India China FaceOff: वाढत्या एकीनं चीन एकाकी; भारताला 'या' पाच बलाढ्य देशांचा पाठिंबा

By ऑनलाइन लोकमत | Published: July 4, 2020 03:07 PM2020-07-04T15:07:04+5:302020-07-04T15:14:36+5:30

भारत आणि चीनमधील वाद विकोपाला गेला आहे. पूर्व लडाखमध्ये निर्माण झालेला तणाव दिवसागणिक वाढतो आहे. त्या पार्श्वभूमीवर भारतानं चीनविरोधात मोठी रणनीती आखली आहे. या रणनीतीला चांगलं यश मिळताना दिसत आहे.

पूर्व लडाखमध्ये चिनी सैन्यानं घुसखोरीचा प्रयत्न केला. त्यानंतर गलवान खोऱ्यात चिनी सैनिकांनी भारतीय जवानांवर हल्ला केला. यामध्ये भारताचे २० जवान शहीद झाले. तर चीनचंही मोठं नुकसान झालं. संपूर्ण जग कोरोना संकटाचा सामना करताना चीनकडून सीमावाद उकरून काढले जात असल्यानं जगभरात संतापाची भावना आहे.

कायम विस्तारवादी धोरणाचा पुरस्कार करून इतर देशांचे भूभाग बळकावण्याच्या प्रयत्नात असलेल्या चीनविरोधात भारतानं अतिशय मजबूत भूमिका घेतली आहे. भारताच्या भूमिकेला जगभरातून वाढता पाठिंबा मिळत असल्यानं आता चीन एकाकी पडला आहे.

पूर्व चिनी समुद्रात चीनच्या आव्हानांचा सामना करणाऱ्या जपाननं भारताला साथ दिली आहे. जपानी राजदूत सतोशी सुझुकी यांनी भारताचे परराष्ट्र सचिव हर्ष श्रृंगला यांच्याशी संवाद साधून भारताला पाठिंबा देणारं ट्विट केलं आहे.

याआधी २०१७ मध्ये चीन आणि भारताचे सैनिक डोकलाममध्ये आमनेसामने आलं होतं. त्यावेळीही जपाननं भारताला पाठिंबा दिला होता. आता पुन्हा एकदा जपान भारताच्या पाठिशी उभा राहिला आहे.

पूर्व लडाखमधील तणावासाठी अमेरिकेनं पूर्णपणे चीनला जबाबदार धरलं आहे. लडाखमधील चीनच्या कारवायांमुळे चिनी कम्युनिस्ट पक्षाचं खरं रुप दिसतं, अशा शब्दांत अमेरिकेनं चीनला लक्ष्य केलं आहे.

चीनसोबतचा सीमावाद वाढत असताना भारतानं ५९ चिनी ऍप्सवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला. भारताच्या या निर्णयाचं अमेरिकेनं स्वागत केलं. भारताच्या निर्णयाला पाठिंबा असल्याचं अमेरिकेनं जाहीर केलं आहे.

चीनसोबतचा तणाव वाढत असताना फ्रान्सच्या संरक्षणमंत्री फ्लोरेन्स पार्ली यांनी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्याशी संवाद साधला. फ्रान्स भारताला त्वरित आणि मैत्रीपूर्ण समर्थन देत असल्याची माहिती पार्ली यांनी दिली.

लवकरच भारत आणि फ्रान्सचं नौदल हिंदी महासागरात युद्धाभ्यास करण्याची शक्यता आहे. याशिवाय दोन्ही देशांची जहाजं एकत्रितपणे पेट्रोलिंग करण्याच्या विचारात आहेत.

हाँगकाँगमध्ये सुरक्षा कायदा लागू केल्यानं ब्रिटन आणि चीनमधील तणाव वाढला आहे. त्यावरून ब्रिटिश पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी चीनवर जोरदार टीका केली आहे.

प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरवरील तणावाबद्दल ब्रिटिश उच्चायुक्तालयानं चिंता व्यक्त केली आहे. दोन्ही देशांनी संवाद साधावा, असं आवाहन त्यांच्याकडून करण्यात आलं आहे.

ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांनीदेखील भारत-चीन सीमावादाबद्दल चिंता व्यक्त केली आहे. भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये लष्करी करार झाले आहेत. त्यामुळे ऑस्ट्रेलियानं अप्रत्यक्षपणे पाठिंबा दिला आहे.

ऑस्ट्रेलिया आणि चीनचे संबंध कोरोनावरून विकोपाला गेले आहेत. कोरोना प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी ऑस्ट्रेलियानं अगदी उघडपणे केली. त्यानंतर चीननं ऑस्ट्रेलियाचा उल्लेख अमेरिकेचा कुत्रा असा केला. याशिवाय ऑस्ट्रेलियातून येणाऱ्या उत्पादनांवर वाढीव कर लादला.