अमेरिकेतील महापौर भारतातील महापौरापेक्षा किती पॉवरफुल असतो? जगभर इतकी चर्चा का होते?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2025 15:18 IST2025-11-05T14:55:03+5:302025-11-05T15:18:46+5:30

Powerful Mayor in The US: अमेरिकेमध्ये जेव्हा जेव्हा प्रमुख शहरांच्या महापौरपदाची निवडणूक होते, तेव्हा त्याची जगभर चर्चा होते. या निवडणुकांमध्ये चक्क राष्ट्राध्यक्षही उतरतात. भारतात इतक्या महापालिका असूनही त्यांच्या निवडणुकांची चर्चा का होत नाही?

न्यूयॉर्क शहराच्या महापौर पदाची निवडणूक झाली. या निवडणुकीकडे जगाचे लक्ष होते. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीच त्यांना कडाडून विरोध केला होता. पण, भारतीय वंशाचे झोहरान ममदानी या निवडणुकीत विजयी झाले.

भारतात हजारो महापालिका आहेत. त्यांच्या निवडणुकाही होतात, पण तुम्हाला कधी महाराष्ट्रातील मोजक्या महापालिका सोडल्या तर इतर महापालिकेच्या महापौर निवडणुकीची चर्चा झाल्याचे आठवते का? मग अमेरिकेतील महापौर पदाच्या निवडणुकीची इतकी चर्चा का होते? त्याचं कारण आहे अधिकार.

अमेरिकेत महापौर थेट जनतेतून निवडला जातो. पण, या पदाला इतके महत्त्वाचे आहे, ते त्याला मिळणाऱ्या अधिकारामुळे म्हणजे आपल्याकडे जसे मुख्यमंत्र्यांना असतात, तसे अधिकार अमेरिकेतील महापौरांना असतात.

ते एकप्रकारे शहराचे मुख्यमंत्री असतात. त्यांच्या हातात अर्थसंकल्प, पोलीस प्रशासन, वाहतूक, शिक्षण आणि शहराचं संपूर्ण प्रशासन असते. न्यूयॉर्क शहराचे महापौर तर सर्वात शक्तिशाली आहेत. आपल्याकडे जसे मुख्यमंत्र्यांना पूर्ण राज्याची वेगवेगळ्या विभागाची धोरणे ठरवण्याचे, ते अंमलात आणण्याचे अधिकार आहेत, तसेच ते न्यूयॉर्कच्या महापौरांना आहे.

भारतातील महापौर आणि अमेरिकेतील महापौर यांच्यातील सगळ्यात महत्त्वाचा फरक सांगायचा म्हणजे आपल्याकडे महापौर नाममात्र असतात. शहराचे धोरण ठरवण्याचे किंवा अर्थसंकल्पाचे अधिकार त्यांना नसतात. अमेरिकेत महापौर हे प्रशासकीय प्रमुख असतात.

भारतात महापौर हा नामधारी प्रमुख असतात, जसे राष्ट्रपती किंवा राज्यपाल असतात. कार्यकारी सत्ता म्हणजे प्रशासनाचे सर्व निर्णय घेणे, शहरासाठी धोरणे ठरवण्याचे अधिकार महापालिका आयुक्तांकडे म्हणजेच सरकारी अधिकाऱ्यांकडे असते. हे अधिकारी राज्य सरकारच्या नियंत्रणाखाली काम करतात. त्यामुळे महापौरांना थेट निर्णय घेण्याचे अधिकार मर्यादित आहेत.

अमेरिकन महापौरांचा राजकीय आणि सार्वजनिक प्रभाव खूप मोठा असतो. त्यांनी शहरासाठी राबवलेल्या यशस्वी धोरणांची दखल जगभरात घेतली जाते. यातूनच अनेक वेळा अमेरिकेतील महापौर राष्ट्रीय राजकारणातील नेतेही बनले आहेत.