भारतीय कॅप्टनचा समुद्रात 'मास्टरस्ट्रोक'; २४ तास रडारवरून गायब होत १.३५ लाख टन तेल मुंबईत आणलं
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2026 16:16 IST2026-03-12T16:02:42+5:302026-03-12T16:16:35+5:30
Oil Tanker Shenlong: मोठ्या प्रमाणात तेल वाहून नेणारे एक जहाज आज मुंबई बंदरात पोहोचले. युद्धग्रस्त होर्मुझच्या सामुद्रधुनीतून शेनलॉन्ग हे जहाज सौदी अरेबियाहून १,३५,००० टन कच्चे तेल घेऊन सुरक्षितपणे मुंबईत पोहोचले.

मध्यपूर्वेतील धगधगते युद्ध, इराणचे सततचे क्षेपणास्त्र हल्ले आणि अमेरिका-इस्रायलच्या हवाई हल्ल्यांनी होर्मुजची सामुद्रधुनी सध्या जगातील सर्वात धोकादायक सामुद्रधुनी बनली आहे.

या मृत्यूच्या मार्गातून भारतीय कॅप्टनच्या नेतृत्वाखाली शेनलोंग हे अवाढव्य तेलवाहू जहाज सुरक्षितपणे मुंबई बंदरात दाखल झाले आहे. युद्धाच्या भडक्यानंतर या मार्गावरून भारतात पोहोचलेले हे पहिलेच जहाज असून, ही घटना एखाद्या चमत्कारासारखी मानली जात आहे.

या मोहिमेचे खरे हिरो कॅप्टन सुखशांत सिंह संधू आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली जहाजावरील २९ कर्मचाऱ्यांनी (ज्यात भारतीय, पाकिस्तानी आणि फिलीपीनो नागरिक होते) जीवाची पर्वा न करता हा प्रवास पूर्ण केला.

लायबेरियन ध्वज असलेले हे 'सुएझमॅक्स' श्रेणीतील जहाज बुधवारी दुपारी १,३५,३३५ मेट्रिक टन कच्चे तेल घेऊन मुंबईच्या जवाहर दीप टर्मिनलवर सुखरूप पोहोचले.

२८ फेब्रुवारीला अमेरिका आणि इस्रायलने इराणवर हल्ले केल्यानंतर होर्मुजची सामुद्रधुनी अत्यंत संवेदनशील बनली आहे. या भागात इराणकडून व्यापारी जहाजांना लक्ष्य केले जात आहे. शेनलोंगने १ मार्चला सौदी अरेबियाच्या रास तनुरा बंदरातून कच्चे तेल भरले. ८ मार्च रोजी हे जहाज होर्मुजच्या सामुद्रधुनीत असताना त्याचे AIS (Automatic Identification System) अचानक बंद झाले.

गोइंग डार्क ही युद्धकाळात इराणचे ड्रोन आणि क्षेपणास्त्र हल्ल्यांपासून वाचण्यासाठी जाणीवपूर्वक रडारवरून गायब होण्याची ही एक युद्धनीती आहे. पुढील २४ तास हे जहाज जगाच्या नजरेतून गायब होते आणि दुसऱ्या दिवशी जेव्हा ते पुन्हा ट्रॅकिंग सिस्टमवर आले, तेव्हा त्याने सर्वात धोकादायक पट्टा यशस्वीपणे पार केला होता.

भारत ही आशियातील तिसरी मोठी अर्थव्यवस्था असून आपल्या गरजेच्या ५० टक्क्यांपेक्षा जास्त तेल आणि वायू याच होर्मुजच्या सामुद्रधुनीतून येतो. युद्धामुळे हा मार्ग बंद होणे म्हणजे भारताच्या ऊर्जा सुरक्षेला मोठा धोका होता. अशा कठीण काळात तेल भारतात पोहोचणे ही मोठी दिलासादायक बातमी आहे.

जेथे अमेरिका, युरोप आणि इस्रायलची जहाजे इराणी लष्कराच्या निशाण्यावर आहेत, तेथे भारतीय जहाजाला मिळालेला हा मार्ग भारताच्या मुत्सद्दी संबंधांचा विजय मानला जात आहे. परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर आणि इराणच्या नेतृत्वामध्ये झालेल्या चर्चेनंतर, भारताशी संबंधित जहाजांना सुरक्षित मार्ग देण्याचे संकेत इराणने दिले होते.

















