By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2026 17:02 IST
1 / 10अमेरिका इस्रायलविरुद्ध इराण युद्धातच इस्लामिक देशांनी नाटोच्या धर्तीवर सैन्य आघाडी बनवण्यासाठी हालचाली वाढवल्या आहेत. गुरुवारी पाकिस्तान, सौदी अरेबिया, तुर्की, इजिप्तच्या परराष्ट्र मंत्र्यांची रियाधमध्ये बैठक झाली. त्यात इस्लामित ताकद एकजूट करण्याबाबत चर्चा करण्यात आली. 2 / 10इस्लामिक देशांच्या शिखर परिषदेच्या निमित्ताने १२ इस्लामिक देश एकत्र आले होते. मात्र या परिषदेच्या बैठकीनंतर या ४ देशात वेगळी बैठक पार पडली. मिडल ईस्ट आयने या बैठकीबाबत वृत्त प्रसारित केले आहे.3 / 10तुर्की गेल्या वर्षापासून पाकिस्तान आणि सौदी अरेबियासोबत सुरक्षा करार करण्याचा प्रयत्न करत आहे. या वर्षाच्या सुरुवातीला पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्र्यांनी असा करार वर्षभरापासून विचाराधीन आहे असं सांगितले. या प्रकरणाशी निगडित असलेल्या एका सूत्राच्या हवाल्याने तुर्की या करारामध्ये इजिप्तचाही समावेश करण्याचा प्रयत्न करत आहे असं वृत्त 'मिडल ईस्ट आय'ने दिले आहे.4 / 10या करारामध्ये नाटोप्रमाणे हमी आणि वचनबद्धता नसतील परंतु तो एक सुरक्षा मंच म्हणून काम करेल. त्यामुळे संरक्षण उद्योगात आणि व्यापक संरक्षण बाबींमध्ये अधिक सहकार्य शक्य होईल असंही सांगण्यात येत आहे. या प्रदेशात काही प्रमाणात प्रभाव असलेले देश म्हणून समस्या सोडवण्यासाठी आपण आपली शक्ती कशी एकत्र करू शकतो, याचा आम्ही विचार करत आहोत असं तुर्कीचे परराष्ट्र मंत्री हाकान फिदान यांनी सांगितले.5 / 10आम्ही काही काळापासून या प्रदेशातील देशांनी एकत्र येऊन चर्चा करावी आणि नवीन कल्पना विकसित कराव्यात असं सांगत आहोत. आम्ही प्रादेशिक मालकीवर भर देतो. इराणविरुद्धचे अमेरिका-इस्रायल युद्ध आणि तेहरानने आखाती देशांवर केलेले प्रत्युत्तरात्मक हल्ले यांसह प्रदेशातील सद्यस्थितीवर देश चर्चा करत होते असं तुर्कीने म्हटलं.6 / 10तत्त्वतः आपण हे समजून घेतले पाहिजे की एकतर आपण एकत्र येऊन आपल्या समस्या सोडवायला शिकले पाहिजे. नाहीतर एखादी बाह्य शक्ती येऊन केवळ स्वतःच्या हिताचे उपाय लादेल किंवा स्वतः काहीही न करता इतरांना कृती करण्यापासून रोखेल. आपण एकमेकांवर विश्वास ठेवायला शिकले पाहिजे असंही हाकान फिदान यांनी सांगितले आहे.7 / 10गेल्या वर्षीच्या अखेरीस पाकिस्तानने सौदी अरेबियासोबत एका ऐतिहासिक संरक्षण करारावर स्वाक्षरी केली. जर तुर्की आणि इजिप्त यात सामील झाले तर इस्लामी शक्तींसाठी ही एक महत्त्वपूर्ण युती ठरेल. 8 / 10तुर्कीने आपल्या संरक्षण उद्योगात मोठी गुंतवणूक केली असून ड्रोन उत्पादनात एक प्रमुख देश म्हणून उदयास आला आहे. अणुशस्त्रे बाळगणारा पाकिस्तान हा एकमेव इस्लामिक देश आहे. दुसरीकडे सौदी अरेबिया प्रगत तंत्रज्ञानाचे एक महत्त्वाचे केंद्र म्हणून उदयास येत आहे.9 / 10अलीकडेच इराणच्या घातक मिसाइल हल्ल्यांनी खवळलेल्या आखाती देशांनी तेहरानला हल्ले रोखण्याची वॉर्निंग दिली आहे. अरब आणि इस्लामिक देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांची रियाधमध्ये इराणी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर बैठकीचं आयोजन केले होते. या बैठकीत अझरबैजान, बहरीन, इजिप्त, जॉर्डन, कुवेत, लेबनान, पाकिस्तान, कतार, सौदी अरेबिया, सीरिया, तुर्की आणि UAE च्या परराष्ट्र मंत्र्यांनी सहभाग घेतला होता. 10 / 10आपली सुरक्षा, स्थिरता आणि सार्वभौमत्व जपण्यासाठी व आपल्या प्रदेशांवरील 'इराणचे घृणास्पद हल्ले' रोखण्यासाठी आवश्यक कायदेशीर उपाय आणि कार्यपद्धतींचा अवलंब करणे या हेतूने इस्लामिक देश इराणविरोधात एकवटले आहेत. त्यात पाकिस्तान आपली पोळी भाजून घेत आहे.