दुबईतील भव्य हिंदू मंदिर उघडले, हजारो लोक घेऊ शकणार दर्शन! पाहा फोटो...

By ऑनलाइन लोकमत | Published: October 5, 2022 05:54 PM2022-10-05T17:54:57+5:302022-10-05T17:59:52+5:30

Hindu Temple in Dubai : जेबेल अली हे गाव विविध धर्मांच्या प्रार्थनास्थळांसाठी प्रसिद्ध आहे आणि येथे सात चर्च, एक गुरुद्वारा आणि एक हिंदू मंदिर आहे.

दुबईच्या जेबेल अली गावात भारतीय आणि अरबी वास्तुकलेचे मिश्रण असलेले भव्य हिंदू मंदिर लोकांसाठी खुले करण्यात आले आहे. हे हिंदू मंदिर 70 हजार चौरस फुटांत विस्तारले आहे. 2019 मध्ये डिझाइन केले होते आणि दोन वर्षांत पूर्णही केले.

अबुधाबीमधील भारतीय दूतावासाने ट्विट केले की, "सहिष्णुता आणि सहअस्तित्व व्यवहार मंत्री शेख नाहयान बिन मुबारक अल नाहयान आणि राजदूत संजय सुधीर यांनी दुबईतील नवीन हिंदू मंदिराचे उद्घाटन केले.

यावेळी, राजदूत संजय सुधीर यांनी संयुक्त अरब अमिरातमधील (UAE) 35 लाख भारतीयांना पाठिंबा दिल्याबद्दल यूएई सरकारचे आभार व्यक्त केले.

सहिष्णुता, शांतता आणि सौहार्दाचा मजबूत संदेश म्हणून मंदिराकडे पाहिले जात आहे. मंगळवार (४ ऑक्टोबर) पासून हे मंदिर संयुक्त अरब अमिरातमधील (UAE) भाविकांसाठी खुले झाले आहे.

यावेळी पुजाऱ्यांनी 'ओम शांती शांती ओम'चा जयघोष करत भाविकांचे मंदिरात स्वागत केले. तसेच, यावेळी तबला, ढोल वाजवण्यात आले.

दुबईच्या या भव्य हिंदू मंदिरात 16 देवी-देवतांच्या मूर्ती स्थापन करण्यात आल्या आहेत. एका वेळी हजारो लोक आरामात या मंदिराला भेट देऊ शकतात. जेबेल अली हे गाव विविध धर्मांच्या प्रार्थनास्थळांसाठी प्रसिद्ध आहे आणि येथे सात चर्च, एक गुरुद्वारा आणि एक हिंदू मंदिर आहे.