पाकिस्तानने भारताविरोधात वापरलेलं चीनचं 'पीएल १५'क्षेपणास्त्र किती शक्तिशाली? जाणून घ्या...

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2025 18:14 IST2025-05-12T18:04:55+5:302025-05-12T18:14:43+5:30

PL 15 Missile : ऑपरेशन सिंदूर नंतर, पाकिस्तानने भारतावर हल्ला करण्यासाठी चीनच्या पीएल-१५ क्षेपणास्त्राचा वापर केला. चिनी हवाई दल देखील याचा वापर करते.

भारतावर हल्ला करण्यासाठी पाकिस्तानने केवळ तुर्की ड्रोनचा वापर केला नाही, तर चीनचे पीएल-१५ क्षेपणास्त्रही वापरले. भारतीय लष्कराने हे क्षेपणास्त्र देखील पाडले. पीएल-१५ हे त्याच्या विशेष क्षमतेसाठी ओळखले जाते आणि ते डीआरडीओने विकसित केलेल्या हवेतून हवेत मारा करणाऱ्या क्षेपणास्त्राच्या बरोबरीचे मानले जाते.

चीनने अलीकडेच पाकिस्तानला पीएल-१५ पुरवले होते. संरक्षण तज्ज्ञांनी सांगितले की, हे एक लांब पल्ल्याचे चिनी क्षेपणास्त्र आहे. पाककडून हे पहिल्यांदाच वापरले गेले आहे.

पीएल-१५ हे पीपल्स रिपब्लिक ऑफ चायनाने विकसित केलेले रडार-मार्गदर्शित हवेतून हवेत मारा करणारे लांब पल्ल्याचे क्षेपणास्त्र आहे. चिनी हवाई दल देखील याचा वापर करते. आता पाकिस्तानी हवाई दलही या क्षेपणास्त्राचा वापर करते.

पीएल-१५ ची कमाल श्रेणी २०० किलोमीटर आहे. चीनच्या सरकारी मुखपत्र ग्लोबल टाईम्सने २०२१ मध्ये वृत्त दिले होते की, या क्षेपणास्त्राला इनर्शियल, सॅटेलाइट नेव्हिगेशन, डेटालिंक आणि सक्रिय रडारच्या संयोजनाद्वारे मार्गदर्शन केले जाते. हे क्षेपणास्त्र लुओयांग येथील चायना एअरबोर्न मिसाईल अकादमीने विकसित केले आहे.

२०११ मध्ये पीएल १५ची चाचणी घेण्यात आली होती. २०१५ मध्ये ते चिनी सैन्यात सामील झाले. ते चीनच्या चेंगडू जे-१०सी, शेनयांग जे-१६ आणि चेंगडू जे-२० प्लॅटफॉर्मवर दिसले आहे.

त्याची निर्यात आवृत्ती २०२१ च्या झुहाई एअर शोमध्ये प्रदर्शित करण्यात आली होती. निर्यात आवृत्तीची श्रेणी १४५ किमी आहे. यात दुहेरी इंधन रॉकेट मोटर वापरली जाते.

पीएल १५ हे क्षेपणास्त्र मॅक ५पेक्षा जास्त वेगाने मारा करू शकते, जो ध्वनीच्या वेगापेक्षा ५ पट जास्त आहे. या क्षेपणास्त्राची लांबी ४ मीटर आहे आणि त्याचा व्यास २०० मिलिमीटर आहे.