या गोष्टींपासून पृथ्वीला आहे सर्वाधिक धोका

By ऑनलाइन लोकमत | Published: July 31, 2019 07:51 PM2019-07-31T19:51:23+5:302019-07-31T20:03:39+5:30

पृथ्वी हा जीवन असलेला आतापर्यंतचा ब्रह्मांडातील एकमेव ज्ञात ग्रह आहे. मात्र येथील जीवनाला अनेक गोष्टींपासून धोका आहे. जाणून घेऊया पृथ्वीवरील जीवनासाठी धोकादायक ठरणाऱ्या काही घटकांविषयी...

जगातील अण्वस्र संपन्न देशांमध्ये अणुयुद्ध पेटल्यास त्यामुळे पृथ्वीवरील मानवी जीवन मोठ्या प्रमाणावर नष्ट होईल. तसेच अण्वस्रांच्या प्रभावामुळे पृथ्वीवरील वातावरणावरही विपरीत परिणाम होईल. त्याचा प्रभाव अनेक वर्षे जाणवत राहील.

युद्धांपेक्षा विविध प्रकारच्या आजारांमुळे मोठ्या प्रमाणावर मृत्यू होत असतात. आता तर बायोटेक्नॉलॉजीच्या जोरावर असे आजार जाणीवपूर्वक पसरण्याचा धोका वाढला आहे. त्यामुळे या तंत्रज्ञानाचा गैरवापर करून असे आजार पसरवले गेल्यास पृथ्वीवरील जीवन धोक्यात येऊ शकते.

मानवी बुद्धिमत्ता ही दुधारी तलवारीसारखी आहे. त्याचा चांगला वापर झाल्यास त्यातून जगाचे कल्याण होऊ शकते. मात्र हीच बुद्धिमत्ता चुकीच्या कारणासाठी वापरली गेल्यास त्यातून विनाश अटळ आहे.

बायोटेक्नॉलॉजीप्रमाणेच नॅनोटेक्नॉलॉजीसुद्धा धोकादायक आहे. या तंत्रज्ञानाचा वापर करून घातक हत्यारे तयार करता येऊ शकतात. जी जगाच्या विनाशास कारणीभूत ठरू शकतात.

पृथ्वीवरील जीवनाला सर्वाधिक धोका हा अवकाशातील उल्कापिंडांपासून आहे. भूतकाळात असे उल्कापिंड पृथ्वीवर आढळल्याने मोठी हानी झाल्याची उदाहरणे आहेत. त्यामुळे भविष्यातही असा धोका उदभवू शकतो.