वेळ पडल्यास पाकिस्तान जगाला नाचवू शकतो; २ ट्रिलियनचा खजाना, नशिब पालटू शकतं, पण...

By ऑनलाइन लोकमत | Published: January 19, 2023 10:58 AM2023-01-19T10:58:48+5:302023-01-19T11:26:07+5:30

पाकिस्तानची आर्थिक स्थिती बिकट झाली आहे. यामुळे संपूर्ण देशात खळबळ उडाली आहे. येथील लोकांची गहू आणि पीठासाठी मारामार होत आहे.

पाकिस्तानची आर्थिक स्थिती बिकट झाली आहे. यामुळे संपूर्ण देशात खळबळ उडाली आहे. येथील लोकांची गहू आणि पीठासाठी मारामार होत आहे. येथे महागाईने जनतेचे कंबरडे मोडले आहे. जानेवारी २०२२ मध्ये महागाई १३ टक्केच्या दराने वाढत होती, सध्या ती २५ टक्केच्या दराने वाढत आहे.

पाकिस्तान केवळ तीन आठवड्यांसाठी जीवनावश्यक वस्तूंची आयात करू शकणार आहे. देशात मूलभूत गोष्टींचा तुटवडा आहे. त्यांची अवस्था श्रीलंकेसारखीच असू शकते, असे दिसते. डॉलरच्या तुटवड्यामुळे अनेक उद्योगधंदे बंद पडण्याची भीती पाकिस्तानातील व्यावसायिकांनी व्यक्त केली आहे. मात्र बलुचिस्तान प्रांतात असलेल्या सोन्या-तांब्याच्या खाणी पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेला संकटातून वाचवू शकतात.

बलुचिस्तान प्रांतात असलेल्या या खाणींमध्ये शेकडो टन सोने पडून आहे. सोने आणि तांब्याच्या प्रचंड साठे पाकिस्तानसाठी उपयुक्त ठरू शकते. याच्या वापराबाबत अद्याप कोणताही अहवाल किंवा विधान दिलेले नसले तरी अशा प्रकारे देश पुन्हा एका झटक्यात उभा राहू शकेल, अशी अपेक्षा आहे. या खाणींमध्ये असलेल्या सोन्याच्या साठ्याबद्दल सांगायचे तर, या प्रांतात असलेली रेको डिक खाण ही जगातील सर्वात मोठ्या सोन्याच्या आणि तांब्याच्या खाणींपैकी एक आहे.

पाकिस्तानच्या रेको डिक या खाणीत तांब्या-सोन्याचा सर्वात मोठा साठा आहे. एका अंदाजानुसार, येथे सुमारे ५९० कोटी टन खनिज साठा आहे. तज्ज्ञांच्या मते, प्रति टन खनिज साठे सुमारे ०.२२ ग्रॅम सोने आणि सुमारे ०.४१ टक्के तांबे आढळू शकतात. ही खाण इराण आणि अफगाणिस्तानच्या सीमेजवळ एका सुप्त ज्वालामुखीजवळ आहे. अब्जावधी डॉलर्सची संपत्ती असलेल्या या सोन्याच्या आणि तांब्याच्या खाणीतून पाकिस्तान सरकार आपल्या अर्थव्यवस्थेला मदत करू शकते.

पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयाने मंजूरी दिल्यानंतर, बलुचिस्तानमधील विवादास्पद अब्जावधी डॉलर्सच्या रेको डिक कॉपर आणि सोन्याच्या खाणी प्रकल्पाबाबत गेल्या वर्षी डिसेंबर २०२२ मध्ये पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्या अध्यक्षतेखाली एक बैठक झाली. डॉनच्या वृत्तानुसार, यामध्ये कॅबिनेटने रेको डिक प्रकल्पासाठी निधी देण्याच्या योजनेला मंजुरी दिली.

प्रकल्पासाठी मूळ करार २००६मध्ये झाला होता, ज्यामध्ये कॅनडाच्या बॅरिक गोल्ड आणि चिलीच्या अँटोफागास्ता कंपनीचा प्रत्येकी ३७.५ टक्के वाटा समान होता, तर बलुचिस्तान सरकारला २५ टक्के वाटा मिळाला होता. नवीन करारानुसार, बलुचिस्तान सरकारचा या प्रकल्पात २५ टक्के आणि इतरांचा २५ टक्के हिस्सा असेल.

बलुचिस्तान हा तो भाग आहे जो नैसर्गिक साधनसंपत्तीच्या दृष्टीने अतिशय समृद्ध आहे. पाकिस्तानची गरिबी दूर करू शकेल इतके सोने या भागात आहे. १९९५मध्ये रेको डिकमध्ये पहिले उत्खनन करण्यात आले. पहिल्या चार महिन्यांत येथून २०० किलो सोने आणि १७०० टन तांबे काढण्यात आले. त्यावेळी तज्ज्ञांनी खाणीत ४०० दशलक्ष टन सोने असण्याची शक्यता व्यक्त केली होती. या खाणीत असलेल्या सोन्याची अंदाजे किंमत सुमारे दोन ट्रिलियन डॉलर्स असल्याचे सांगितले जाते.

पाकिस्तानमधील खाणींमधून सोने आणि तांबे काढणे हा मात्र काहीसा गुंतागुंतीचा मुद्दा आहे. त्याच बरोबर देशाच्या सोन्याच्या साठ्याबद्दल बोलायचे झाले तर देशातील आर्थिक संकटाच्या काळात परकीय चलनासोबत सोन्याचा साठाही सातत्याने कमी होत आहे. जर तुम्ही आकडेवारी पाहिली तर एकीकडे पाकिस्तानचा फॉरेक्स रिझर्व्ह फेब्रुवारी २०१४ नंतरच्या सर्वात खालच्या पातळीवर आला आहे. दुसरीकडे, जर आपण CEIC वेबसाइटवर पाकिस्तानच्या सोन्याच्या राखीव डेटावर नजर टाकली तर, गेल्या वर्षी नोव्हेंबर २०२२पर्यंत, देशाचा सोन्याचा साठा फक्त $ ३.६४५ अब्ज होता.