चेन स्मोकर आहे किम जोंग उन! उत्तर कोरियाचा हुकूमशहा एका दिवसात किती सिगारेट ओढतो?
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 2, 2025 18:24 IST2025-09-02T18:19:50+5:302025-09-02T18:24:48+5:30
उत्तर कोरियाचे सर्वोच्च नेते, हुकूमशहा किम जोंग उन नुकतेच त्यांच्या विशेष बुलेटप्रूफ ट्रेनने चीनला गेले. या प्रवासादरम्यान त्यांचे काही फोटो समोर आले आहेत.

उत्तर कोरियाचे सर्वोच्च नेते, हुकूमशहा किम जोंग उन नुकतेच त्यांच्या विशेष बुलेटप्रूफ ट्रेनने चीनला गेले. या प्रवासादरम्यान त्यांचे काही फोटो समोर आले आहेत. या फोटोत ते एका टेबलवर बसलेले दिसत आहेत. विशेष म्हणजे, त्यांच्या टेबलवर लॅपटॉप आणि फोनसोबतच एक सिगारेटचा डबाही ठेवलेला होता. यावरून, किम हे 'चेन स्मोकर' असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.
न्यूयॉर्क पोस्टच्या मते, ४१ वर्षीय किम जोंग उन हे रोज सिगारेट ओढतात, आणि कधी-कधी तर ते एका दिवसात सिगारेटचे ४ डबे संपवतात. एका डब्यात २० सिगारेट असतात, याचा अर्थ ते दिवसाला सुमारे ८० सिगारेट ओढतात.
किम यांच्या कुटुंबासाठी स्वयंपाक केलेल्या एका जपानी शेफने काही वर्षांपूर्वी सांगितले होते की, किम यांनी किशोरवयातच सिगारेट ओढायला सुरुवात केली होती.
किम जोंग उन यांचे वडील, किम जोंग इल, हे देखील एक मोठे 'चेन स्मोकर' होते आणि त्यांचा २०११ साली हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला.
'डेली एनके' वेबसाइटनुसार, किम जोंग उन यांचा आवडता सिगारेट ब्रँड '७.२७' आहे, जो उत्तर कोरियातील सर्वात महागडा सिगारेट ब्रँड आहे. त्याच्या एका पाकीटाची किंमत सुमारे ५८० रुपये आहे.
२०११ मध्ये दक्षिण कोरियाच्या एका गुप्तचर संस्थेने (NIS) एका अहवालात दावा केला होता की, किम यांना स्विस आणि जर्मन सिगारेट भेट म्हणून मिळतात आणि ते त्यांचाही मोठ्या प्रमाणात वापर करतात.
२०१७ मध्ये जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) दिलेल्या अहवालानुसार, उत्तर कोरियातील सुमारे ४६ टक्के पुरुष धूम्रपान करतात. या अहवालानुसार, उत्तर कोरियामध्ये एक व्यक्ती सरासरी दररोज १२ सिगारेट ओढतो.
या अहवालानंतर किम जोंग उन यांच्या सरकारने सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान करण्यावर बंदी आणि दंड लागू केला.