूमिका निभावेन असंही सवीरा यांनी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं आहे.

सवीरा यांनी पीपीपीचे अध्यक्ष बिलावल भुट्टो यांची गोवा यात्रा भारत-पाक संबंधांला चालना देण्याच्या दिशेने सकारात्मक पाऊल असल्याचे म्हटलं. बिलावल भुट्टो यांचा भारत दौरा आणि पक्षाकडून मला तिकीट मिळणे हे दोन्ही देशातील चांगले संबंध प्रस्थापित करण्यासाठी महत्त्वपूर्ण आहे.

सवीरा यांनी अनेकदा मुलाखतीत पंतप्रधान मोदींचं कौतुक केले. शिक्षणाच्या क्षेत्रात पाकिस्तानची अवस्था बिकट आहे.हिंदू मंदिरावरील हल्ले यावरही त्यांनी उघडपणे भाष्य केले. जर सरकारमध्ये अल्पसंख्याकांचे प्रतिनिधित्व करण्यासाठी कुणी असेल तर अल्पसंख्याकांवरील अत्याचाराच्या घटना कमी होतील असं त्यांनी म्हटलं होते.

त्याचसोबत भारत पाकिस्तान यांची संस्कृती एकमेकांना पुरक आहे मग इतके मतभेद का असा प्रश्न उभा राहतो. दोन्ही देशांनी एकत्र येत चर्चा केली पाहिजे. त्यामुळे अनेक मुद्द्यांवर तोडगा निघू शकतो असं सवीरा प्रकाश यांनी सांगितले आहे.

पाकिस्तानात ८ फेब्रुवारी २०२४ ला निवडणूक होणार आहे. त्यात २६६ लोकसभा मतदारसंघासाठी अनेक पक्ष रिंगणात आहेत. पाकिस्तानच्या संसदेत ६० जागा महिलांसाठी राखीव आहे. त्यात गैर मुस्लिमांसाठी १० जागा आरक्षित आहे