Jeans Ban : जीन्स घालून 'या' देशात फिराल, तर थेट तुरुंगात जाल! कोणत्या देशात आहे हा नियम?
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 17, 2025 15:52 IST2025-07-17T15:48:02+5:302025-07-17T15:52:22+5:30
तुम्ही रस्त्यावरून तुमची आवडती निळी जीन्स घालून जात असाल आणि अचानक पोलिसांनी येऊन तुम्हाला अटक केली, अशी कल्पना कधी केली आहे का?

तुम्ही रस्त्यावरून तुमची आवडती निळी जीन्स घालून जात असाल आणि अचानक पोलिसांनी येऊन तुम्हाला अटक केली, अशी कल्पना कधी केली आहे का? हे ऐकायला हे विचित्र वाटत असले तरी, उत्तर कोरियामध्ये हे वास्तव आहे.
या देशात निळी जीन्स घालणे हा गुन्हा मानला जातो. जर कोणी निळ्या जीन्समध्ये आढळला, तर त्याला मोठा दंड आकारला जाऊ शकतो किंवा थेट तुरुंगाची हवा खावी लागू शकते. उत्तर कोरियाचे सर्वोच्च नेते किम जोंग उन हे अमेरिकेचे कट्टर विरोधक आहेत. त्यांच्या मते, निळी जीन्स हे अमेरिकेच्या संस्कृतीचे आणि साम्राज्यवादाचे प्रतीक आहे.
त्यामुळे उत्तर कोरियात निळी जीन्स घालणे म्हणजे देशद्रोह किंवा बंडखोरी करण्यासारखे आहे, असे मानले जाते. ही बंदी केवळ कपड्यांपुरती मर्यादित नसून, ती देशातील नागरिकांच्या विचारधारेवर पूर्ण नियंत्रण ठेवण्याचा एक भाग आहे.
उत्तर कोरियामध्ये केवळ निळ्या जीन्सवरच नाही, तर इतर अनेक गोष्टींवरही कठोर निर्बंध आहेत. यामध्ये पाश्चात्त्य लोगो असलेले टी-शर्ट, लेदर जॅकेट्स, हेअर कलर, बॉडी पियर्सिंग, आधुनिक फॅशन स्टाईल्स या सगळ्या गोष्टींचा समावेश आहे.
या सर्व गोष्टींना अमेरिकेच्या प्रभावाशी जोडून पाहिले जाते आणि त्यांना 'राष्ट्रविरोधी' किंवा 'देशद्रोही' मानले जाते. या अजब नियमांवर नजर ठेवण्यासाठी उत्तर कोरियामध्ये 'फॅशन पोलीस' नावाची एक विशेष टीम असते. या टीमचे काम हे तपासणे आहे की लोक नियमांचे काटेकोरपणे पालन करत आहेत की नाही.
जर एखाद्या व्यक्तीने नियम मोडल्याचे आढळल्यास, त्याला कोणतीही दयामाया न दाखवता त्वरित शिक्षा दिली जाते. या फॅशन पोलिसांना संपूर्ण समाजाला एकसारखे दिसण्याची जबाबदारी दिली गेली आहे, जेणेकरून कोणीही इतरांपेक्षा वेगळे दिसू नये.
उत्तर कोरियामध्ये लोकांना सरकारद्वारे ठरवलेले कपडे आणि हेअरस्टाईलच वापरावे लागतात. इतकेच काय, कोणता रंग परिधान करायचा हे देखील सरकारच ठरवते. तिथल्या नागरिकांच्या विचार आणि वर्तनावर पूर्णपणे नियंत्रण आहे. आजच्या जगात जिथे लोक आपल्या आवडीनुसार फॅशन निवडतात, तिथे उत्तर कोरियामध्ये मात्र प्रत्येक पावलावर निर्बंधांची टांगती तलवार आहे.