दुसरे लग्न करायचे तर दुसऱ्याच्या पत्नीला पळवून न्यावे लागते; या देशात आहे विचित्र परंपरा...
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2025 10:19 IST2025-05-04T10:11:00+5:302025-05-04T10:19:29+5:30
Wodaabe africa second marriage: भारतात कायद्यानुसार पहिल्या, दुसऱ्या लग्नासाठी महिला ही अविवाहित असावी लागते. परंतू, असा एक देश आहे जिथे दुसरे लग्न जर करायचे असेल तर दुसऱ्याची पत्नी पळवून आणावी लागते.

आजकाल पहिल्या लग्नानंतर घटस्फोट, पत्नीचा मृत्यू अशा गोष्टींमुळे दुसरे लग्न करण्याची वेळ बहुतांश तरुणांवर येत आहे. अनेकदा पहिले लग्न हे लव्ह मॅरेजही असते. मग दुसरे लग्न घरच्यांच्या पसंतीने करावे लागते. किंवा याच्या उलटही घडते. समाजात फिरल्यास आपल्याला एकेकाच्या वेगवेगळ्या कहाण्या ऐकायलाही मिळतात. भारतात कायद्यानुसार पहिल्या, दुसऱ्या लग्नासाठी महिला ही अविवाहित असावी लागते. परंतू, असा एक देश आहे जिथे दुसरे लग्न जर करायचे असेल तर दुसऱ्याची पत्नी पळवून आणावी लागते.
तिथे काही मुलींची कमतरता असेल असे तुम्हाला वाटत असेल, परंतू तसे नाही. तर तेथील ही प्रथाच आहे. पहिले लग्न घरच्यांच्या पसंतीने करून दिले जाते. परंतू, जर दुसरे लग्न करण्याची वेळ आली तर त्या व्यक्तीला दुसऱ्याची पत्नी म्हणजे आधीच विवाहीत असलेल्या महिलेशी प्रेमसंबंध निर्माण करून तिला पळवून आणावे लागते. त्यानंतरच हा व्यक्ती दुसरे लग्न करू शकतो.
विचित्र वाटत असलेली ही प्रथा परंपरा पश्चिमी आफ्रिकेच्या वोदाब्बे जमातीमध्ये पाळली जाते. पहिले लग्न कुटुंबातील सदस्यांच्या संमतीने केले जाते. पण जेव्हा दुसऱ्या लग्नाचा प्रश्न येतो तेव्हा नियम पूर्णपणे बदलतात. त्याला गुप्तपणे दुसऱ्याच्या पत्नीवर प्रेम करावे लागते आणि तिच्यासोबत पळून जावे लागते. हा नियम पाळला नाही तर त्याला पुन्हा लग्न करण्याची परवानगी मिळत नाही.
म्हणजेच या नियमानुसार विवाहित व्यक्ती पहिल्या पत्नीपासून वेगळा झाला तरी अविवाहित तरुणीशी दुसरे लग्न करूच शकत नाही. या जमातीकडून यासाठी दरवर्षी 'गेरेवोल महोत्सव' नावाचा एक विशेष कार्यक्रम आयोजित केला जातो. दुसरे लग्न करू इच्छित असलेले पुरुष चांगले कपडे घालतात, चेहरे रंगवतात आणि पारंपारिक कपडे घालतात. ते या उत्सवात सहभागी होतात, नाचतात, गातात आणि त्यांच्या हावभावांनी महिलांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करतात.
आता अशा या उत्सवात कोणती महिला उघडपणे जाईल, किंवा तिचा पती, घरवाले तिला जाऊ देतील. परंतू, महिलाही या ठिकाणी उपस्थित असतात. त्या लपून पसंतीचा व्यक्ती शोधत असतात. जर एखाद्या महिलेला एखाद्या पुरुषाने प्रभावित केले तर ती या महोत्सवातूनच त्या तरुणाशी संपर्क साधत पळून जाते. परंतू, या वेळी पतीला जर भनक लागली तर त्यांचे लग्न अवैध मानले जाते.
या जमातीमध्ये असा विश्वास आहे की दुसरे लग्न फक्त तेव्हाच यशस्वी होते जेव्हा ते 'प्रेमाने' केले जाते आणि कोणाच्या सांगण्यावरून नाही.ही परंपरा अनेक वर्षांपासून चालत आली आहे. बाहेरील जगात या परंपरेवर टीका केली जाते. कितीही टीका झाली तरी वोडाबे हे लोक ती आजही पाळत आहेत.