कोरोना लस न घेतल्यामुळे विद्यार्थिनीला गमवावी लागली 1.5 कोटीची स्कॉलरशिप

By ऑनलाइन लोकमत | Published: July 21, 2021 03:52 PM2021-07-21T15:52:07+5:302021-07-21T16:08:17+5:30

corona vaccine : अन् तिला तिच्या स्वप्नातील महाविद्यालयात प्रवेश मिळाला नाही.

कोरोना लस टोचून न घेतल्यामुळे एका विद्यार्थिनीला जवळपास 2 लाख डॉलर्सची स्कॉलरशिप गमवावी लागली आणि यामुळे तिला तिच्या स्वप्नातील महाविद्यालयात प्रवेश मिळाला नाही. मात्र, प्रकृतीमुळे तिने कोरोना लस घेण्याचा धोका घेऊ शकत नाही, असे या विद्यार्थिनीने म्हटले आहे.

ओलिव्हिया सँडर हिला Guillian barre सिंड्रोम आहे. तिने आपल्यासोबत घडलेली शोकांतिका फॉक्स न्यूजला सांगितली आहे. या विद्यार्थिनीला हवाई शहरातील ब्रिघम यंग विद्यापीठात प्रवेश मिळाला होता.

ओलिव्हिया सँडर हिने सांगितले की, कोरोना लस घेतली नसल्यामुळे तिला तिच्या स्वप्नातल्या महाविद्यालयात प्रवेश घेता आला नाही. कारण कोरोना लसीमुळे हे सिंड्रोम अधिक धोकादायक असू शकते.

2019 मध्ये इन्फ्लूएंझाची लस घेतल्यामुळे तिला जीबीएसचा त्रास झाला होता आणि यामुळे एका महिन्यापेक्षा जास्त काळ तिला कंबरच्या खाली अर्धांगवायू झाला होता, असे ओलिव्हियाने सांगितले. तसेच, ही लस घेतली तर जीबीएस ट्रिगर होऊ शकते आणि मी पुन्हा हे सहन करू शकत नाही, असे ती म्हणाली.

ओलिव्हियाच्या डॉक्टरांनी देखील विद्यापीठाला एक पत्र लिहिले होते. ज्यामध्ये असे म्हटले होते की ओलिव्हियाची मेडिकल हिस्ट्री पाहता तिला कोरोनाची लस किंवा इन्फ्लूएंझा लस दिल्याने तिचे आरोग्य धोक्यात येऊ शकते, त्यामुळे ओलिव्हियाने कोरोनावरील लस घेऊ नये.

ऑलिव्हियाच्या डॉक्टरांच्या लेटरला उत्तर देताना विद्यापीठ प्रशासनाने ईमेलमध्ये म्हटले आहे की, आमचे लोकेशन बरेच युनिक आहे आणि आमचे विद्यापीठात वेगवेगळ्या पार्श्वभूमीवरील मुले शिकण्यासाठी येतात. त्यामुळे आम्हाला कोरोनापासून कॅम्पस आणि समुदायाला संरक्षित करणे आवश्यक आहे. यासाठी अधिक सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे .

ओलिव्हियाने सांगितले की, तिने या महाविद्यालयातून जवळपास दोन लाख डॉलर्स म्हणजेच दीड कोटींची स्कॉलरशिप जिंकली होती, परंतु आता तिला या विद्यापीठात प्रवेश मिळत नसल्याने तिची स्कॉलरशिप रद्द झाली आहे.

ओलिव्हिया म्हणाले की, या विद्यापीठाने जूनच्या मध्यापर्यंत विद्यार्थ्यांना कोरोना लस अनिवार्य आहे, अशी कोणतीही माहिती दिली नव्हती. माझी स्कॉलरशिप गेली आहे. मी आता काय करणार हे मला माहित नाही. ही परिस्थिती अत्यंत त्रासदायक आहे.