Pakistan Imran Khan : ड्रॅगनच्या समोर पाकिस्तानचं सरंडर; चीनपुढे कर्जासाठी इम्रान खान यांचं लोटांगण

By ऑनलाइन लोकमत | Published: February 15, 2022 01:30 PM2022-02-15T13:30:43+5:302022-02-15T13:45:36+5:30

Pakistan Imran Khan : पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान नुकताच चीनचा दौरा केला. यादरम्यान, इम्रान खान ड्रॅगनसमोर पूर्णपणे आत्मसमर्पण करण्याच्याच मूडमध्ये दिसले.

पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी वन चायना पॉलिसी, तैवान, दक्षिण चीन समुद्र, हाँगकाँग, शिनजियांग आणि तिबेट या मुद्द्यांवर चीनला बिनशर्त पाठिंबा दिला. यावरून पाकिस्तानचं चीनवर वाढत असलेलं अवलंबत्व दिसून आलं. थिंक टँक पॉलिसी रिसर्च ग्रुपच्या (POREG) अहवालातून ही बाब समोर आली आहे.

चार दिवसांच्या चीन दौऱ्यात इम्रान खान यांनी बीजिंग विंटर ऑलिम्पिकच्या उद्घाटन समारंभाला हजेरी लावली. यादरम्यान त्यांनी चीनच्या सर्वोच्च नेत्यांचीही भेट घेतली.

सध्या पाकिस्तानची अर्थव्यवस्था डबघाईला आहे आहे. पाकिस्तानची अर्थव्यवस्था वाचवण्यासाठी चीनकडून कर्ज आणि मदत मिळवणे हा या भेटीचा प्राथमिक उद्देश होता. स्टेट बँक ऑफ पाकिस्तानच्या प्रमुखाच्या वक्तव्यानुसार थिंक टँकने पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेचे 'दिवाळखोर' असे वर्णन केले आहे.

पाकिस्तान-चीन संबंध पाकिस्तानच्या परराष्ट्र धोरणाचा आधारस्तंभ आहेत. दोन्ही देशांनी एकमेकांच्या मूळ हितसंबंधांशी संबंधित' मुद्द्यांवर त्यांच्या समर्थनाचा पुनरुच्चार केल्याची माहिती इम्रान खान यांनी दिली. इम्रान खान यांची निराशा त्यांच्या टिप्पणीतून स्पष्टपणे दिसून येते.

इम्रान खान यांनी चीनला आपल्या हितसंबंधांच्या सर्व मुद्द्यांवर पाकिस्तानच्या पूर्ण पाठिंब्याचा पुनरुच्चार केला आणि वन चायना पॉलिसीसाठी आपल्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार केला. तैवान, दक्षिण चीन समुद्र, हाँगकाँग, शिनजियांग आणि तिबेट या मुद्द्यांवरही त्यांनी चीनला पाठिंबा दिला.

पंतप्रधान इम्रानखान यांच्या दौऱ्यासाठी चीनच्या अटीनुसार पाकिस्ताननं नऊ चिनी स्वतंत्र वीज उत्पादतांना ५० बिलिअन पाकिस्तानी रुपये दिले आणि पाकिस्तानच्या मंत्रिमंडळानंही रिव्हॉल्व्हिंग फंडाच्या स्थापनेसाठीही मंजुरी दिली.

पाकिस्तानी इंग्रजी वृत्तपत्र 'द डॉन' नुसार, चीन-पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉर (CPEC) प्रकरणांवरील पाकिस्तानच्या पंतप्रधानांचे विशेष सहाय्यक खालिद मन्सूर यांनी चीनच्या इच्छेला पाकिस्तान किती प्रमाणात बळी पडला हे उघड केले.

"आम्ही एक ऐतिहासिक पाऊल उचलले आहे. त्यांच्या (चिनी) गुंतवणुकीच्या प्रस्तावांना अनुपालन प्रणालीकडे नेण्याचा निर्णय काही दिवसांपूर्वी घेतला होता. त्या व्यवस्थेसाठी सुमारे ३७ संघीय आणि प्रांतीय मंजुरी आवश्यक होत्या," असंही ते म्हणाले.

मन्सूर यांनी दावा केला की चीनने कर्ज रोलओव्हर, चलन विनिमय विस्तार आणि अतिरिक्त आर्थिक मदतीसाठी पाकिस्तानच्या विनंतीवर विचार करण्याचे आश्वासन दिले आहे. मन्सूर यांनी खुलासा केला की पाकिस्तानने चीनला ४ अब्ज डॉलरचे कर्ज रोलओव्हर, चलन विनिमय ४.५ अब्ज डॉलर्सवरून १० अब्ज पर्यंत वाढवणे आणि ५.५ अब्ज अतिरिक्त आर्थिक मदतीची विनंती केली आहे.

कापड, पादत्राणे, फार्मास्युटिकल्स, कृषी, ऑटोमोबाईल आणि माहिती तंत्रज्ञान यासह अर्थव्यवस्थेच्या जवळजवळ प्रत्येक क्षेत्रात पाकिस्तानने मोठ्या प्रमाणावर चीनी गुंतवणूकीची मागणी केली. पाकिस्तानचे चीनवर पूर्ण अवलंबत्व आहे आणि चीन त्याचा पुरेपूर फायदा घेत असल्याचे इम्रान खान यांच्या भेटीतून दिसून आले.